कृषी विधेयकावरून काँग्रेसच्या देशव्यापी पत्रकार परिषदा; पक्षातील मोठ्या नेत्यांचा सहभाग
कृषी विधेयकावरून काँग्रेस पक्ष आज सर्व राज्यांच्या राजधानीच्या शहरांमध्ये पत्रकार परिषदा घेणार आहे. कृषी विधेयकांविरोधात काँग्रेसने पन्नास दिवसांच्या देशव्यापी आंदोलनाची रुपरेखा निश्चित केली आहे.
नवी दिल्ली : कृषी विधेयकावरून काँग्रेस आज देशभरात पत्रकार परिषदा घेणार आहे. आज सर्व राज्यांच्या राजधान्यांमध्ये कृषी विधेयकाच्या मुद्द्यावरून काँग्रेसच्या मोठे नेत्यांच्या पत्रकार परिषदा होणार आहेत. सोनिया गांधी यांची सल्लागार समितीसोबतच पक्षाचे सरचिटणीस आणि प्रभारी यांच्या बैठकीत 21 सप्टेंबर रोजी काँग्रेसने पन्नास दिवसांसाठी देशव्यापी आंदोलनाची रुपरेखा निश्चित केली. ज्यातंर्गत आज प्रत्येक राज्याच्या राजधानीच्या शहरात पत्रकार परिषदा घेण्यात येणार आहेत.
काँग्रेस नेता राजभवनापर्यंत पदयात्रा काढणार
आज सर्व राज्यांच्या राजधानीच्या शहरांमध्ये पत्रकार परिषदा पार पडल्यानंतर 28 सप्टेंबरपर्यंत प्रत्येक राज्यांमध्ये काँग्रेस नेते राजभवनापर्यंत पदयात्रा काढत राष्ट्रपतींच्या नावे राज्यपालांना निवेदन देणार आहेत. असं सांगण्यात येत आहे की, 2 ऑक्टोबर रोजी प्रत्येक जिल्ह्यात धरणं आंदोलन करण्यात येईल आणि 10 ऑक्टोबर रोजी प्रत्येक राज्यात शेतकरी परिषद भरवण्यात येणार आहे. काँग्रेस कार्यकर्ते 31 ऑक्टोबरपर्यंत गावोगावी जाऊन स्वाक्षरी मोहीम राबवतील. या मोहीमेदरम्यान पक्षाने 2 कोटी शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या घेण्याचं लक्ष्य निश्चित केलं आहे. या मोहीमेत घेण्यात आलेल्या सर्व स्वाक्षऱ्या 14 नोव्हेंबरला राष्ट्रपतींकडे सुपूर्द करण्याचं धोरण पक्षाने आखलं आहे.
पंजाब आणि हरियाणात शेतकरी विधायकाविरोधात आंदोलनंपंजाब आणि हरियाणातील शेतकरी कृषी विधेयकांविरोधात आंदोलनं करत आहेत. या दोन्हीही राज्यांमध्ये काँग्रेसने आधीच आंदोलनाला सुरुवात केली आहे. काँग्रेसचा आरोप आहे की, या विधेयकांमार्फत मोदी सरकार शेतकऱ्यांना कॉपर्पोरेट जगतात अडकवत आहेत. यामुळे बाजारपेठेची व्यवस्था संपुष्ठात येईल आणि शेतकऱ्यांना एमएसपी उपलब्ध होणार नाही.
विधेयकाच्या विरोधात राष्ट्रपतींना लिहिणार चिठ्ठी
बुधवारी गुलाम नबी आझादने 14 दलांच्या वतीने राष्ट्रपतींची भेट घेतली आणि त्यानंतर म्हणाले की, सरकारने सर्वांसोबत चर्चा करायला पाहिजे होती. परंतु, दुर्दैवाने सरकारने विधेयक ना सिलेक्ट कमिटीकडे पाठवलं ना स्टँडिंग कमिटीकडे. अन्यथा हे विधेयक शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी असतं.
त्यांचं म्हणणं आहे की, 'राज्यसभेमध्ये ज्याप्रकरे बिल पारित करण्यात आलं. त्याविरोधात आम्ही राष्ट्रपतींना चिठ्ठी लिहिली होती. संख्याबळ आमच्या बाजूने होतं. सध्या जो विरोध सुरु आहे, त्यासाठी सरकार जबाबदार आहे. मागण्या करण्यात येत असतानाही, मतविभाजन झालं नाही. लोकशाहीच्या मंदिरात राज्यघटनेची पायमल्ली झाली. त्यामुळे आम्ही राष्ट्रपतींना निवेदन पाठवलं आहे. ही विधेयकं मंजूर करण्याची पद्धत असंवैधानिक आहे.'
गुलाब नबी आझाद यांचं म्हणणं आहे की, आम्ही निवेदन केलं आहे की, राष्ट्रपतींनी ही विधेयकं परत पाठवावीत. जेणेकरून याबाबत पुन्हा चर्चा करण्यात येतील आणि आवश्यक सुधारणाही करण्यात येतील. तसेच राष्ट्रपती यासंदर्भात बोलताना म्हणाले की, ते याबाबत लक्ष देऊन विचार करतील.
विविध राज्यांमध्ये काँग्रेसच्या पत्रकार परिषदांचे शेड्यूल :
1. पाटणा : रणदीप सुरजेवाला, शक्ति सिंह गोहिल
2. लखनऊ: कॅप्टन अमरिंदर सिंह, अमर सिंह, कुलजीत नागरा
3. नागपूर : भूपेश बघेल
4. मुंबई : एच. के. पाटिल
5. भुवनेश्वर : दिग्विजय सिंह
6. जयपूर : अजय माकन, टी. एस. सिंह देव
7. चंदीगड (पंजाब) : हरीश रावत
8. चंदीगड (हरियाणा) : पवन बंसल
9. शिमला : राजीव शुक्ला
10. बंगाल : मोहन प्रकाश
11. बंगळुरू : केसी वेणुगोपाल
12. हैदराबाद : मल्लिकार्जुन खडगे
13. चेन्नई : दिनेश गुंदुराव
14. तिरुअनंतपुरम : तारिक अनवर