Bihar Election Opinion Poll: पंतप्रधान मोदींचे हनुमान चिराग पासवान यांना मोठा झटका; ओपिनियन पोलचा धक्कादायक अंदाज, बिहार निवडणुकीत वारं फिरणार?
Bihar Election Opinion Poll: स्वतःला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हनुमान म्हणवणाऱ्या चिराग पासवान यांच्या पक्षाला बिहार निवडणुकीत मोठा धक्का बसू शकतो. सर्वेक्षणात एनडीए जिंकेल, तर चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाला फक्त ४ ते ५ जागा मिळतील, असं समोर आलं आहे.

पटना : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान गुरुवारी होणार असताना, IANS–Matrize च्या सर्वेक्षणाने राजकीय वातावरणात चांगलीच खळबळ माजवली आहे. या सर्वेक्षणानुसार, मुख्यमंत्री नीतीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए (NDA) पुन्हा सत्तेवर येऊ शकते. एनडीएला १५३ ते १६४ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दुसरीकडे, तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील राजद (RJD) पक्षाला केवळ ७६ ते ८७ जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सर्वेक्षणातील एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्वतःला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘हनुमान’ म्हणवणारे चिराग पासवान आणि त्यांचा पक्ष लोक जनशक्ती पार्टी (LJP) यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. सर्वेक्षणानुसार, एलजेपीला फक्त ४ ते ५ जागांवर विजय मिळू शकतो.
Bihar Election Opinion Poll: लोकसभेतील यशाचा दाखला देत विधानसभेत अधिक जागांवर दावा
एनडीएच्या जागा वाटपात चिराग पासवान यांच्या पक्षाला २९ जागा देण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत केवळ ४–५ जागांवर विजय मिळाल्यास पक्षाचा स्ट्राईक रेट अत्यंत कमी राहील. लोकसभेतील यशाचा दाखला देत विधानसभा निवडणुकीत अधिक जागांवर दावा करणाऱ्या एलजेपीसाठी हा निकाल मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांच्या हम (Hindustani Awam Morcha) पक्षासाठी सर्वेक्षणातील अंदाज अत्यंत अनुकूल दिसतो आहे. त्यांच्या पक्षाला ४–५ जागा मिळू शकतात, असा अंदाज आहे. हे घडल्यास पक्षाचा स्ट्राईक रेट तब्बल ९० टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो, कारण हम पक्षाला एकूण फक्त ६ जागा देण्यात आल्या आहेत.
Bihar Election Opinion Poll: महागठबंधनला काँग्रेसमुळे नुकसान होण्याची शक्यता
महागठबंधनाच्या गोटात, राजदने काँग्रेसला जास्त जागा देण्याचा निर्णय उलट फसण्याची शक्यता सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आली आहे. काँग्रेसने ६२ जागांवर उमेदवार उभे केले असले, तरी सर्वेक्षणानुसार पक्षाला केवळ ७ ते ९ जागा मिळू शकतात. जर हा अंदाज खरा ठरला, तर स्पष्ट होईल की तेजस्वी यादव यांनी २०१७ मध्ये अखिलेश यादव यांनी केलेली चूक पुन्हा केली आहे. उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांनी काँग्रेसला १०० जागा दिल्या होत्या, पण काँग्रेसला फक्त ७ जागांवर यश मिळाले होते. तेव्हा समाजवादी पक्षाच्या पराभवाचे एक प्रमुख कारण म्हणून काँग्रेसला ‘हद्दीबाहेर’ जागा देणे मानले गेले होते. आता बिहारमध्येही जर निकाल असा आला, तर महागठबंधनातील काँग्रेसची भूमिका आणि प्रभाव यावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण होईल.
























