Chandrayaan-3 updates : चांद्रयान-3 मोहिमेसाठी आज महत्त्वाचा दिवस...चंद्रावर उगवणार सकाळ, 'प्रज्ञान' अॅक्टिव्ह होणार?
Chandrayaan-3 updates : चांद्रयान-3 मोहिमेसाठी आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. आज 16 दिवसांच्या स्लीप मोडमधून अॅक्टीव्ह होणार आहे.
नवी दिल्ली : चांद्रयान-3 मोहिमेसाठी (Chandrayaan-3) आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. आता, 16 दिवसांच्या स्लीप मोडनंतर प्रज्ञान रोव्हर (Pragyan Rover) आणि विक्रम लँडर (Vikram Lander) आज, शुक्रवारी इस्रोकडून (ISRO) अॅक्टिव्ह करण्यात येणार आहे. चंद्रावर सूर्यप्रकाश येणार असल्याने लँडर आणि रोव्हरवरील सोलर पॅनेल चार्ज होण्याची शक्यता आहे.
ISRO (SAC) चे संचालक नीलेश देसाई यांनी गुरुवारी (21 सप्टेंबर) वृत्तसंस्था पीटीआयला सांगितले की आम्ही 22 सप्टेंबर रोजी लँडर आणि रोव्हर दोन्ही सक्रिय करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सगळं काही जुळून आल्यास प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लँडर अॅक्टिव्ह होतील. तसे झाल्यास आपल्याला चंद्राच्या पृष्ठभागावरील आणखी माहिती मिळण्यास मदत होईल. याचा फायदा चंद्राच्या संशोधनात होईल, असेही त्यांनी म्हटले.
सूर्याच्या प्रकाशाने सोलर पॅनल चार्ज होण्याची आशा
सौर पॅनेल सूर्यप्रकाशाने चार्ज होणे अपेक्षित आहे. विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर हे दोन्ही चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आहेत. या ठिकाणी आज दिवस उजाडेल आणि सूर्यकिरणे येतील. त्यामुळे रोव्हर आणि लँडरचे सोलर पॅनेल चार्ज होतील अशी आशा आहे. रोव्हर आणि लँडरशी पुन्हा संपर्क प्रस्थापित करण्यासाठी इस्रो सज्ज आहे.
नीलेश देसाई यांनी सांगितले की आम्ही लँडर आणि रोव्हर दोन्ही स्लीप मोडवर ठेवले होते. चंद्रावरील रात्रीच्या वेळी तापमान उणे 120-200 अंश सेल्सिअसपर्यंत खाली जाणे अपेक्षित होते. चंद्रावर सूर्योदय झाल्यामुळे, आम्हाला आशा आहे की सोलर पॅनेल आणि इतर गोष्टी 22 सप्टेंबरपर्यंत पूर्णपणे चार्ज होतील. त्यामुळे आम्ही लँडर आणि रोव्हर दोन्ही सक्रिय करण्याचा प्रयत्न करू, असेही त्यांनी सांगितले.
चांद्रयान-3 ने 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग केले होते. इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, अंतराळ विज्ञानाच्या इतिहासात पहिल्यांदा चांद्रयान-3 ने (Chandrayaan-3) चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील (Moon South Pole) मातीचे परीक्षण केले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पहिल्यांदाच एखाद्या देशाने सॉफ्ट लँडिंग केले आहे. चंद्राच्या पृष्ठभागावरील दक्षिण ध्रुवावर सल्फर असल्याचा निर्वाळा प्रज्ञान रोव्हरने दिला आहे. त्याशिवाय, इतर धातू आणि ऑक्सिजनचे प्रमाण आढळले आहे.