Coldriff Cough Syrup : कोल्ड्रिफ सिरपमुळे आतापर्यंत 24 बालकांचा मृत्यू, देशभरात खळबळ, अनेक राज्यांत अलर्ट जारी
Cough Syrup Death Case : महाराष्ट्रात कोल्ड्रिप सिरपवर बंदी घालण्यात आली असून मेडिकलमध्ये याची विक्री केल्यास कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबई : देशभरात कोल्ड्रिफ कफ सिरपमुळे (Coldriff Cough Syrup) अनेक बालकांचा मृत्यू झाल्यानंतर आरोग्य यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे. मध्य प्रदेश (Madhya Pradesh) आणि राजस्थान (Rajasthan) मध्ये या सिरपचे सेवन केल्यानंतर तब्बल 21 बालकांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची दखल घेत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (NHRC) तीन राज्य सरकारांना नोटीस पाठवली असून, सुप्रीम कोर्टात (Supreme Court) याबाबत याचिका दाखल करण्यात आली आहे.
एनएचआरसीने मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) सरकारांना दूषित (Contaminated) औषधांच्या तपासाचे आदेश दिले आहेत. तसेच बनावट औषधांच्या विक्रीवर बंदी आणण्याचे निर्देश दिले आहेत. सुप्रीम कोर्टात दाखल याचिकेत या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे (CBI) देण्याची मागणी करण्यात आली आहे.
Maharashtra Coldriff Ban : महाराष्ट्रात कोल्ड्रिप सिरपवर बंदी
मध्यप्रदेश आणि राजस्थान राज्यातील कफ सिरप औषधाच्या वापरामुळे बालकांच्या मृत्यू प्रकरणानंतर आता राज्य सरकारच्या अन्न औषध प्रशासन विभागाकडून खबरदारी घेतली जात आहे. राज्यात कोल्ड्रिप सिरपवर बंदी घालण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून टोल फ्री नंबर सुरू करण्यात आला आहे. एप्रिल 2017 ते मे 2025 या कालावधीतील कोल्ड्रिप सिरप मेडिकलमध्ये असल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांकावर माहिती देण्याच्या सूचना देण्यात आली आहे.
महाराष्ट्राच्या (Maharashtra) एफडीएने (FDA) रेस्पिफ्रेश टीआर (Respifresh TR) आणि रीलाइफ कफ सिरप (Relife Cough Syrup) यामध्ये सुरक्षित मर्यादेपेक्षा अधिक विषारी डायएथिलीन ग्लायकॉल (DEG) असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे विक्री, वितरण आणि वापरावर बंदी घालण्यात आली आहे. सर्व औषध परवानाधारकांना साठ्याची माहिती तात्काळ द्यावी, असे आदेश देण्यात आले आहेत.
Tamilnadu Cough Syrup News : तमिळनाडूमध्ये फॅक्टरीचा परवाना निलंबित
तमिळनाडू (Tamil Nadu) सरकारच्या चौकशीत कांचीपुरम येथील श्रीसेन फार्मास्युटिकल (Shrisen Pharmaceutical) या कंपनीबाबत मोठे खुलासे झाले आहेत. 44 पानांच्या अहवालात 325 मोठ्या आणि 39 गंभीर त्रुटी आढळल्या आहेत. कंपनीने गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेसचे (GMP) पालन केले नाही आणि नॉन-फार्मास्युटिकल दर्जाच्या प्रोपलीन ग्लायकॉलचा वापर करून सिरप तयार केला. या केमिकलमध्ये 48.6 टक्के डायएथिलीन ग्लायकॉल आणि एथिलीन ग्लायकॉल आढळले, जे मानवासाठी अत्यंत विषारी ठरतात.
औषध निर्मिती अत्यंत अस्वच्छ, कीटकयुक्त आणि गंधयुक्त वातावरणात होत असल्याचेही चौकशीत दिसून आले. त्यानंतर तमिळनाडू सरकारने फॅक्टरीचा परवाना तत्काळ प्रभावाने रद्द केला.
Cough Syrup Ban : पंजाब, केरळ आणि यूपीमध्येही विक्रीवर बंदी
मध्य प्रदेशातील घटनांनंतर पंजाब (Punjab), उत्तर प्रदेश (UP) आणि केरळ (Kerala) या राज्यांनीही कोल्ड्रिफ सिरपवर बंदी लागू केली आहे. केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले की, खास समिती स्थापन करून या औषधांच्या व्यवस्थापनावर अहवाल मागवला आहे. खासगी हॉस्पिटल्स आणि औषध दुकानांत कोल्ड्रिफ विक्री होऊ नये, याची खात्री केली जात आहे.
Cough Syrup Deaths : बालकांच्या मृतांची आकडेवारी
मध्य प्रदेशात मृत्यू : 21 (छिंदवाडा - 18, बैतूल - 2, पंढुरना - 1)
राजस्थानात मृत्यू : 3
एकूण मृत्यू : 24 मुलं
Cough Syrup Latest News : बालकांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करावी
मध्य प्रदेशात कफ सिरप प्यायल्याने झालेल्या मुलांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. एका वकिलाने दाखल केलेल्या जनहित याचिकेत दूषित कफ सिरपचं उत्पादन, नियमन, चाचणी आणि वितरण याची सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या देखरेखीखाली चौकशी आणि चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
ही बातमी वाचा:


















