Corona Virus: नाकातून पाणी येणे, ताप, खोकला...कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटची लक्षणे कोणती?
Corona Virus: कोरोना व्हायरसच्या रुग्णांच्या संख्येत मे महिन्यापासून वाढ होतेय.

Corona Virus: कोरोना व्हायरसच्या (Corona Virus) रुग्णांच्या संख्येत मे महिन्यापासून वाढ होतेय. मुंबई महापालिका हद्दीत 53 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेत. मुंबई पाठोपाठ पुण्यातही कोरोनाचा रुग्ण आढळलाय. पुण्यात 87 वर्षाच्या वृद्ध व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. देशभरात एकूण 257 रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय.
देशातील कोरोनाची स्थिती नियमंत्रणात असल्याची प्रशासनाने दिली आहे. वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवा महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी बैठक झाली. बैठकीत देशभरातील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेतला. दरम्यान, सध्या आढळून येत असलेला कोरोनाचा नवीन प्रकार (व्हेरिएंट) असल्याची चर्चा आहे.
कोरोनाचा नवीन प्रकार किती धोकादायक?
सिंगापूरमध्ये आढळणारे कोरोनाचे रुग्ण LF.7 आणि NB.1 प्रकारांचे आहेत. हे प्रकार JN.1 स्ट्रेनशी संबंधित आहेत. या कोरोनाच्या लक्षणाबाबत बोलायचे झाल्यास, त्यात नाकातून पाणी येणे, ताप येणे आणि घसा खवखवणे यांचा समावेश आहे. तसेच काही रुग्णांमध्ये खोकला आणि डोकेदुखी देखील दिसून येत आहे.
सिंगापूरमध्ये अलर्ट
हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ होत असून, त्यामुळे आशिया खंडात कोरोनाच्या लाटेची भीती व्यक्त होत आहे. कोरोनाची उत्पत्ती चीनमध्ये 2019 मध्ये झाली आणि 2020 मध्ये जगभर हा विषाणू पसरला. त्यानंतर कोरोनाने कोट्यवधी लोकांचा बळी घेतला. जगाची अर्थव्यवस्था ठप्प झाली. कोरोनाच्या रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर सिंगापूरमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोविड रुग्णांची संख्या गेल्या आठवड्यापेक्षा 28 टक्क्यांनी वाढली आहे. कोरोनाचा हा प्रकार 2020 च्या लाटेपेक्षा गंभीर आहे. वेगाने विषाणू पसरत असून लोकांनी लसीचा बुस्टर डोस घ्यावा असे सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
कोरोनाची लक्षणे कोणती?
कोरोनाच्या सामान्य लक्षणांमध्ये प्रामुख्याने ताप, खोकला (कोरडा किंवा कफयुक्त), घसा खवखवणे किंवा दुखणे, थकवा जाणवणे, अंगदुखी आणि डोकेदुखी यांचा समावेश होतो. यासोबतच काही वेळा सर्दी, नाक वाहणे, चव किंवा वास घेण्याची क्षमता कमी होणे अशी लक्षणेही दिसू शकतात. ही लक्षणे बऱ्याचदा सामान्य सर्दी-पडशासारखी असू शकतात आणि व्यक्तीनुसार बदलू शकतात. तर गंभीर परिस्थितीत श्वास घ्यायला त्रास होणे हे एक महत्त्वाचे धोक्याचे लक्षण आहे.
कोरोनासाठी महानगरपालिकेची सुविधा -
मुंबई महानगरात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपचार आणि मार्गदर्शनाची सोय उपलब्ध आहे. सेव्हन हिल्स (Seven Hill) रुग्णालयामध्ये 20 खाट (MICU), 20 खाटा मुले व गरोदर स्त्रियांसाठी, 60 सामान्य खाटा तयार ठेवल्या आहेत. तसेच कस्तुरबा रुग्णालय येथे 2 अतिदक्षता (ICU) खाटा व 10 खाटांचा वॉर्ड उपलब्ध आहे. आवश्यकता भासल्यास सदर क्षमता त्वरित वाढविण्यात येईल.
























