(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Chandrayan 3 : प्रज्ञान रोवरचा चंद्रावर पहिलाच 'मून वॉक', मेड इन इंडिया, मेड फॉर मून : इस्रो
Chandrayan 3 : चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहचणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. काही दिवसांपूर्वी रशियाचं लुना - 25 हे चांद्रयान चंद्रावर कोसळलं होतं.
भारत : भारताची महत्त्वकांक्षी मोहिम चांद्रयान - 3 (Chandrayan 3) ने बुधवार (23 ऑगस्ट) रोजी चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग केलं. संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलं. ज्यानंतर संपूर्ण देशात जल्लोष साजरा करण्यात आला. लँडिंगच्या जवळपास चार तासांनंतर प्रज्ञान रोवर विक्रम लँडरच्या बाहेर काढण्यात आलं आणि त्याने चंद्रावर मून वॉक देखील केला. यासंदर्भातील माहिती इस्रोने (ISRO) ट्विट करत दिली आहे.
इस्रोने काय म्हटलं ट्वीटमध्ये
इस्रोच्या शास्रज्ञांच्या या यशाचं कौतुक संपूर्ण जगातून सध्या होत आहे. चांद्रयान -3 च्या मॉड्यूलमध्ये विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोवर यांचा समावेश होता. यातील विक्रम लँडर हे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार होतं तर प्रज्ञान रोवर हे चंद्रावर फिरणार होतं. विक्रम लँडर हे चंद्रावर उतरलं आणि चार तासांना प्रज्ञान रोवर हे विक्रम लँडरच्या बाहेर आलं. त्यानंतर इस्रोने ट्विट करत म्हटलं की, प्रज्ञान रोवर हे विक्रम लँडरच्या बाहेर आले असून त्याने चंद्रावर मून वॉक देखील केला आहे.
Chandrayaan-3 Mission:
— ISRO (@isro) August 24, 2023
Chandrayaan-3 ROVER:
Made in India 🇮🇳
Made for the MOON🌖!
The Ch-3 Rover ramped down from the Lander and
India took a walk on the moon !
More updates soon.#Chandrayaan_3#Ch3
चांद्रयान -3 ने पाठवले चंद्राचे फोटो
चांद्रयान -3 हे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवण्यासाठी योग्य जागेची गरज होती. कारण सॉफ्ट लँडिंग केल्यानंतर प्रज्ञान रोवरला फिरण्यासाठी देखील ती जागा अनुकूल हवी होती. तर विक्रम लँडरच्या यशस्वी लँडिंगनंतर चंद्राच्या पृष्ठभागाचे फोटो चांद्रयानाने तात्काळ पाठवले. दरम्यान भारताच्या चांद्रयानाला संपूर्ण देशभरातून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
अमेरिका आणि युरोपीय संस्थांनी दिल्या भारताला शुभेच्छा
अमेरिका आणि युरोपिय अंतराळ संस्थांनी देखील भारताचं अभिनंदन केलं आहे. भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा हा पहिला देश ठरला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणं हे खूप आव्हानात्मक होतं. त्यामुळे भारताने हे आव्हान स्विकारुन ते यशस्वीरित्या पूर्ण देखील केलं आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील यावेळी इस्रोच्या शास्रज्ञांचं अभिनंदन करुन त्यांचं कौतुक केलं. आता भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर संशोधन करणार आहे. त्यामुळे चंद्रावरील अनेक शोध आता भारताच्या नावावर होणार आहेत. यासाठी संपूर्ण भारताकडून इस्रोचे आभार मानत आहे.