मोदी सरकारच्या काळात 5 लाख 35 हजार कोटींचा बँक घोटाळा, राहुल गांधींचा हल्लाबोल
Rahul Gandhi Hits Out At Modi Government : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.
Rahul Gandhi Hits Out At Modi Government : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करत मोदी सरकारच्या काळात 5 लाख 35 हजार कोटींचा बँक घोटाळे झाल्याचा आरोप केला आहे. राहुल गांधी यांचे ट्वि सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे.
गुजरातमध्ये बँक इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. तब्बल 28 बँकांना शिपयार्ड कंपनीनं 22 हजार 842 कोटींचा चुना लावल्याचं समोर आलं आहे. हा घोटाळा समोर आल्यानंतर राहुल गांधी यांनी ट्वीट करत मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. राहुल गांधी म्हणाले की, ‘75 वर्षात भारतातील लोकांच्या पैशांची अशी हेराफेरी कधीच पाहिली नाही. लुटमार आणि फसवणूकीचे हे दिवस फक्त मोदींच्या मित्रांसाठी अच्छे दिन आहेत.’
मोदी काल में अब तक ₹5,35,000 करोड़ के बैंक फ़्रॉड हो चुके हैं- 75 सालों में भारत की जनता के पैसे से ऐसी धांधली कभी नहीं हुई।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 13, 2022
लूट और धोखे के ये दिन सिर्फ़ मोदी मित्रों के लिए अच्छे दिन हैं।#KiskeAccheDin
शनिवारीही राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला होता. देशातील वाढत्या बेरोजगारीला मोदी सरकार जबाबदार असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली होती. आज पुन्हा एकदा ट्विट करत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.
गुजरातमध्ये बँक इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा
गुजरातमध्ये बँक इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. तब्बल 28 बँकांना शिपयार्ड कंपनीनं 22 हजार 842 कोटींचा चुना लावल्याचं समोर आलं आहे. CBI ने ABG शिपयार्ड आणि त्याचे तत्कालीन अध्यक्ष ऋषी कमलेश अग्रवाल यांच्यासह अन्य 8 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ABG शिपयार्ड (ABG Shipyard) ही कंपनी जहाजाची निर्मिती आणि दुरुस्ती करण्याचं काम करते. या कंपनीचे शिपयार्ड गुजरातमधील दहेज आणि सूरत येथे आहेत. ABG शिपयार्ड कंपनीच्या एकूण आठ जणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार, हा घोटाळा एप्रिल 2012 ते जुलै 2017 यादरम्यान झाला आहे. सीबीआयद्वारे दाखल करण्यात आलेला हा सर्वात मोठा घोटाळा असल्याचं बोललं जात आहे.
एसबीआयने केलेल्या तक्रारीनुसार, शिपयार्ड कंपनीने एसबीआय बँकेचे 7089 कोटी, आयडीबीआय बँकेचे 3634 कोटी रुपये, बँक ऑफ बडोद्याचे 1614 कोटी रुपये, पंजाब नॅशनल बँकेचे 1244 कोटी रुपये आणि 1228 कोटी रुपये इंडियन ओवरसीज बँकेकडून घेतले आहेत. याआधी 8 नोव्हेंबर 2019 रोजी बँकेकडून तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यावर सीबीआयने 12 मार्च 2020 रोजी स्पष्टीकरण मागवले होते. ऑगस्ट 2020 मध्ये बँकेकडून आणखी एक तक्रार दाखल करण्यात आली होती. जवळपास दीड वर्षांपेक्षा जास्त तपास केल्यानंतर सात फेब्रुवारी 2022 रोजी सीबीआयने कारवाई सुरु केली.