(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ICICI बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांचा राजीनामा
संदीप बक्शी यांच्यावर ICICI बँकेच्या एमडी आणि सीईओ पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
मुंबई : ICICI बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. बँकेने कोचर यांचा राजीनामा मंजूर केला आहे. तसेच कोचर यांना ICICI बँकेच्या सर्व जबाबदारीतून मुक्त केलं जात आहे, असं बँकेने स्पष्ट केलं आहे.
चंदा कोचर यांच्याविरोधात व्हिडीओकॉन कर्ज प्रकरणी चौकशी सुरू आहे. त्यामुळे कोचर सध्या सक्तीच्या रजेवर होत्या. चंदा कोचर यांच्या राजीनामाच्या बातमीनंतर ICICI बँकेच्या शेअरमध्ये तेजी आली. बँकेचे शेअर तीन टक्क्यांनी वाढून 313 रुपयांवर पोहोचले.
याआधीच संदीप बक्शी यांच्यावर ICICI बँकेच्या एमडी आणि सीईओ पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पुढील पाच वर्षांसाठी बक्शी यांना पदासाठी नियुक्त करण्यात आलं आहे. चंदा कोचर यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या चौकशीवर याचा काहीही परिणाम होणार नाही, असं ICICI बँकेने स्पष्ट केलं आहे.
धूत यांच्या व्हिडीओकॉन ग्रुपला 20 बँकांच्या ग्रुपनं कर्ज दिलं होतं. ज्यात आयसीआयसीआय बँकेचा वाटा 10 टक्के होता. मात्र धूत यांनी आयसीआयसीआयकडून मिळणाऱ्या कर्जाच्या बदल्यात चंदा कोचर यांचे पती दीपक यांच्यासोबत मिळून न्यू पॉवर रिन्यूएबल नावानं कंपनी उघडली. ज्यात दीपक यांची 50 टक्क्यांची भागीदारी होती.
हा सरळ सरळ भ्रष्टाचार असल्याचा आरोप करत शेअरहोल्डर अरविंद गुप्तांनी थेट पंतप्रधानांना पत्र लिहून तक्रार केली होती.
वेणुगोपाल धूत आणि आयसीआसीआय बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर आणि त्यांच्या दोन नातेवाईकांनी मिळून डिसेंबर 2008 मध्ये एक कंपनी स्थापन केली. या कंपनीला ‘घरच्याच’ आयसीआसीआय बँकेने तब्बल 64 कोटी रुपयांचं कर्ज दिलं. मात्र अवघ्या काही दिवसात या कंपनीची मालकी अवघ्या 9 लाख रुपयात दीपक कोचर यांना मिळाली.
माजी न्यायमूर्तींकडून चौकशी
चंदा कोचर यांच्यावरील आरोपांची चौकशी सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती बीएन श्रीकृष्ण यांच्यावर सोपवण्यात आली आहे. न्यायमूर्ती श्रीकृष्ण यांच्या नेतृत्त्वात आयसीआयसीआय बोर्डाने व्हिडीओकॉन कर्ज प्रकरणाची स्वतंत्र चौकशी केली आहे. श्रीकृष्ण हे अर्थव्यवहाराचे जाणकार असल्याने ते याप्रकरणाची काटेकोर तपासणी करतील, असा विश्वास आहे.