(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Chandrayaan 3 Landing : विक्रम लँडरच्या कॅमेऱ्यातून चंद्र कसा दिसतो? इस्रोनं शेअर केला खास व्हिडीओ; तुम्ही पाहिला का?
Chandrayaan-3 Moon Mission : भारताचं चांद्रयान-3 बुधवारी 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 वाजून 04 मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे.
श्रीहरीकोटा : अवघ्या जगाच्या नजरा भारताच्या चंद्र मोहिमेकडे आहेत. इस्रोचं (ISRO Moon Mission) चांद्रयान-3 (Chandrayaan-3) चंद्रावर उतरण्यासाठी सज्ज झालं आहे. चांद्रयान-3 बुधवारी 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 वाजून 04 मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठभागावर (Chandrayaan-3 Landing) उतरणार आहे. चांद्रयान-3 चंद्राच्या आणखी जवळ जात आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर (ISRO Lunar Mission) उतरण्याआधी चांद्रयान-3 च्या विक्रम लँडरने चंद्राचे फोटो आणि व्हिडीओ काढले आहेत. इस्रोने हे फोटो आणि व्हिडीओच्या ट्विटरच्या माध्यमातून शेअर केले आहेत.
अवकाशातून चंद्र कसा दिसतो?
भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने ट्वीट करत विक्रम लँडरने चंद्राचे जवळून काढलेले फोटो आणि व्हिडीओ शेअर केला आहे. विक्रम लँडरच्या कॅमेऱ्यात चंद्र कसा दिसतो, हे या व्हिडीओमधून तुम्हाला स्पष्ट दिसून येईल. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, चंद्राच्या पृष्ठभागावर प्रकाश आहे. तसेच चंद्राच्या पृष्ठभागावर ठिकठिकाणी खड्डे दिसत आहेत. चांद्रयान-3 च्या 'लँडर इमेजर कॅमरा 4' ने हे चंद्राचे फोटो काढले आहेत. 20 ऑगस्ट रोजी हे फोटो काढण्यात आले आहेत.
भारत चंद्रावर पोहोचणारा चौथा देश ठरणार
भारत चांद्रयान-3 या महत्त्वाकांक्षी चंद्रमोहिमेद्वारे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याचा प्रयत्न करणार आहे. यामध्ये यश मिळाल्यास भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश ठरणार आहे. चांद्रयान-3 23 ऑगस्ट रोजी चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्याचा प्रयत्न करणार आहे. याकडे संपूर्ण जगाच्या नजरा लागल्या आहेत. भारत चंद्रमोहिमेत यशस्वी झाल्यास चंद्रावर पोहोचणारा चौथा देश ठरणार आहे.
इस्रोनं शेअर केलेला खास व्हिडीओ पाहा
.... and
— ISRO (@isro) August 22, 2023
The moon as captured by the
Lander Imager Camera 4
on August 20, 2023.#Chandrayaan_3 #Ch3 pic.twitter.com/yPejjLdOSS
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याचं कारण काय?
दरम्यान, रशियाचं लुना-25 अंतराळ यान लँडिंगच्या एक दिवस आधीच अपघातग्रस्त झालं आणि तब्बल 50 वर्षांनंतर रशियाची चंद्रमोहिम अयशस्वी ठरली. लँडिंगवेळी चंद्राच्या पृष्ठभागावर आदळल्याने लुना-25 कोसळलं. लुना-25 ही चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याचा प्रयत्न करणार होतं. चंद्राचा दक्षिण ध्रुव कायम अंधारात असतो. तेथे पाण्याचे साठे असण्याची शक्यता आहे. त्यामुळे चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे.
इस्रोककडून लँडिंगसाठीची सर्व तयारी पूर्ण
इस्रो प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार, चांद्रयान-3 ने आतापर्यंतचे सर्व टप्पे ठरलेल्या वेळेत पूर्ण केले आहेत. त्यामुळे चिंता करण्याचं काही कारण नाही. चांद्रयान-3 चं चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वी लँडिंग होईल, अशी खात्री त्यांनी व्यक्त केली आहे. इस्रोककडून लँडिंगसाठीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. चांद्रयान-3 कॅमेऱ्यांद्वारे लँडिंगसाठी सुरक्षित जागा शोधतं आहे.