(Source: ECI/ABP News/ABP Majha)
लहानपणीच पाहिलेलं स्वप्न, धैर्य अन् चिकाटीच्या जोरावर ISRO मध्ये रुजू, चांद्रयान-3 मोहीमेत मोलाचा वाटा; कोण आहेत वैज्ञानिक कल्पना कालाहस्ती?
Kalpana Kalahasti ISRO: इस्रोच्या सर्वच शास्त्रज्ञांनी रात्रंदिवस एक करत ही मोहीम यशस्वी करण्यासाठी स्वतःला झोकून देत काम केलं. या मोहिमेसाठी अनेकांनी मेहनत घेतली. ही मोहीम यशस्वी होण्यामागे अनेकांचे प्रयत्न आहेत.
Kalpana Kalahasti ISRO: अब चांद हमारी मुठ्ठी में... चांद्रयान-3 (Chandrayaan 3) नं चंद्रावर यशस्वी लँडिंग केलं आणि भारताच्या या यशाची इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद करण्यात आली. या मोहिमेचं खरं श्रेय ISRO च्या वैज्ञानिकांचं आहे. पहिले दोन प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर तिसऱ्या प्रयत्नात इस्रोनं थेट चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लँडिंग केलं. इस्रोच्या सर्वच शास्त्रज्ञांनी रात्रंदिवस एक करत ही मोहिम यशस्वी करण्यासाठी स्वतःला झोकून देत काम केलं. या मोहिमेसाठी अनेकांनी मेहनत घेतली. ही मोहीम यशस्वी होण्यामागे अनेकांचे प्रयत्न आहेत. यामध्ये कल्पना कालाहस्ती (Associate Director Of Chandrayaan 3 Project) यांच्या नावाचा समावेश आहे, त्या इस्रोच्या चांद्रयान-3 प्रकल्पाच्या सहयोगी संचालक म्हणून कार्यरत आहेत. जाणून घेऊया त्यांच्याबद्दल...
कल्पना कालाहस्ती या चित्तूर जिल्ह्यातील रहिवाशी आहेत. त्यांनी चेन्नई येथून B.Tech ECE चं शिक्षण पूर्ण केलं. त्यांचे वडील मद्रास उच्च न्यायालयात कर्मचारी होते, तर आई गृहिणी होती. कल्पना यांनी बालपणीच ISRO मध्ये काम करण्याचं स्वप्न पाहिलं होतं. मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी आपलं स्वप्न पूर्णही केलं. 2000 साली त्यांनी आपलं बी.टेक पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आणि इस्रोमध्ये वैज्ञानिक म्हणून रुजू झाल्या. सर्वात आधी श्रीहरिकोटा इथे पाच वर्ष त्यांनी काम केलं. त्यानंतर 2005 मध्ये त्यांची बदली बंगळुरूमधील एका उपग्रह केंद्रात करण्यात आली. तिथे पाच उपग्रहांच्या डिझाइनमध्ये त्यांनी सहभाग घेतला.
2019 मध्ये श्रीहरिकोटा रॉकेट सेंटरमधून प्रक्षेपित झालेल्या चांद्रयान-2 प्रकल्पातही कल्पना कालाहस्ती यांचा सहभाग होता. चांद्रयान-2 मोहिमेतही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. सध्या त्या चांद्रयान-3 प्रकल्पाच्या सहयोगी संचालक म्हणून कार्यरत आहेत.
चांद्रयान 3 मोहीम यशस्वी झाल्यानंतर सहयोगी प्रकल्प संचालक कल्पना म्हणाल्या की, "माझ्या आणि माझ्या टीमसाठी हा सर्वात अविस्मरणीय क्षण आहे. आम्ही गेली अनेक वर्षे याचसाठी प्रयत्न करत होतो. आम्ही आमचं ध्येय साध्य केलं आहे."
एक सॅटेलाईट तयार करण्यासाठी लागतो पाच वर्षांचा अवधी
एक सॅटेलाईट तयार करण्यासाठी साधारणपणे पाच वर्षांपेक्षा जास्त वेळ लागतो. आधी डिझाईन, मग हार्डवेअर वगैरे तयार होतात. हे सर्व झाल्यावर अनेक चाचण्या करून पाहिल्या जातात. येथे त्याची पुन्हा चाचणी करून रॉकेटला जोडून निंगीला पाठवलं जातं.
चंद्रयान 3 चं यशस्वी लँडिंग
भारताच्या इतिहासातली सर्वात मोठी, सर्वात अभिमानाची आणि सर्वात मोठ्या गौरवाची... भारतातील 140 कोटी जनतेची मान आज अभिमानाने वर गेलीय... ऊर आनंदाने भरून आलाय... आणि प्रत्येकजण इस्रोच्या शास्त्रज्ञांना कडक सॅल्युट करत एवढचं म्हणतोय... ‘चांद्रयान-3’नं चंद्रावर केलेल्या यशस्वी लॅन्डींगमुळे अमेरिका, रशिया, चीननंतर भारत जगातील चौथी अंतराळशक्ती ठरला आहे. ‘चांद्रयान-3’च्या यशानं जगात भारताची मान उंचावली असून प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल, अशी ही ऐतिहासिक घटना आहे. देशातील शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, संशोधकांच्या, देशवासियांच्या अथक परिश्रमांचं हे फळ आहे. आता विक्रमपासून प्रज्ञान रोवर वेगळे झाले असून आपल्या कामाला सुरुवात केली आहे.