प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजनेत महाराष्ट्रातील 9 जिल्ह्याची निवड, मराठवाड्यातील तीन, तुमचा जिल्हा आहे का?
महाराष्ट्र राज्यस्तरीय कार्यक्रम कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सभागृह, पुणे या ठिकाणी संपन्न होत आहे.

मुंबई : "शेतकऱ्यांच्या न्यायासाठी सातत्याने केलेल्या प्रयत्नांना अखेर यश मिळालं आहे. प्रधानमंत्री धन धान्य कृषी योजना ही शेतकऱ्यांच्या (Farmers) उत्पन्नात वाढ करून त्यांना आत्मनिर्भर बनविण्याच्या दिशेने एक ठोस पाऊल आहे. केंद्र सरकारने राज्यातील 9 जिल्ह्यांचा यात समावेश केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या हस्ते उद्या दिल्लीत या कार्यक्रमाचा शुभारंभ होणार आहे. राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवावा असं आवाहन.” कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं आहे. महाराष्ट्र राज्यस्तरीय कार्यक्रम कृषिमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray bharne) यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी पुणे (Pune) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सभागृह, पुणे या ठिकाणी संपन्न होत आहे.
शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री धन धान्य कृषी योजना (PMDDKY) जाहीर करण्यात आली असून, या योजनेमध्ये कमी उत्पादकता असलेले, कमी सिंचन क्षमता असलेले, कृषी कर्जाची उपलब्धतेबाबत समस्या असलेल्या देशातील 100 जिल्ह्यांची निवड केंद्र शासनाने केली आहे. महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांची निवड झाली आहे. यात पालघर, रायगड, धुळे, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या 9 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. म्हणजेच, मराठवाड्यातील 3 जिल्ह्यांचा समावेश आहे. मात्र, पश्चिम महाराष्ट्रातील एकही जिल्हा या यादीत नाही.
या योजनेचा उद्देश शेतीत सुधारणा, उत्पादन वाढ, पीक विविधीकरण आणि शाश्वत शेतीला चालना देणे हा आहे. पुढील ६ वर्षे योजना राबवली जाणार असून या योजनेअंतर्गत दरवर्षी 24,000 कोटींचा निधी खर्च करण्याची तरतूद करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील निवडलेल्या जिल्ह्यांमध्ये धान्य साठवण, प्रक्रिया, सिंचन सुधारणा, तसेच स्थानिक पातळीवरील रोजगार निर्मिती यावर भर दिला जाणार आहे.
कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी या निर्णयाचे स्वागत करताना सांगितले की, “राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेमुळे थेट लाभ मिळेल. शाश्वत शेती, पाणी बचत, आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून आपल्या शेतकऱ्यांचा आत्मविश्वास अधिक दृढ होईल. ही योजना म्हणजे ‘शेतीला बळ आणि शेतकऱ्याला दिलासा’ आहे. उद्याच्या कार्यक्रमात कृषी क्षेत्रात प्रयोगशील व प्रगतिशील कामगिरी करणारे 300 हून अधिक शेतकरी सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमांतर्गत केंद्र आणि राज्य सरकारांच्या एकत्रित उपक्रमांतर्गत ११ विभागांच्या ३६ योजना एकत्रीत राबवल्या जाणार आहे. ग्रामपंचायत स्तरावर तसेच कृषी विज्ञान केंद्रे, बाजार समित्या, किसान समृद्धी केंद्रे आणि सहकारी पतपुरवठा संस्था या सर्व स्तरांवर कार्यक्रमांची अंमलबजावणी होईल.”
पिकांची उत्पादकता वाढवणे हाच उद्देश (Farmers Crops)
सद्यस्थितीमध्ये राज्यांमध्ये केंद्र व राज्य शासनाद्वारे कार्यान्वित असलेल्या 36 हून अधिक केंद्रीय आणि राज्य योजनांच्या अभिसरणाद्वारे पिकांची उत्पादकता वाढवणे, पिक उत्पादनाची शाश्वतता सुनिश्चित करणे तसेच काढणीपश्चात तंत्रज्ञान व पतपुरवठा प्रणाली मजबूत करण्याच्या उद्देशाने देशातील १०० आकांक्षित जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणार आहे. उद्या प्रधानमंत्री धन– धान्य कृषि योजना, नैसर्गिक शेती व कडधान्य अभियान अंतर्गत मा. पंतप्रधान महोदयांच्या हस्ते शुभारंभ कार्यक्रम सर्व जिल्हा मुख्यालय, सर्व कृषी विज्ञान केंद्र, सर्व तालुका मुख्यालय, सर्व ग्रामपंचायत, सर्व प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र, सर्व प्राथमिक सहकारी कृषि पतपुरवठा पतसंस्था (PACS), सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहेत. यामध्ये लोकप्रतिनिधी, कृषि व संलग्न विभागातील अधिकारी/कर्मचारी, कृषि विद्यापीठे /कृषि विज्ञान केद्रांचे शास्त्रज्ञ, कृषि पुरस्कार प्राप्त शेतकरी, पीक स्पर्धा विजेती शेतकरी, नैसर्गिक शेती करीत असलेले शेतकरी, शेतकरी गट/शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांचा समावेश केल्याबद्दल भरणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिहं चौहान यांचे आभारही भरणेंनी व्यक्त केले आहेत.

























