'तिनं' कमांड दिली अन् चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर स्थिरावलं; जाणून घ्या, 'रॉकेट वुमन' डॉ. रितू करिधाल यांच्याबाबत...
Chandrayaan-3 Landing: सगळ्यांची धाकधूक वाढली होती. शेवटची 15 मिनिटं महत्त्वाची होती. चांद्रयान 3 चंद्राच्या पृष्ठभागावर स्थिरावणार होतं. पण चांद्रयानाला कमांड देत होत्या 'रॉकेट वुमन'.
Chandrayaan 3 Launch Date and Time: चांद्रयान-3 ची मोहीम फत्ते झाली. ISRO नं देशाच्या शिरपेचात मानाता तुरा खोवला. जगभरातून इस्रोवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पण चांद्रयान 3 च्या यशस्वी लँडिंगमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली ती रॉकेट वुमन डॉ. रितू करिधाल यांनी. मूळच्या लखनौच्या असलेल्या डॉ. रितु करिधाल यांच्या खांद्यावर चांद्रयानाच्या यशस्वी लँडिंगची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
इस्रोनं दिलेल्या माहितीनुसार, यावेळी चांद्रयान-3 यशस्वीपणे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवण्याची जबाबदारी वरिष्ठ महिला वैज्ञानिक डॉ. रितू करिधाल यांच्याकडे सोपवण्यात आली होती. त्या चांद्रयान-3 च्या मिशन डायरेक्टर असल्याची माहिती इस्रोनं दिली आहे. मोहिमेचे प्रकल्प संचालक पी. वीरा मुथुवेल आहेत. याआधी डॉ. रितू यांनी मंगळयानाच्या वेळई डेप्युटी ऑपरेशन डायरेक्टर आणि चांद्रयान-2 मध्ये मिशन डायरेक्टर म्हणून कार्यरत होत्या. यावेळी चांद्रयान-3 मध्ये ऑर्बिटर नसून एक प्रोपल्शन मॉड्यूल आहे, जो कम्युनिकेशन सॅटेलाइटप्रमाणे काम करेल.
लहानपणापासूनच होतं अंतराळाबाबत कुतुहल
डॉ. रितू करिधाल यांचा जन्म 1975 मध्ये लखनौच्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. लहानपणापासूनच त्यांना चंद्र-तारे आणि अवकाश यांबाबत कुतुहल होतं. इस्रो आणि नासाशी संबंधित वर्तमानपत्रातील लेख, माहिती आणि छायाचित्रं यांची कात्रणं गोळा करणं हा तर रितू यांचा छंदच होता. त्यांनी लखनौ विद्यापीठातून भौतिकशास्त्रात बीएससी आणि एमएससीचं शिक्षण घेतलं. त्यानंतर एरोस्पेस अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर पदवी घेण्यासाठी आयआयएससी, बंगळुरू येथे प्रवेश घेतला. डॉ. करिधाल यांनी नोव्हेंबर 1997 पासून इस्रोमध्ये अभियंता म्हणून काम करण्यास सुरुवात केली. आणि ऐतिहासिक मोहीम ठरलेल्या चांद्रयान 3 च्या मिशन डायरेक्टर आहेत. चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीपणे लँड होण्यामागे डॉ. रितू यांचा मोठा वाटा आहे.
चंद्रयान 3 चं यशस्वी लँडिंग
भारताच्या इतिहासातली सर्वात मोठी, सर्वात अभिमानाची आणि सर्वात मोठ्या गौरवाची... भारतातील 140 कोटी जनतेची मान आज अभिमानाने वर गेलीय... ऊर आनंदाने भरून आलाय... आणि प्रत्येकजण इस्रोच्या शास्त्रज्ञांना कडक सॅल्युट करत एवढचं म्हणतोय... 'चांद्रयान-3'नं चंद्रावर केलेल्या यशस्वी लॅन्डींगमुळे अमेरिका, रशिया, चीननंतर भारत जगातील चौथी अंतराळशक्ती ठरला आहे. 'चांद्रयान-3'च्या यशानं जगात भारताची मान उंचावली असून प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल, अशी ही ऐतिहासिक घटना आहे. देशातील शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, संशोधकांच्या, देशवासियांच्या अथक परिश्रमांचं हे फळ आहे. आता विक्रमपासून प्रज्ञान रोवर वेगळे झाले असून आपल्या कामाला सुरुवात केली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :