Har Ghar Tiranga : आतापर्यंत सहा वेळा बदलला झेंडा, स्वातंत्र्याआधी असा होता भारताचा राष्ट्रध्वज
Har Ghar Tiranga : भारताचा राष्ट्रध्वज (Design of Indian National Flag) 116 वर्षांत सहा वेळ बदललण्यात आला आहे. झेंड्याचा इतिहास जाणून घ्या.
Azadi Ka Amrit Mahotsav : भारत आज 76 वा स्वातंत्र्य दिन (Independence Day) साजरा करत आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. देशभरात स्वातंत्र्य दिनाच्या उत्साह पाहायला मिळत आहे. ठिकठिकाणी ध्वजवंदन करत देशभक्तिपर उपक्रम राबवले जात आहेत. यंदा केंद्र सरकारकडून 'हर घर तिरंगा ' (Har Ghar Tiranga) अभियानही राबवण्यात आलं आहे. घरोघरी तसेच शासकीय आणि खासगी कार्यालयांवर देशाचा राष्ट्रध्वज फडकवण्यात आला आहे. मात्र तुम्हाला राष्ट्रध्वजामागची रंजक कहाणी माहित आहे का? नसेल तर येथे जाणून घ्या.
'तिरंगा' (Tiranga) हा सुरुवातीपासूनच भारताचा राष्ट्रध्वज नव्हता. भारताचा राष्ट्रध्वज (Design og Indian National Flag) 116 वर्षांत सहा वेळ बदललण्यात आला आहे. भारत स्वातंत्र्य होण्यापूर्वी पाच वेळा आणि भारत स्वातंत्र्य झाल्यावर एकदा असा भारताचा राष्ट्रध्वज सहा वेळ बदलण्यात आला आहे.
1906 मध्ये पहिला राष्ट्रध्वज
भारताचा स्वातंत्र्यलढा जसजसा तीव्र होत होता, तसतसे क्रांतिकारी पक्ष आपापल्या पातळीवर स्वतंत्र राष्ट्राच्या स्वतंत्र अस्मितेसाठी स्वत:चा झेंडा तयार केला. देशाचा पहिला प्रस्तावित राष्ट्रध्वज 1906 मध्ये दिसला. हा राष्ट्रध्वज 7 ऑगस्ट 1906 रोजी पारसी बागान चौक, कोलकाता (आता ग्रीन पार्क, कोलकाता) येथे फडकवण्यात आला होता. या ध्वजावर हिरवा, पिवळा आणि लाल असे तीन रंगाचे पट्टे होते. त्याच्या वरच्या हिरव्या पट्टीत आठ पांढऱ्या रंगाची कमळाची फुले होती. मध्यभागी पिवळ्या पट्टीत वंदे मातरम लिहिलं होतं. याशिवाय सर्वात खाली असलेल्या लाल पट्टीत पांढऱ्या रंगात चंद्र आणि सूर्याची चित्रं होतं.
पुढच्याच वर्षी बदलला राष्ट्रध्वज
1907 मध्ये देशाचा दुसरा नवा राष्ट्रध्वज जारी करण्यात आला. सुरुवातीला निर्वासित झालेल्या मॅडम भिकाजीकामा आणि त्यांच्या काही क्रांतिकारक साथीदारांनी मिळून पहिल्या ध्वजात काही बदल करून पॅरिसमध्ये भारताचा नवा राष्ट्रध्वज उभारला. हा राष्ट्रध्वज दिसायलाही आधीच्या ध्वजासारखाच होता. पण त्यामध्ये रंग बदल करण्यात आला होता. या ध्वजामध्ये भगवा, पिवळा आणि हिरवा असे तीन रंगाचे पट्टे होते. मध्यभागी वंदे मातरम लिहिलं होतं.
ॲनी बेझंट आणि टिळक यांनी 1917 मध्ये बदलला ध्वज
1917 मध्ये भारताचा आणखी एक नवीन ध्वज प्रस्तावित झाला. या नवीन ध्वजावर पाच लाल आणि चार हिरव्या रंगाचे पट्टे होते. ध्वजाच्या शेवटी काळ्या रंगात त्रिकोणी आकार होता. त्याच वेळी, डाव्या कोपऱ्यात एक युनियन जॅक (UK Flag) देखील होता. तर चंद्र आणि तार्यांसोबत सात नक्षत्रही त्यात समाविष्ट होते. हा नवा ध्वज पहिल्यांदा डॉ. ॲनी बेझंट आणि लोकमान्य टिळक यांनी फडकवला होता.
1921 मध्ये चौथ्यांदा बदलला राष्ट्रध्वज
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने 1921 मध्ये अधिवेशनादरम्यान बेझवाडा (आता विजयवाडा) येथे एका आंध्र प्रदेशातील एका व्यक्तीने महात्मा गांधींना हिरवा आणि लाल रंगाचा झेंडा दाखवला, गांधीजींना हा ध्वज आवडला आणि त्यांनी त्यात काही बदल केले. त्यामध्ये आणखी एक पांढरा पट्टा जोडला. तसेच यामध्ये देशाचा विकास दाखवण्यासाठी मध्यभागी एक चरखाही होता. अशाप्रकारे चौथ्यांदा राष्ट्रध्वज बदलला.
एका दशकानंतर 1931 मध्ये बदलला राष्ट्रध्वज
एका दशकानंतर पुन्हा एकदा भारताचा राष्ट्रध्वज बदलण्यात आला. या झेंड्यामध्ये वरती भगवा, मध्यभागी पांढरा आणि शेवटी हिरव्या रंग होता. यामध्ये मधल्या पांढऱ्या पट्टीमध्ये लहान आकारात चरखा दाखवण्यात आला होता. पांढऱ्या पट्टीतील चरखा हे राष्ट्राच्या प्रगतीचे प्रतीक असल्याचं मानलं जायचे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने हा नवीन ध्वज अधिकृतपणे स्वीकारला.
अखेर 1947 मध्ये 'तिरंगा' राष्ट्रध्वज स्वीकारला
अखेर 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला तेव्हा देशाला तिरंगा राष्ट्रध्वज मिळाला. 22 जुलै 1947 रोजी भारताचा ध्वज स्वीकारण्यात आला. घटना समितीची स्थापना झाल्यानंतर समितीने 22 जुलै 1947 ला या ठरावाला मंजुरी दिली. त्यानंतर 15 ऑगस्ट 1947 ला भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर हा ध्वज आपल्या भारताचा अधिकृत राष्ट्रीय ध्वज म्हणून फडकविण्यात आला. हा राष्ट्रीय ध्वज स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते फडकविण्यात आला.
राष्ट्रध्वजातील तीन रंगांचा अर्थ
भारतीच्या राष्ट्रध्वजामध्ये तीन रंग प्रामुख्याने आहेत. भारतीय ध्वज संहितेनुसार, भारतीय ध्वजाची रुंदी:उंची गुणोत्तर 3:2 आहे. ध्वजात तीन समान आडव्या पट्ट्यांची रचना करण्यात आली आहे. वरच्या भागात गडद केशरी रंग आहे.या रंगातून त्याग, धैर्य याचा बोध होतो. मधल्या भागात पांढरा रंग आहे.या रंगातून प्रकाशाचा आणि सत्यमार्गाचा शांती, सत्य, आणि पावित्र्याचा बोध होतो. खालील भागात गडद हिरवा रंग आहे. हा रंगातून निसर्गाशी वा भूमीशी असलेले नाते दर्शवितो, निष्ठा आणि समृद्धीचा बोध होतो. निळ्या रंगाचे अशोक चक्र हे सागराप्रमाणे अथांगता आणि कालचक्राचे त्यासोबत बदलत जाणारे जग सूचित करतो. जीवन गतिमान असावे आणि भारतीयांनी शांततापूर्ण आगेकूच करावी असा बोध या अशोकचक्रातून होतो.