Bihar Floor Test: बिहारमध्ये हायव्होल्टेज ड्रामा, आमदारांचे मोबाईल स्वीच ऑफ; नितीश कुमारांचं टेन्शन वाढलं
Tejashwi Yadav: बिहारमध्ये सध्या वेगवान राजकीय घडामोडी सुरु आहेत. आज बिहार विधानसभेत बहुमत चाचणी पार पडेल.
पाटणा: मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पुन्हा भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर बिहारच्या राजकारणात प्रचंड उलथापालथ झाली होती. नितीश कुमार यांनी भाजपच्या पाठिंब्याने मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तरी आता त्यांना सोमवारी विधानसभेत बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. या बहुमत चाचणीपूर्वी पाटण्यात अत्यंत वेगवान आणि रंजक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. रविवारी रात्री बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या निवासस्थानाला पोलिसांनी वेढा घातला. याठिकाणी राजदचे आमदार चेतन आनंद यांना शोधण्यासाठी पोलीस आले होते. चेतन आनंद यांच्या भावाने पोलिसांकडे तक्रार केली होती. तेजस्वी यादव यांनी माझ्या भावाला त्यांच्या घरात डांबून ठेवले आहे, असे या तक्रारीत म्हटले होते. त्यामुळे पोलिसांनी तेजस्वी यादव यांच्या घरी जाऊन चेतन आनंद यांची भेट घेतली. सध्या राजदचे सर्व आमदार तेजस्वी यादव यांच्या घरी आहेत. पोलिसांनी या परिसरात जमावबंदीचे कलम लागू केले आहे.
बिहार विधानसभेच्या बहुमत चाचणीत आज नाट्यमय घडामोडी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. नितीश कुमार हे भाजपसोबत गेले असले तरी जदयू आणि भाजपचे काही आमदार बहुमत चाचणीवेळी तेजस्वी यादव यांना साथ देतील, अशी चर्चा आहे. हिंदुस्थानी आवामी
मोर्चाचे प्रमुख जीतन राम माझी यांनी भाजप आणि नितीश कुमार यांचे टेन्शन वाढवले आहे. त्यांचा फोन सध्या स्वीच ऑफ असल्याचे सांगितले जाते. दरम्यान भाजपचे नेते नित्यानंद राय मांझी यांच्या घरी गेले होते. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. परंतु, बहुमत चाचणीत
मांझी यांचे आमदार नितीश कुमार यांना साथ देतील, याची शक्यता कमी आहे. रविवारी जदयू विधिमंडळ गटाची बैठक झाली होती. त्यावेळी जदयूचे बीमा भारती, सुदर्शन, दिलीप राय आणि रिंकू सिंह हे आमदार उपस्थित नव्हते. त्यामुळे जदयूच्या गोटात अस्वस्थता आहे.
#WATCH | On Bihar floor test, RJD leader Mrityunjay Tiwari says, "Satya pareshan ho sakta hai lekin parajit nahi...In a few hours, everything will be known...Democracy will triumph. All the MLAs have made a resolution to save Bihar & its future and for that, the current… pic.twitter.com/yAYg4krgy5
— ANI (@ANI) February 12, 2024
बिहारमध्ये बहुमताचा आकडा?
बिहार विधानसभेत आज बहुमत चाचणी होणार आहे. एकूण २४३ सदस्यांच्या विधानसभेत बहुमतासाठी १२२ आमदारांचे संख्याबळ आवश्यक आहे. सध्याच्या घडीला जदयू आणि भाजपकडे मिळून १२८ आमदारांचे संख्याबळ आहे. तर काँग्रेस, राजद आणि डाव्या पक्षांकडे
मिळून ११४ आमदारांचे पाठबळ आहे. एनडीएच्या गोटातील सहा आमदार अद्याप नॉट रिचेबल असल्याचे समजते. अशातच जीतनराम मांझी हे नितीश यांना साथ देण्यास तयार नसल्याचे समजते. त्यामुळे भाजप आणि नितीश कुमार यांच्या गोटात चलबिचल असल्याचे समजते.
दरम्यान, रविवारी रात्री मनोज यादव आणि सुदर्शन हे दोन आमदार एनडीएच्या गोटात परतले. थोड्याचवेळात जदयूच्या आमदारांची बैठक होणार आहे. यावेळी किती आमदार उपस्थित असतील, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
आणखी वाचा