(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बाबा का ढाबा आता नव्या रेस्टाँरंटमध्ये सुरु, सोशल मीडियावरच्या सर्वात हिट कहाणीचं पुढचं पाऊल
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या 'बाबा का ढाबा' चे ते मालक आहे. याच सोशल मीडियानं त्यांच्या आयुष्यात प्रचंड बदल घडवून आणला आहे.
नवी दिल्ली : सोशल मीडिया काय कमाल करु शकतो याचं उदाहरण म्हणजे दिल्लीतल्या बाबा का ढाबाची कहाणी. अवघ्या काही महिन्यात या बाबांचं आयुष्यच बदलून गेलं आहे. एकीकडे त्यांनी आपल्या व्यवसायात नवं पाऊल टाकलंय, तर दुसरीकडे याच प्रवासात आरोप-प्रत्यारोपांचं महाभारत होऊन त्यानं मानवी स्वभावाचे नमुनेही दाखवलेत.
दिल्लीतल्या कांता प्रसाद यांचा चेहरा आता देशात सगळ्यांच्या परिचयाचा झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या 'बाबा का ढाबा' चे ते मालक आहे. याच सोशल मीडियानं त्यांच्या आयुष्यात प्रचंड बदल घडवून आणला आहे. काल परवापर्यंत एका टपरीचे चालक असलेल्या बाबांनी आता दिल्लीत स्वता:चं एक रेस्टॉरंट सुरु केलं आहे. अर्थात 'बाबा का ढाबा' हे नाव मात्र कायम आहे.
कसं आहे हे रेस्टाँरंट?
आज बाबा काऊंटरवर बसले आहेत .हाताखाली दोन नोकर आहेत. नव्या रेस्टाँरंटचं 35 हजार रुपये भाडं ते देऊ शकतात. पण काही दिवसांपूर्वी त्यांची परिस्थिती अगदी वेगळी होती. लॉकडाऊनच्या मंदीचा त्यांना फटका बसला. त्यावेळी त्यांच्या ढाब्याकडे कुणी फिरकत नव्हतं. गौरव वासन या यु-ट्युबरनं त्यांची ही कहाणी सोशल मीडीयाच्या माध्यमातून समोर आणली. तेव्हा बाबांचे अश्रू सगळ्यांच्या काळजाला हात घालून गेले आणि मदतीचा वर्षाव सुरु झाला.
बाबांच्या आयुष्यात जो बदल घडला, त्यात मधल्या काळात बरंच महाभारतही घडलं. कारण ज्या गौरव वासन याच्या व्हिडीओमुळे बाबा प्रकाश झोतात आले त्याच्यावरच त्यांनी पैसे लाटल्याचे आरोप केले. गौरवनं मदतीसाठी आपलेच बँक अकाऊंट दिल्याचा आणि आपल्याला सगळे पैसे न दिल्याचा त्यांनी आरोप केला. त्यावर पोलीस तक्रारही झाली.
साहजिक आहे नवं रेस्टाँरंट सुरु होतंय, म्हटल्यावर जुन्या ढाब्याचं काय हा प्रश्नही तुम्हाला पडला असेलच..तर तो जुना ढाबाही सुरु आहे. याच जुन्या ढाब्यापासून अवघ्या काही मीटर अंतरावरच त्यांनी हे नवं रेस्टाँरंट सुरु केलं आहे.
सोशल मीडियावरुन झालेल्या मदतीच्या वर्षावानंतर हे एक कुटुंब उभं राहिलं. पण दरम्यान माणसाच्या लोभी प्रवृत्तीचे सगळे गुणदोष या कहाणीनं समोर आणले.
संबंधित बातम्या :