लसीच्या बुस्टर डोसने कोरोनाचा प्रसार थांबेल? सरकारच्या निर्णयावर तज्ञांकडून प्रश्न उपस्थित
ज्या देशांमध्ये बूस्टर डोस दिले गेले आहेत अशा देशांमध्येही कोरोना आणि ओमायक्रॉनच्या रूग्णांमध्ये वाढ होतच आहे. त्यामुळे भारतात बूस्टर डोस देऊन उपयोग होणार नाही असे तज्ञांचे मत आहे.
Omicron : नव्या वर्षात 10 जानेवारीपासून भारतात कोरोना लसीचा (Corona Vaccine) आणखी एक डोस किंवा बूस्टर डोस (Booster Dose) दिला जाणार आहे. कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी शरीरात अॅंटीबॉडीज तयार होण्यासाठी हा डोस देण्यात येणार आहे. हा डोस आरोग्यसेवा आणि फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना दिला जाणार आहे. परंतु, केंद्र सरकारच्या या निर्णयावर काही तज्ञांकडून प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. ज्या देशांमध्ये बूस्टर डोस दिले गेले आहेत अशा देशांमध्येही कोरोना आणि ओमायक्रॉनच्या रूग्णांमध्ये वाढ होतच आहे. त्यामुळे भारतात बूस्टर डोस देऊन उपयोग होणार नाही असे तज्ञांचे मत आहे.
इंडियन पब्लिक हेल्थ असोसिएशनचे अध्यक्ष आणि एम्स दिल्ली येथील कम्युनिटी मेडिसिन विभागाचे अध्यक्ष संजय राय यांनी कोरोना लसीचा आणखी एक डोस देण्याच्या सरकारच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले आहे. त्यांच्या मते, औषध आणि लसीचे निर्णय वैज्ञानिक पुराव्यांवर आधारित असले पाहिजेत. लोकांना बूस्टर डोसचा फायदा होईल, त्यांच्या शरीरात अँटीबॉडीज तयार होतील. आणखी संसर्ग झाल्यास धोका कमी असेल, याबाबत आतापर्यंत कोणतेही ठोस पुरावे उपलब्ध नाहीत. शिवाय ज्या देशांमध्ये बूस्टर डोस दिले जात आहेत तेथेही कोरोनाचा संसर्ग थांबलेला नाही तर कोरोना रूग्णांच्या संखेत वाढ होत आहे.
आयपीएचएचे अध्यक्ष डॉ. संजय राय म्हणाले, अनेक देशांनी बूस्टर डोस देण्यास सुरूवात केली आहे. त्यांचे आपण विश्लेषण केले पाहिजे. आपल्यात वैज्ञानिक वृत्ती असायला हवी. यूकेने आधीच सुमारे 35 टक्के लोकांना बूस्टर डोस दिला आहे. तरीही तेथे कोरोना वाढतच आहे.
"लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही संसर्ग होत आहे. ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत त्यांनाही ओमायक्रॉनची लागण होत आहे. शुक्रवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ओमायक्रॉनवरील विश्लेषण अहवालात असे आढळून आले आहे की, डोस आणि बुस्टर डोस नंतरही लोकांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे असे मत डॉ. संजय राय यांनी व्यक्त केले.
डॉ. संजय राय यांनी सांगितिले की, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या विश्लेषण अहवालात, 183 ओमायक्रॉन संक्रमित रूग्णांपैकी 91 टक्के रूग्णांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. त्यातील 70 टक्के संक्रमित रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे आढळली नाहीत.
महत्वाच्या बातम्या
- Omicron : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्याबाबत विचार करावा, अलाहाबाद हायकोर्ट
- Omicron : देशात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ओमायक्रॉनचा धोका, निवडणूक आयोगाने आरोग्य सचिवांकडून मागवला अहवाल