Nashik Crime Mama Rajwade: नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला! लोंढे पिता-पुत्रानंतर मामा राजवाडेंकडूनही पोलिसांनी वदवून घेतलं
Nashik Crime Mama Rajwade: शिवसेना ठाकरे गटातू भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच मामा राजवाडे यांना अटक करण्यात आली आहे.

Nashik Crime Mama Rajwade: शिवसेना ठाकरे गटातून (Shiv Sena UBT) भाजपमध्ये (BJP) प्रवेश केल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच मामा राजवाडे (Mama Rajwade) यांना अटक करण्यात आली आहे. गंगापूर रोडवरील गोळीबार प्रकरणात त्यांचा सहभाग असल्याच्या संशयावरून नाशिक गुन्हे शाखेने तब्बल 15 तास कसून चौकशी केली आणि अखेर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज शुक्रवारी (दि. 10) नाशिक दौऱ्यावर आहेत. मात्र मुख्यमंत्री नाशिकमध्ये दाखल होण्याच्या काही तास आधीच ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. या अटकेमुळे नाशिकच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
Nashik Crime Mama Rajwade: 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला'
दरम्यान, मामा राजवाडे यांना कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टात हजर करण्यापूर्वी "नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला", असे नाशिक पोलिसांनी मामा राजवाडेंकडून वदवून घेतले. तसेच माजी नगरसेवक प्रकाश लोंढे आणि त्यांच्या टोळीतील सदस्यांकडून देखील काल पोलिसांनी नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला असे वदवून घेतले होते. नाशिक पोलिसांनी केलेल्या या कारवाईची आता जोरदार चर्चा नाशिकमध्ये रंगली आहे.
Nashik Crime Mama Rajwade: अजय बागुलपाठोपाठ मामा राजवाडेंना बेड्या
गंगापूर रोडवरील गोळीबार प्रकरणात भाजप नेते सुनील बागुल यांचा पुतण्या अजय बागुल हा फरार आहे. त्यातच आता मामा राजवाडे यांना अटक झाल्याने प्रकरण अधिकच गंभीर झालं आहे. जुन्या वैमनस्यातून गोळीबार झाल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. अद्याप इतर आरोपी फरार आहेत. मामा राजवाडे हे ठाकरे गटात नाशिक शहराचे माजी महानगरप्रमुख होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. भाजप प्रवेशामुळे राजवाडेंनी त्यांच्या इमेजला नवा चेहरा द्यायचा प्रयत्न केला होता, मात्र ही अटक भाजपसाठी राजकीय डोकेदुखी ठरू शकते.
राज्य आणि देश, विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; Video
इतर महत्त्वाच्या बातम्या


















