रातोरात प्रसिद्ध झालेला 'Baba Ka Dhaba' नशिबाचे फेर अनभवून पुन्हा मूळ अवस्थेत
एका रात्रीत संपूर्ण देशाचं सोशल मीडिया सेन्सेशन बनलेल्या बाबा का ढाबाच्या कहाणीत एक नवा ट्विस्ट आला आहे. प्रसिद्धीमुळे पालटलेले चार दिवस संपून बाबा पुन्हा आपल्या मूळ अवस्थेत परतले आहेत.
नवी दिल्ली : सोशल माध्यमांमुळे एका रात्रीत संपूर्ण देशभरात पोहोचलेल्या दिल्लीतल्या 'बाबा का ढाबा'चे दिवस पुन्हा फिरले आहेत. प्रसिद्धी, मदतीच्या माध्यमातून पैशांचा ओघ, नवं रेस्टॉरंट हे सगळं पाहिल्यानंतर 'बाबा का ढाबा'चे चालक कांता प्रसाद हे पुन्हा आपल्या या टपरीवजा ढाब्यावर परतले आहेत. जे रेस्टॉरंट त्यांनी मदतीच्या पैशातून सुरु केलं होतं ते आर्थिक नुकसानीमुळे नीट चालू शकले नाही. पाच लाख रुपये त्यांनी या हॉटेलमध्ये गुंतवले होते पण महिन्याचा खर्च एक लाख रुपये होता. मात्र त्यातून उत्पन्न केवळ 35 ते 40 हजार रुपये महिना मिळत होतं. त्यामुळे बाबा आता पुन्हा रेस्टॉरंटच्या काऊंटरवरुन आपल्या जुन्या ढाब्यावर कामासाठी परतले आहेत.
लॉकडाऊनच्या पहिल्या लाटेत गोरगरीबांचे जे हाल झाले त्याचे हे बाबा म्हणजे जणू प्रतीक बनले होते. लोक जेवायलाही फिरकत नसल्याने त्यांची काय अवस्था झालीय हे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले होते. गौरव वासन नावाच्या यूट्युबरने त्यांचा व्हिडीओ बनवला आणि तो चांगलाच व्हायरल झाला. सोशल माध्यमावरुन लाखो रुपयांची मदत अवघ्या काही दिवसांत उभी राहिली. पण नंतर याच गौरव वासनवर बाबांनी पैसे लुटल्याचे आरोप केले आणि दोघांमधले संबंध बिघडले.