फुकटात भाजी न दिल्याने पोलिसाने अल्पवयीन मुलाला ३ महिने जेलमध्ये धाडलं
फुकटात भाजी दिली नाही म्हणून पोलिस कर्मचाऱ्याने अल्पवयीन मुलाला जेलमध्ये टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बिहारची राजधानी पाटणा येथील ही घटना आहे. पंकज कुमार असं या 14 वर्षीय भाजी विक्रेत्या मुलाचं नाव आहे. पंकजला गेल्या तीन महिन्यांपासून बिउर जेलमध्ये डांबून ठेवण्यात आलं आहे.
पाटणा : फुकटात भाजी दिली नाही म्हणून पोलिस कर्मचाऱ्याने अल्पवयीन मुलाला जेलमध्ये टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बिहारची राजधानी पाटणा येथील ही घटना आहे. पंकज कुमार असं या 14 वर्षीय भाजी विक्रेत्या मुलाचं नाव आहे. पंकजला गेल्या तीन महिन्यांपासून बिउर जेलमध्ये डांबून ठेवण्यात आलं आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना प्रकरणाची माहिती मिळताच ४८ तासाच्या आता चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
बिहारच्या अगमकुआं परिसरात पंकज भाजी विक्रीचा व्यवसाय करत होता. त्यावेळी तिथे आलेल्या पोलिस कर्मचाऱ्याने पंकजकडे फुकटात भाजी मागितली. मात्र पंकजने फुकट्या पोलिस कर्मचाऱ्याला फुकटात भाजी देण्यास नकार दिला. त्यावेळी चिडलेल्या पोलिस कर्मचाऱ्याने पंकजवर चोरी आणि बेकायदेशीर हत्यार प्रकरणी खोटा गुन्हा दाखल केला, असा आरोप पंकजच्या वडिलांनी केला आहे. दुसरीकडे पंकजला बाईक चोरणाऱ्या टोळीच्या सदस्यांसोबत पकडल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
वडिलांना पंकजच्या अटकेची माहिती मिळताच त्यांनी मुख्यमंत्री, राज्यपाल आणि पोलिस अधिकाऱ्यांना याबाबत पत्र लिहून माहिती दिली. पंकजच्या वडिलांनी म्हटलं की, 'पोलिसांनी जबरदस्तीने पंकजवर ही खोटी कारवाई केली आहे. याशिवाय पोलिस कर्मचाऱ्याने एफआयआर दाखल करताना पंकजचं वय १८ वर्ष दाखवलं आणि त्याची रवानगी जेलमध्ये केली. पोलिसांनी आम्हाला कोणत्याही प्रकारचं सहकार्य केलं नाही. दोषी पोलिसांवर कडक कारवाई व्हावी.'
पंकज आपल्या वडिलांसोबत बिहारच्या महात्मा गांधी नगर परिसरात भाड्याच्या घरात राहतो. घराशेजारील रस्त्याच्याकडेला पंकज भाजी विकत होता. पाटणाचे पोलिस महानिरीक्षक नैय्यर हसनैन यांनी प्रकरणाच्या चौकशीचं आश्वासन दिलं आहे.