Ram Mandir Construction: 50 हून अधिक वर्षांपासून गुहेत राहणाऱ्या साधू बाबांकडून अयोध्येतील राम मंदिरासाठी एक कोटी रुपयांचं दान
त्यांनी विश्व हिंदू परिषदेकडे मंदिर निर्माण निधीसाठीचा आपला वाटा देऊ केला. सोशल मीडियापासून ते अगदी देशाच्या कानाकोपऱ्यात सध्या याच बाबांची चर्चा सुरु आहे.
नवी दिल्ली : राम जन्मभूमीचा निकाल लागल्या दिवसापासून देशभरात उत्सुकता लागून राहिली आहे, ती म्हणजे अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या भव्य राम मंदिराची. त्यातच या मंदिराचा भूमिपूजन सोहळा पार पडला आणि ओघाओघानं अनेकांनीच मंदिराच्या निर्माणामध्ये खारीचा वाटा म्हणून काही निधी दान करण्यात सुरुवात केली. अगदी वीस रुपयांपासून ते कोट्यवधींच्या रकमेपर्यंत दान यासाठी करण्यात आलं. किंबहुना निधी दान करण्याचं हे सत्र अद्यापही सुरुच आहे. आतापर्यंत अयोध्येत साकारल्या जाणाऱ्या राम मंदिरासाठी कित्येकांनी सढळ हस्ते मदत केली आहे. यातच आता चर्चा आहे ती म्हणजे एका 83 वर्षीय साधू बाबांनी केलेल्या दानाची.
जवळपास मागील 60 वर्षांपासून ऋषीकेश येथील एका गुहेत राहणाऱ्या साधू बाबांनी तब्बल 1 कोटी रुपयांचा निधी दान केला आहे. त्यांनी विश्व हिंदू परिषदेकडे मंदिर निर्माण निधीसाठीचा आपला वाटा देऊ केला. सोशल मीडियापासून ते अगदी देशाच्या कानाकोपऱ्यात सध्या याच बाबांची चर्चा सुरु आहे.
आपण सढळ हस्ते केलेल्या या मदतीसंदर्भात माहिती देत माध्यमांशी संवाद साधताना ते बाबा म्हणाले, जवळपास अर्ध्या शतकाहून अधिक काळापासून मी एका गुहेत राहत आहे. एक साधू म्हणून माझा निर्वाह गुहेला भेट देणाऱ्या भक्तांच्याच मदतीनं होत होता. मला ज्यावेळी विश्व हिंदू परिषदेच्या या उपक्रमाबाबतची माहिती मिळाली, तेव्हा मी या मंदिर निर्माण निधीमध्ये दान करण्याचा निर्णय घेतला. स्वामी शंकर दास, असं त्या साधू बाबाचं नाव असल्याची माहिती 'हिंदुस्तान टाईम्स'नं प्रसिद्ध केली आहे.
साधूबाबांनी 1 कोटींचा धनादेश देताच बँक अधिकारीही चकीत
साधू दास यांनी ज्यावेळी 1 कोटी रुपयांचा चेक दिला, तेव्हा बँक कर्मचारीही थक्कच झाले. किंबहुना या साधू बाबांच्या खात्यात इतके पैसे आहेत का, याचीही पडताळणी करण्यात आली. ज्यानंतर त्यांनी संघाच्या काही व्यक्तींना बोलवत साधू बाबांना दान करण्यासाठी लागणाऱी मदत देऊ केली.
दिल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्र्यांनी तातडीनं बोलावली गुप्तचर यंत्रणांची बैठक
दरम्यान, विश्व हिंदू परिषदेच्या रणदीप पोखरीया यांनी साधू बाबांनी दान केलेल्या रकमेसोबतच दान करण्यामागे त्यांची भावनाही तितकीच महत्त्वाची असल्याची बाब अधोरेखित केली. आतापर्यंत विश्व हिंदू परिषदेकडून मंदिर निर्माणासाठी 5 कोटींचा निधी गोळा करण्यात आला आहे. समाजातील सर्व घटकांनी यामध्ये मदत केल्याचं पाहायला मिळत आहे.