जामिनानंतर छगन भुजबळ पहिल्यांदा महाराष्ट्र सदनात
तुरुंगातून जामिनावर सुटका झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ पहिल्यांदा दिल्लीतील महाराष्ट्र सदनात आले होते.
नवी दिल्ली : तुरुंगातून जामिनावर सुटका झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ पहिल्यांदा दिल्लीतील महाराष्ट्र सदनात आले होते. विशेष म्हणजे महाराष्ट्र सदनाच्या बांधकाम घोटाळ्याप्रकरणीच भुजबळांना तुरुंगात जावं लागलं होतं.
महाराष्ट्र सदनाला भेट दिल्यानंतर भुजबळांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. महाराष्ट्र सदनाच्या बांधकामादरम्यान अनेक छोट्या-छोट्या गोष्टींकडे लक्ष दिलं. राजस्थानातील राजवाडे, केळकर म्युझियम, शनिवार वाडा यांचा अभ्यास केल्याचं भुजबळांनी यावेळी सांगितलं.
दिल्लीतील जुन्या महाराष्ट्र सदनाबद्दल फार वाईट बोललं जायचं. त्यामुळे सर्वांच्या पंसतीला उतरेल असं महाराष्ट्र सदन बांधण्याचं मोंठं आव्हान आमच्यासमोर होतं. आज महाराष्ट्र सदन सर्वांना आवडतंय याचा आनंद आहे, असंही भुजबळ म्हणाले.
महाराष्ट्र सदनाचं बांधकाम करताना महाराष्ट्राची संस्कृती आणि वैभव दिसलं पाहिजे, हे डोक्यात होतं. तसेच महाराष्ट्र सदनाच्या कामात गैरव्यवहार झालेला नाही, हे सांगायलाही भुजबळ विसरले नाहीत.