Buddha Purnima : बुद्धांचं आयुष्य हे दीपस्तंभासारखं, मानवतेवर विश्वास असलेल्यांनी एकत्र यावं; पंतप्रधान मोदींचं आवाहन
जगभर तिरस्कार पसरत असताना गौतम बुद्धांनी सांगितलेला शांतीचा मार्ग अनुसरण्याची वेळ आली आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.आज वैशाख बौद्ध पोर्णिमेनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून जगभरातील बौद्ध भिक्खुंशी संवाद साधला.
नवी दिल्ली : आपल्यातील काही घटक हे समाजात तिरस्कार परसरवत आहेत. हे मानवतेसाठी धोकादायक आहे. गौतम बुद्धांचे आयुष्य हे एखाद्या दीपस्तभासारखं आहे. मानवतेवर विश्वास असणाऱ्यांनी एकत्र यावं आणि बुद्धांच्या शिकवणीच्या आधारे मानवजातीसाठी काम करुन ते सुंदर करावं. जगभर तिरस्कार पसरत असताना गौतम बुद्धांनी सांगितलेला शांतीचा मार्ग अनुसरण्याची वेळ आली आहे असं बौद्ध पोर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
आज वैशाख बौद्ध पोर्णिमेनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून जगभरातील बौद्ध भिक्खुंशी संवाद साधला. या कार्यक्रमाचे आयोजन भारत सरकारच्या सांस्कृतीक मंत्रालय आणि आंतरराष्ट्रीय बौद्ध संघाच्या वतीनं संयुक्तपणे करण्यात आलं होतं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "जगासमोर हवामान बदलाचं संकट आवासून उभं आहे, धृवांवरील बर्फ वितळत आहे. जग एका मोठ्या संकटातून जात आहे. अशा वेळी गौतम बुद्धांनी सांगितलेला मार्ग महत्वाचा आहे. निसर्गाचा आदर करणे, पृथ्वीचे संवर्धन करणे ही गौतम बुद्धांची शिकवण आहे. जगभरातल्या मोठ्या अर्थव्यवस्थेपैकी असलेला भारतही शाश्वत विकासाच्या मार्गावर चालत आहे याचा अभिमान आहे."
कोरोनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसल्याचं सांगत मोदी म्हणाले की, "कोरोनामुळे अनेकांना दु:ख आणि वेदना सहन करावी लागली. गेल्या अनेक दशकांत अशा पद्धतीची महामारी आली पाहिली नव्हती."
वर्षभरात कोरोनावर लस शोधणाऱ्या डॉक्टरांचा अभिमान असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. या कार्यक्रमासाठी जगभरातील 50 हून अधिक बौद्ध भिक्खुंनी भाग घेतला होता.
दरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशवासियांना बौद्ध पोर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ते म्हणाले की, "बुद्धांची शिकवण संपूर्ण जगाला दु:ख आणि वेदनेपासून मुक्तीचा मार्ग दाखवते. बुद्धांच्या ज्ञान, करुणा आणि सेवेच्या मार्गावर चालत सर्व देशवासियांनी एकजुटता दाखवावी आणि सर्वांना कोरोनातून मुक्ती मिळावी."
Buddha Purnima greetings to everyone. The teachings of Lord Buddha show us the path of liberation from suffering. Let us follow the path of wisdom, compassion & service shown by the Buddha and get rid of COVID-19 through our collective resolve & concerted efforts.
— President of India (@rashtrapatibhvn) May 26, 2021
महत्वाच्या बातम्या :