काँग्रेसचा विरोधी पक्षनेतेपदासाठी 'सतेज' धावा अन् मनसे एन्ट्रीवर 'राज' मंथन; मातोश्रीवर बैठकीत काय काय घडलं?
काँग्रेस नेत्यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि विविध मुद्यांवर चर्चा केली. या भेटीमध्ये विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासह राज ठाकरे यांच्या एन्ट्रीवरही चर्चा झाल्याची माहिती आहे.

Discussion between Uddhav Thackeray and Congress leaders: विधानसभा आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद रिक्त आहे. या दोन्ही पदांसाठी महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यामध्ये चढाओढ सुरू आहे. त्यामुळे विधान परिषदेमध्ये काँग्रेसकडून दावा करण्यात आला आहे, तर विधानसभेमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून दावा करण्यात आला आहे. आज काँग्रेस नेत्यांनी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि विविध मुद्यांवर चर्चा केली. या भेटीमध्ये विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासह राज ठाकरे यांच्या संभाव्य महाविकास आघाडीतील एन्ट्रीवरही चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. त्याचबरोबर आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीसंदर्भातही उभय पक्षांच्या नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. दरम्यान, या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या एकत्र येण्यावर काँग्रेस नेत्यांसोबत चर्चा केल्याची माहिती आहे.
विधिमंडळात पहिल्यांदाच सद्यस्थितीत विरोधी पक्षनेते पद ना विधानसभेत आहे ना विधान परिषदेत आहे. त्यामुळे तातडीने विरोधी पक्षनेते पद देण्यात यावे अशी मागणी विरोधकांची आहे. विधानसभा विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरेंच्या शिवसेनेने दावा केला आहे. आता विधान परिषद विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेसकडून दावा केला जाणार आहे.
मनसेला सोबत घेण्यासंदर्भात चर्चा झाली?
दुसरीकडे,आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याचे संकेत या आधीच दोन्ही पक्षांकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांना सोबत घेण्यास संदर्भात उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेत्यांसोबत चर्चा केल्याची माहिती आहे. मात्र, राज ठाकरे यांना सोबत घेण्यासंदर्भात राज्यातील काँग्रेसचे नेते दिल्लीतील पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा करतील आणि त्यानंतर राज्यातील काँग्रेस नेते राज ठाकरेंना सोबत घेण्यासंदर्भात भूमिका स्पष्ट करतील.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक संदर्भात चर्चा
दुसरीकडे, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने काँग्रेस नेते आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. महाविकास आघाडीतील पक्ष म्हणून ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस दोन्हीही पक्ष स्थानिक पातळीवर तयारी करत आहेत. स्थानिक पातळीवर समीकरणे आणि पदाधिकारी आणि स्थानिक नेत्यांचा विचार करून आघाडी संदर्भात निर्णय घेतला जाणार आहे.
महाविकास आघाडीमधील राजकीय समीकरण
- विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद अंबादास दानवे यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने रिक्त आहे
- सध्या विधान परिषदेत महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस संख्याबळ अधिक आहे. त्यामुळे विधान परिषद विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेस पक्षाने दावा केला आहे.
- विधान परिषदेत ठाकरेंच्या शिवसेनेचे सहा, काँग्रेस पक्षाचे आठ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे दोन आमदार आहेत.
- विधान परिषद विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे असावं यासाठी काँग्रेस नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली. विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेसकडून सतेज पाटील यांचं नाव चर्चेत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या

























