(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Petrol-Diesel Price | कच्च्या तेलाचे दर घसरले, भारतात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत 30 टक्के घट झाली आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किमतीत कपात झाली आहे. पेट्रोल आणि डिझेल 23 ते 26 पैशांनी स्वस्त झालं आहे. दुसरीकडे आठवड्याच्या सुरुवातीलाच सेन्सेक्स 1200 अंकानी घसरला. तर निफ्टीही 350 अंकांनी खाली आला आहे.
मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात 30 टक्के घसरण झाली आहे. आखाती देश आणि रशिया यांच्यात तेलाच्या किंमतीवरुन सुरु असलेल्या वादामुळे ही घसरण झाली आहे. 1991 नंतर कच्च्या तेलाच्या किंमतीमधील ही सर्वात मोठी घसरण आहे. याशिवाय कोरोना व्हायरसमुळे मागणी कमी झाल्यानेही दरात घसरण झाल्याचं म्हटलं जात आहे. खरंतर तेलाची मागणी कमी झाली असली तर पुरवठा पूर्वीप्रमाणेच आहे. अशातच तेल निर्यात करणाऱ्या देशाची संघटना ओपेक (OPEC)आणि सहकाऱ्यांमध्ये तेल उत्पादनात कपातीबाबत बैठक झाली होती, पण यात कोणताही तोडगा निघालेला नाही.
या घसरणीमुळे आंतरराष्ट्रीय बेंचमार्क ब्रेंट क्रूड फ्यूचर 14.25 डॉलर म्हणजेच 31.5 टक्क्यांनी कोसळून प्रति बॅरल 31.02 डॉलरवर आला आहे. शुक्रवारी (6 मार्च) याची किंमत प्रति बॅरल 36.06 डॉलर होती. 17 जानेवारी 1991 रोजी पहिलं आखाती युद्ध सुरु झाल्यानंतर कच्च्या तेलाच्या किंमतीमधील ही सर्वात मोठी घसरण आहे. याशिवाय यूएस क्रूड 27 टक्क्यांनी घसरुन 30 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचलं आहे.
पेट्रोल आणि डिझेल स्वस्त आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घसरणीचा परिणाम थेट घरगुती बाजारातही पाहायला मिळत आहे. दिल्ली आणि मुंबईसह देशातील विविध शहरांमध्ये पेट्र्रोलच्या दरात कपात झालेली दिसते. देशात आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 23 ते 26 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली. भारतातील इंधन कंपन्या पेट्रोलियम पदार्थांचे दर दररोज निश्चित करतात. याचे दर आंतरराष्ट्रीय बाजारानुसारही ठरवले जातात.
दिल्लीत पेट्रोलच्या दरात 24 पैसे तर डिझेलच्या दरात 25 पैशांची घसरण झाली आहे. तर मुंबईत पेट्रोल 24 आणि डिझेल 26 पैशांनी स्वस्त झालं आहे. कोलकातामध्ये पेट्रोल 23 पैसे तर डिझेल 25 पैशांनी स्वस्त झालं आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलच्या दरात 25 पैसे आणि डिझेलच्या दरात 26 पैशांनी कपात झाली आहे.
Petrol and diesel prices at Rs 70.59/litre (decrease by Rs 0.24) & Rs 63.26/litre (decrease by Rs 0.25), respectively in Delhi. Petrol and diesel prices at Rs 76.29/litre (decrease by Rs 0.24) & Rs 66.24/litre (decrease by Rs 0.26), respectively in Mumbai. pic.twitter.com/Mv2f5S51nc
— ANI (@ANI) March 9, 2020
शेअर बाजारावरही परिणाम
याशिवाय कोरोना व्हायरसमुळे आशियायी शेअर बाजारातही मोठी घसरण पाहायला मिळतं आहे. भारतीय शेअर बाजाराच्या कारभाराची सुरुवात घसरणीने झाली. सेन्सेक्स 1200 अंकांनी घसरला तर राष्ट्रीय निर्देशांक निफ्टीमध्येही सुमारे 800 अंकांच्या घसरणीची नोंद झाली. सकाळी नऊ वाजता सेन्सेक्समध्ये 1169.74 अंकांनी घसरुन 36,406.88 वर आला. तर निफ्टीमध्ये 332.40 अंकांनी घसरण झाल्याने 10,657.05 वर पोहोचला.
Sensex at 36,445.47, down by 1131.15 points. pic.twitter.com/eCEm5hDvd3
— ANI (@ANI) March 9, 2020
दुसरीकडे जपानाचा निर्देशांक निक्कई 4.4 टक्क्यांनी घसरला. तर आशियातील इतर शेअर बाजारातही 4 ते 5 टक्क्यांच्या घसरणीची नोंद झाली आहे.