Congress : राजस्थान, छत्तीसगडमध्ये पायावर धोंडा पाडून घेतला, तेलंगणा खेचून आणलं; लोकसभेच्या सेमीफायनलला काँग्रेसनं नक्की कमावलं तरी काय?
राजस्थान (Rajasthan) आणि मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) काँग्रेस सत्ताधारी होती, तर ज्योतिरादित्य शिंदे यांनी बंडाळी केल्याने काँग्रेस सरकार कोसळले होते. अशा स्थितीत आता तिन्ही राज्ये काँग्रेसच्या हातून लोकसभेच्या तोंडावर हातातून निसटली आहेत.
Assembly Election Results 2023 : लोकसभेच्या फायनलला सामोरे जाण्यापूर्वी इंडिया आघाडीतील सर्वात थोरला भाऊ असलेल्या काँग्रेसनं पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Election Results 2023) सेमीफायनलमध्ये काय कमावलं आणि काय गमावलं याचा विचार करण्याची वेळ नेतृत्वावर आली आहे. तेलंगणात केसीआर साम्राज्य खालसा केल्याचा आनंदही भाजपला मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड राज्यात झालेल्या दारुण पराभवाने घेता येणार नाही, अशी स्थिती झाली आहे. दक्षिण भारतातून भाजप हद्दपार आणि हिंदी भाषिक राज्यातून काँग्रेस हद्दपार अशी स्थिती या निकालाने झाली आहे.
भाजपला लोकसभेला 83 जागांवर ताकद मिळाली
राजस्थान (Rajasthan) आणि मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) काँग्रेस सत्ताधारी होती, तर ज्योतिरादित्य शिंदे यांनी बंडाळी केल्याने मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकार कोसळले होते. अशा स्थितीत आता तिन्ही राज्ये काँग्रेसच्या हातून लोकसभेच्या तोंडावर हातातून निसटली आहेत. ज्या भाजपला घेरण्यासाठी इंडियाच्या आघाडीच्या माध्यमातून रणनीती सुरु आहे त्या आघाडीच्या नेत्यांना सुद्धा आता आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. पार पडलेल्या राज्यांमध्ये लोकसभेसाठी 83 जागा येतात. या जागांवर पत्यक्ष असेल किंवा अपत्यक्ष असेल, सत्ताधारी भाजपनं दावा अधिक मजबूत केला आहे. महाराष्ट्र (Maharashtra) आणि बिहार (Bihar) या मोठ्या राज्यात भाजपची स्थिती दोलायमान असल्याने या तीन राज्यांनी भाजपला दिलेला कौल हुरूप वाढवणारा आहे.
मध्य प्रदेशात संधी असूनही घालवली
मध्य प्रदेशात काँग्रेसचं लोकनियुक्त सरकार पाडून सरकार भाजपनं स्थापन केलं होतं. त्यामुळे शिवराजसिंह चौहान यांच्या विरोधात आणि भाजपच्या विरोधात रान उठवून काँग्रेस पलटवार करेल, अशी चर्चा होती. मात्र, त्याठिकाणी एकहाती सत्ता भाजपन आणली आहे. त्यामुळे ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Shinde) गमावणे ही चूक होती का? हा वाद मिटवता आला असता का? किंवा त्यांच्या कृतीला मतदारांपर्यंत नेऊन त्यांना घेरता आलं नसतं का? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) इंडिया आघाडीतील सहयोगी पक्षांकडे तुच्छतेने पाहण्याचा मुद्दाही समोर आला. कोण अखिलेश अशी संभावना करणारे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार कमलनाथ यांनी ज्या अँकर्सवर इंडिया आघाडीने बंदी घातली होती, त्यांनाही मुलाखती दिल्या. त्यामुळे लोकसभेची सेमीफायनल खेळत असताना फायनलचाच विसर या नेत्यांना पडला होता.
राजस्थानमधील शीतयुद्धाने भीषण परिस्थिती (Rajasthan)
राजस्थानमध्ये (Rajasthan) नेतृत्वाचा विषय तसाच ठेवल्याने काँग्रेसला दारुण पराभव स्वीकारावा लागला आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्या महत्वकाक्षांनी पक्ष रसातळाला गेला आहे, हेच या निकालातून ध्वनित झालं आहे. दोन्ही नेत्यांमधील वाद संपुष्टात आणला आहे हे सातत्याने दाखवण्याचा प्रयत्न झाला. मात्र, परिस्थिती निकालातून समोर आली आहे. ज्या अशोक गेहलोतांना काँग्रेस अध्यक्षपदाची खुर्ची चालून येत असताना राज्यातील खुर्चीचा मोह सुटला नाही त्याच अशोक गेहलोतांना आता विरोधी बाकावर बसावं लागणार आहे. त्यामुळे मिळालं तरी काय? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. गेहलोतांचा डाव पूर्णत: फसला गेला आहे. इतकचं नाही, तर अनेक मंत्रीही पराभवाच्या छायेत आहेत.
छत्तीसगडमध्ये महादेव अंगलट आला? (Chhattisgarh)
भूपेश बघेल तळागाळात प्रभाव पाडण्यात अपयशी ठरल्याचे छत्तीसगडच्या निवडणूक निकालावरून स्पष्ट झाले आहे. छत्तीसगढीच्या लोकांच्या कल्याणासाठी त्यांनी तळागाळापर्यंत अनेक योजना राबवल्या होत्या. जनतेला आकर्षित करण्यात अपयशी ठरल्याचे दिसून येते. काँग्रेसच्या पराभवात महादेव अॅपचा (Chhattisgarh) मोठा वाटा नाही का? असाही प्रश्न उपस्थित झाला आहे. निवडणुकीच्या प्रचारात महादेव बेटिंग अॅपचा मुद्दा समोर आला आणि सीएम भूपेश बघेल यांच्याशी संबंध जोडले गेल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यानंतर काँग्रेसला बचाव करणे कठीण झाले. काँग्रेसच्या या लाजिरवाण्या कामगिरीसाठी गटबाजीलाही जबाबदार धरले जात आहे. 2018 च्या निकालानंतर भूपेश बघेल आणि टीएस देव यांच्यातही शीतयुद्ध होते. या पराभवासाठी काँग्रेसमधील गटबाजी नाकारता येत नाही, असे जाणकारांचे म्हणणे आहे. छत्तीसगडच्या निवडणुकीचा कल पाहिला तर काँग्रेस आणि भाजपमधील फरक खूपच जास्त आहे.
तेलंगणात केसीआर साम्राज्य खालसा केल्याचा आनंद (Telangana)
काँग्रेसला तेलंगणामध्ये (Telangana) मिळालेला केवळ समाधानकारक राहिला आहे. या विजयासह दक्षिण भारतात भाजपचा बस्तान बसवण्याचा डावही हाणून पाडला आहे, हेच समाधान काँग्रेकडे असेल. केसीआर यांना पडलेली देशव्यापी स्वप्ने आणि महाराष्ट्रात केलेल्या अनावश्यक प्रयत्नांना मतदारांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. हॅट्टिकच्या संधीत असलेल्या केसीआर यांना पूर्वाश्रमीचा टीडीएसचा मोहरा आणि आता काँग्रेस प्रदेशध्यक्ष असलेल्या रेवंत रेड्डी यांनी अस्मान दाखवलं आहे. जी रणनीती कर्नाटक राबवली तीच रणनीती तेलंगणात राबवून काँग्रेसने बाजी मारली, पण हक्काची तीन राज्ये शीतयुद्धाने गमावली आहेत. त्यामुळे तेलंगणात कमावलेल्या आनंदावर राजस्थान आणि मध्य प्रदेश तसेच छत्तीसगडने पाणी फेरले आहे.