(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Chandrababu Naidu : चंद्राबाबू नायडूंनी चौथ्यांदा घेतली आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ, पवन कल्याण उपमुख्यमंत्री; नव्या सरकारमध्ये किती मंत्री?
चंद्राबाबू नायडू यांच्यानंतर जनसेना प्रमुख आणि अभिनेता पवन कल्याण यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. चंद्राबाबू नायडू यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्र्यांसह 23 मंत्री आहेत.
Chandrababu Naidu : तेलुगु देसम पार्टी (टीडीपी) प्रमुख एन चंद्राबाबू नायडू यांनी बुधवारी (12 जून) चौथ्यांदा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. विजयवाडा येथील केसरपल्ली आयटी पार्क येथे झालेल्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि बंदी संजय कुमार यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. अमित शाह आणि जेपी नड्डा मंगळवारी संध्याकाळीच या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी हैदराबादला पोहोचले होते.
चंद्राबाबू नायडू यांच्यानंतर जनसेना प्रमुख आणि अभिनेता पवन कल्याण यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. चंद्राबाबू नायडू यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्र्यांसह 23 मंत्री आहेत. टीडीपीचे 19, पवन कल्याणसह जनसेनेचे 3 आणि भाजपचा एक मंत्री आहे. एक पद रिक्त ठेवण्यात आले आहे.
I thank the Hon'ble Prime Minister, Shri @narendramodi Ji, for gracing the swearing-in ceremony in Amaravati with his august presence today. I thank Union Cabinet Ministers @amitshah Ji, @JPNadda Ji, @nitin_gadkari Ji, the Chief Minister of Maharashtra Shri @mieknathshinde Ji,… pic.twitter.com/luNkYXh41o
— N Chandrababu Naidu (@ncbn) June 12, 2024
नारा लोकेशही मंत्री झाले
चंद्राबाबू नायडू यांचे पुत्र आणि टीडीपीचे सरचिटणीस नारा लोकेश यांनाही चंद्राबाबू नायडू सरकारमध्ये मंत्री करण्यात आले आहे. याशिवाय टीडीपी आंध्र प्रदेशचे अध्यक्ष के. अचन्नायडू आणि जनसेना पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीचे अध्यक्ष नदेंदला मनोहर हेही मंत्रिमंडळात आहेत. टीडीपीच्या मंत्र्यांमध्ये 17 नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. जनसेना पक्षाकडे पवन कल्याण, नदेंदला मनोहर आणि कंदुला दुर्गेश हे तीन मंत्री आहेत, तर सत्यकुमार यादव हे भाजपच्या कोट्यातील एकमेव मंत्री आहेत. चंद्राबाबू नायडू यांच्या मंत्रिमंडळात तीन महिला आहेत. एन मोहम्मद फारुख यांच्या रूपाने एका मुस्लिम चेहऱ्याचाही मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे.
कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या?
2024 च्या लोकसभा निवडणुकीसोबतच आंध्र प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकाही झाल्या. येथे तेलुगू देसम पक्षाने जनसेना आणि भाजपसोबत युती करून निवडणूक लढवली होती. तिन्ही पक्षांनी मिळून जगन मोहन रेड्डी यांच्या सरकारचा पराभव केला. आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत NDA ने 175 पैकी 164 जागा जिंकल्या. चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपीला 135, पवन कल्याणच्या जनसेनेला 21 आणि भाजपला 8 जागा मिळाल्या आहेत. तर जगन मोहन रेड्डी यांच्या वायएसआरसीपीला केवळ 11 जागा मिळाल्या. काँग्रेसने खातेही उघडले नाही.
इतर महत्वाच्या बातम्या