Champai Soren : निवडणुकांची रणधुमाळी सुरु होताच पक्षांतराचं वारं, माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन भाजपच्या वाटेवर? पक्षाचे आमदारही मोठा निर्णय घेण्याची शक्यता
Champai Soren : विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु होत असतानाच झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन भाजपमध्ये जाणार अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.
रांची : झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि मंत्री चंपई सोरेन (Champai Soren) लवकरच भाजपमध्ये जाणार अशा चर्चा सुरु आहेत. चंपई सोरेन हे हेमंत सोरेन (Hemant Soren) यांना ईडीनं अटक केल्यानं मुख्यमंत्री बनले होते. मात्र, हेमंत सोरेन यांची जामिनावर मुक्तता झाल्यानंतर चंपई सोरेन यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. चंपई सोरेन पुन्हा एकदा हेमंत सोरेन यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून कार्यरत आहेत. इंडिया टीव्हीनं सूत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या बातमीनुसार चंपई सोरेन भाजप नेत्यांच्या संपर्कात आहेत. झारखंड मुक्ती मोर्चाचे आमदार लोबिन हेम्ब्रोम यांच्यासह इतर आमदार चंपई सोरेन यांच्यासोबत भाजपमध्ये जाऊ शकतात अशी चर्चा आहे.
चंपई सोरेन भाजपमध्ये प्रवेश करु शकतात अशी चर्चा असताना आणखी काही आमदार देखील हेमंत सोरेन यांची साथ सोडू शकतात. झारखंड मुक्ती मोर्चाचे काही दिग्गज नेते दिल्लीत अमित शाह यांच्या भेटीसाठी पोहोचल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
फेब्रुवारी महिन्यात ईडीनं हेमंत सोरेन यांना अटक केल्यानंतर चंपई सोरेन यांना मुख्यमंत्री करण्यात आलं होतं. हेमंत सोरेन पाच महिने ईडीच्या तुरुगांत होते. या पाच महिन्यांच्या कालावधीमध्ये चंपई सोरेन यांनी राज्याचा कारभार पाहिला. 28 जूनला हेमंत सोरेन यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली होती. हेमंत सोरेन यांची जामिनावर मुक्तता झाल्यानंतर पक्षाच्या आमदारांनी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड केली. चंपई सोरेन यांनी राजीनामा दिला आणि हेमंत सोरेन पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनले.
चंपई सोरेन कोण आहेत?
चंपई सोरेन यांची झारखंड राज्याच्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे. चंपई सोरेन यांचं वय 76 वर्ष आहे. 1990 पासून झारखंड राज्याच्या निर्मितीच्या लढ्यामध्ये ते सहभागी होते. 1991 मध्ये ते तत्कालीन बिहार विधानसभेचे आमदार बनले होते. चंपई सोरेन यांनी 2005,2009,2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवलेला आहे.
झारखंडमध्ये काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चा, राजदचं सरकार
झारखंडच्या 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाला होता. झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलासह डाव्या पक्षांच्या पाठिंब्यावर आघाडी सरकार सत्तेत आहे. झारखंडच्या विधानसभेची निवडणूक महाराष्ट्राच्या निवडणुकीसोबत होणार का ते पाहावं लागणार आहे.
दरम्यान, चंपई सोरेन यांनी पक्ष सोडल्यास हेमंत सोरेन यांना तो मोठा धक्का असू शकतो. हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन देखील दरम्यानच्या काळात राजकारणात सक्रीय झाल्या आहेत.
इतर बातम्या :