Bihar Election : मोठी बातमी, महागठबंधन बिहार निवडणुकीत मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यासह रिंगणात उतरणार, तेजस्वी यादवांच्या नावावर सहमती, घोषणा कधी?
Bihar Election 2025 : बिहार विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. बिहारमध्ये दोन टप्प्यात मतदान पार पडणार आहे. यामुळं राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत महागठबंधनकडून लवकरच घोषणा केली जाई शकते. मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यासह महागठबंधन निवडणुकीच्या रिंगणात उतरेल, अशी शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार राजद नेते तेजस्वी यादव यांच्या नावास सर्व पक्षांची सहमती आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपासंदर्भात महागठबंधनमध्ये जागा वाटपाबाबत बैठका सुरु आहेत. महागठबंधनमधील सर्व राजकीय पक्षांमधील मतभेद दूर् करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न सुरु आहेत. मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यासह आणि जागा वाटपाबाबत अंतिम निर्णय लवकरच जाहीर केला जाऊ शकतो, अशी शक्यता आहे.
राजदचे राष्ट्रीय महासचिव अब्दुल बारी सिद्दीकी यांनी गुरुवारी म्हणजेच आज महागठबंधनच्या बैठकीत मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत भूमिका मांडली. महागठबंधनच्या सर्व पक्षांनी मिळून मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून तेजस्वी यादव यांचं नाव जाहीर केलं पाहिजे, असं म्हटलं. ते म्हणाले येत्या एक ते दोन दिवसांमध्ये महागठबंधनमधील जागा वाटप आणि उमेदवारांच्या नावांबाबत अंतिम निर्णय जाहीर केला जाईल.
महागठबंधनमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार?
महागठबंधनमध्ये राजद, काँग्रेस, सीपीआय (माक्सवादी-लेनिनवादी) लिबेरशन याशिवाय सीपीएम आणि सीपीआयचा समावेश आहे. मुकेश सहानी यांनी विकासशील इन्सान पार्टी या राजकीय पक्षांचा समावेश आहे. महागठबंधनच्या सूत्रांनुसार लालू प्रसाद यादव यांच्या राजदकडून 135 ते 140 जागांवर निवडणूक लढवली जाऊ शकते. राजदनं काँग्रेसला 50-52 जागा देण्याचा प्रस्ताव दिला आहे. काँग्रेसनं गेल्या विधानसभा निवडणुकीत 70 जागा लढवल्या होत्या. 2020 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं 70 जागा लढवल्यानंतर 19 जागांवर विजय मिळवला होता.
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माले) लिबरेशन यांना 20 ते 25 जागा दिल्या जाऊ शकतात. मात्र, पक्षाननं यावेळी 40 जागा मागितल्या आहेत. सीपीआय माले लिबरेशन पक्षानं गेल्या निवडणुकीत 19 जागा लढवल्या होत्या, त्यापैकी 12 जागांवर विजय मिळवला होता. याशिवाय विकासशील इन्सान पार्टीनं देखील 40 जागा लढवणार अशी भूमिका घेतली आहे. याशिवाय मुकेश साहनी यांनी उपमुख्यमंत्री पद मागितल्याची माहिती आहे. आता महागठबंधन जागा वाटपावर कसा तोडगा काढणार ते पाहावं लागेल.
दरम्यान, बिहार विधानसभा निवडणूक दोन टप्प्यात पार पडणार आहे. 6 नोव्हेंबर आणि 11 नोव्हेंबर या दोन दिवशी मतदान होणार आहे. तर, 14 नोव्हेंबरला निकाल जाहीर केला जाणार आहे. बिहारमध्ये एनडीए आणि महागठबंधन आमने सामने येणार आहेत. एनडीएमध्ये जनता दल संयुक्त आणि भाजप हे प्रमुख पक्ष आहेत. एनडीएसमोर देखील जागावाटपाचा मुद्दा आहे.


















