नितीश कुमार आज सातव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; पण उपमुख्यमंत्री कोण?
बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये जनतेने एनडीएला कौल दिल्यानंतर रविवारी नितीश कुमार यांनी राज्यपाल फागू चौहान यांची भेट घेत सत्ता स्थापनेचा दावा केला. दरम्यान, उपमुख्यमंत्री पदाची धुरा कोण सांभाळणार यासंदर्भात संस्पेन्स कायम आहे.
पाटणा : जेडीयू अध्यक्ष नितीश कुमार आज बिहारचे 37वे मुख्यमंत्री म्हणून सातव्यांदा शपथ घेणार आहेत. नितीश सरकारचा शपथविधी सोहळा आज संध्याकाळी साडेचार वाजता होणार आहे. बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये जनतेने एनडीएला कौल दिल्यानंतर रविवारी नितीश कुमार यांनी राज्यपाल फागू चौहान यांची भेट घेत सत्ता स्थापनेचा दावा केला. दरम्यान, उपमुख्यमंत्री पदाची धुरा कोण सांभाळणार यासंदर्भात संस्पेन्स कायम आहे.
भाजपच्या विधीमंडळ दलाची बैठकीमध्ये कटिहारमधून तारकिशोर प्रसाद यांना भाजप विधीमंडळ दलाचे नेते आणि बेतियामधून आमदार रेणू देवी यांची उपनेते म्हणून निवड करण्यात आली. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी यासंदर्भात माहिती दिली. त्यामुळे सध्या बहरहाल, प्रसाद आणि रेणू देवी यांच्याकडे उपमुख्यमंत्री पद सोपवण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
सुशील मोदी यांचं ट्वीट
बिहारमध्ये एनडीएच्या मागील सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलेले सुशील मोदी यांनी एक ट्वीट केलं आहे. त्यानंतर बिहारच्या राजकारणात अनेक तर्त-वितर्क लावण्यास सुरुवात झाली आहे. सुशील मोदी यांनी ट्वीट केलं की, "भाजप आणि संघ परिवाराने मला अनेक गोष्टी दिल्या आणि यापुढेही जी जबाबदारी माझ्याकडे सोपवण्यात येईल त्या मी व्यवस्थितपणे पार पाडीन. कार्यकर्त्याचं पद तर कोणी हिसकाऊन घेऊ शकत नाही."
सुशील मोदी यांच्या वक्तव्यावर भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी ट्वीट करत म्हटलं की, "आदरणीय सुशीलजी तुम्ही नेते आहात, उपमुख्यमंत्री पद तुमच्याकडे होतं, पुढेही तुम्ही भाजपचे नेते असाल, पदामुळे कोणीही मोठं किंवा लहान होत नाही."
राज्यपालंची भेट घेतल्यानंतर नितीश कुमार म्हणाले...
राज्यापाल फागू चौहान यांची भेट घेतल्यानंतर नितीश कुमार म्हणाले की, "सोमवारी दुपारनंतर 4 ते 4.30 दरम्यान शपथवीधी समारंभ पार पडेल. राज्यपाल महोदयांनी मला मुख्यमंत्री म्हणून नामित केलं आहे. पुढे राज्याचा विकास व्हावा, यासाठी आम्ही सर्वजण एकत्र येऊन काम करू, सर्व मिळून प्रत्येक क्षेत्र आणि प्रत्येक तालुक्याच्या विकासाठी काम करू. शपथविधीनंतर कॅबिनेटची बैठक होईल आणि त्यामध्ये ठरवण्यात येईल की, सदनाची बैठक कधी घेण्यात येईल जेणेकरून सदस्य शपथविधी होऊ शकेल."
मंत्रिमंडळाच्या संख्येबाबत विचारल्यानंतर ते म्हणाले की, किती मंत्री शपथ घेणार, हेसुद्धा ठरवण्यात येणार आहे. तसेच उपमुख्यमंत्री कोण होणार? हे विचारल्यानंतर नितीश कुमार म्हणाले की, हे सुद्धा थोड्या वेळात ठरवण्यात येणार आहे.
पाहा व्हिडीओ : नितीश कुमार सातव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री होणार; NDA च्या बैठकीत काय झालं?
मुख्यमंत्रीपदाची इच्छा नव्हती पण भाजपच्या आग्रहाखातर पद स्वीकारतोय : नितीश कुमार
राज्यपालांना भेटून आल्यानंतर नितीश कुमारांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, "मुख्यमंत्री व्हायची माझी इच्छा नव्हती. परतु भाजप नेत्यांच्या आग्रहाखातर हे पद स्वीकारण्यास तयार झालो आहे. मुख्यमंत्री भाजपचा व्हावा अशीच माझी इच्छा होती." संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नितीश कुमार यांनी राज्यपालांना भेटून सत्तास्थापनेचा दावा केला. नितीश यांच्यासोबत हम पक्षाचे अध्यक्ष जितनराम मांझी, व्हिआयपी पक्षाचे मुकेश सहनी हे नेतेही राज्यपालाच्या भेटीवेळी उपस्थित होते. उद्या म्हणजे सोमवारी संध्याकाळी 4.30 वाजता त्यांचा शपथविधी होणार आहे.
पाटणामध्ये रविवारी झालेल्या बैठकीत एनडीएच्या चारही प्रमुख पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत राजनाथ सिंह, माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी आणि मुकेश सहनी सामील झाले होते. त्यामध्ये विधानमंडळाच्या नेतेपदी नितीश कुमारांचे नाव पक्के करण्यात आले. त्यानंतर आपल्या समर्थक आमदारांचे पत्र घेऊन नितीश कुमार राज्यपालांच्या भेटीसाठी गेले. राज्यपालांच्या भेटीनंतर नितीश कुमारांनी उद्या शपथ घेणार असल्याचे स्पष्ट केलं. या आधी नितीश कुमारांनी 6 वेळा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती.
बिहारच्या राजकारणात आपलं वेगळं स्थान निर्माण केलेल्या नितीश कुमार उद्या सातव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत
नितीश कुमारांचा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ
- नितीश कुमार सर्वप्रथम 3 मार्च 2000 साली आठ दिवसांसाठी मुख्यमंत्री बनले होते. परंतु बहुमताची जमवाजमव करता न आल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागला होता.
- दुसऱ्यांदा नितीश कुमारांनी 24 नोव्हेंबर 2005 रोजी बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
- तिसऱ्यांदा 26 नोव्हेंबर 2010 रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
- चौथ्यांदा नितीश कुमार यांनी 22 फेब्रुवारी 2015 साली मुख्यमंत्रीपद मिळवले.
- पाचव्यांदा पुन्हा 20 नोव्हेंबर 2015 साली नितीश कुमारांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
- सहाव्या वेळी आरजेडी सोबत आघाडी तुटल्यानंतर एनडीएच्या नेतृत्वात तयार झालेल्या नव्या गठबंधनच्या माध्यमातून नितीश कुमार यांनी पुन्हा 27 जुलै 2017 रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
- बिहारच्या मुख्यमंत्री पदाची धुरा नितीश कुमारांकडेच; एनडीएच्या विधीमंडळ नेतेपदी निवड
- बिहार निवडणुकांच्या निकालानंतर नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदासंबंधी केलं मोठं वक्तव्य ; म्हणाले..
- बिहारच्या 37 व्या मुख्यमंत्र्याच्या रुपात सातव्यांदा शपथ घेणार नितीश कुमार, जाणून घ्या त्यांच्या या आधीच्या शपथांविषयी