Bird Flu: चिकन आणि अंडी खाण्यात काही धोका आहे का? केंद्रीय मंत्र्यांनी दिले उत्तर
सध्या, हरियाणा हे देशातील एकमेव राज्य आहे जेथे कोंबड्यांमध्ये बर्ड फ्लूची पुष्टी झाली आहे. येथे बर्ड फ्लूने संक्रमित कोंबड्यांना मारण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

नवी दिल्ली : राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि केरळ या पाच राज्यांमध्ये मृत्यू झालेल्या पक्षांमध्ये बर्ड फ्लूचे विषाणू आढळले आहेत. आता चिकन आणि अंड्यांविषयी लोकांच्या मनात शंका निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर तुम्ही बिनधास्त चिंकन आणि अंडी उकडून खाऊ शकता, असे आवाहन केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री गिरीराज सिंह यांनी एबीपी न्यूजतर्फे लोकांना केलं आहे.
दिल्लीतही सरकारने कंट्रोल रूम तयार केली आहे. हिवाळ्यात येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांमुळे हा आजार पसरल्याचे सरकारचे म्हणणे आहे. बर्ड फ्लूच्या माध्यमातून मानवांमध्ये आजपर्यंत संसर्ग झाल्याची नोंद अद्याप नाही.
गिरीराज सिंह म्हणाले, "आम्ही ऑक्टोबरमध्येच सर्व राज्यांना नियमावली पाठवली होती. आम्ही कंट्रोल रूमही तयार केली आहे. आतापर्यंत भारत सरकारकडे असे कोणतेही अहवाल नाही, ज्यामध्ये मानवांमध्ये हे संक्रमण झाले आहे. सुमारे सात-आठ राज्यांमध्ये या आजाराने शिरकाव केला आहे. सर्वात जास्त केसेस केरळ राज्यात मिळाल्या असून बदकांमध्ये हा विषाणू जास्त पसरला आहे." ते पुढे म्हणाले, की "जागतिक प्राणी संघटनेने जे म्हटले आहे ते असे आहे की चांगले शिजवलेल्या कोंबड्यांचे मांस आणि अंडी खाण्यात कोणतीही अडचण नाही. यामुळे कोणताही रोग पसरत नाही."
Bird Flu Symptoms | बर्ड फ्लूची लक्षणं अन् कारणं; avian influenza व्हायरस माणसांसाठीही धोकादायक?
केंद्रीय मंत्री म्हणाले की, 2006 साली बर्ड फ्लू पहिल्यांदा भारतात आला. तेव्हापासून जेव्हा जेव्हा हे संक्रमण भारतात येते तेव्हा आपण त्यावर काम करतो. आतापर्यंत भारतात केवळ बर्ड फ्लूचा H5N8 स्ट्रेन आढळला आहे. अद्याप पोल्ट्रीमध्ये H5N1 आढळला नाही. हे कळताच राज्य सरकारांना याबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात येतील.
हरियाणा हे एकमेव राज्य आहे जेथे कोंबड्यांना बर्ड फ्लू होण्याची पुष्टी झाली आहे, जेथे सरकारने बर्ड फ्लूने संक्रमित कोंबड्यांना मारण्याचे आदेश दिले आहेत. हिवाळ्यात येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांमुळे हा आजार पसरल्याचे सरकारचे म्हणणे आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत बर्ड फ्लूच्या माध्यमातून मानवांमध्ये संसर्गाचे कोणत्याही केसेस समोर आल्या नाहीत.























