आंतरराष्ट्रीय युद्ध सरावात भाग घेणाऱ्या पहिल्या महिला पायलट ठरल्या अवनी चतुर्वेदी; म्हणाल्या, रोमांचक होता अनुभव...
Fighter Pilot Avani Chaturvedi: भारतीय हवाई दलातील पहिली महिला फायटर पायलट बनून स्क्वाड्रन लीडर अवनी चतुर्वेदी यांनी इतिहास रचला आहे. यानंतर परदेशात हवाई युद्ध सरावात भाग घेणाऱ्या त्या पहिल्या महिला पायलट ठरल्या आहेत.
Fighter Pilot Avani Chaturvedi: भारतीय हवाई दलातील (indian Airforce) पहिली महिला फायटर पायलट बनून स्क्वाड्रन लीडर अवनी चतुर्वेदी यांनी इतिहास रचला आहे. यानंतर परदेशात हवाई युद्ध सरावात भाग घेणाऱ्या त्या पहिल्या महिला पायलट ठरल्या आहेत. स्क्वॉड्रन लीडर अवनी चतुर्वेदी यांनी हयाकुरी हवाई तळावर भारत आणि जपान दरम्यान वीर गार्डियन 2023 च्या सराव (veer guardian 2023 exercise) दरम्यान सुखोई लढाऊ विमान उडवले. याबद्दल बोलताना अवनी चतुर्वेदी म्हणल्या आहे की, ''लढाऊ विमान उडवणे हे रोमांचक आहे आणि ज्या तरुणांना सैन्यात करिअर करायचे आहे, त्यांच्यासाठी अवकाश खुलं आहे.'' भारतीय हवाई दलाच्या तुकडीने 12 जानेवारी ते 26 जानेवारी या कालावधीत जपानी हवाई तळावर हयाकुरी येथे जपान हवाई स्वसंरक्षण दलासोबत 16 दिवसांच्या मेगा हवाई लढाऊ सरावात भाग घेतला होता. या भारतीय तुकडीत अवनी चतुर्वेदी यांचाही समावेश होता.
Fighter Pilot Avani Chaturvedi: 'भारतीय हवाई दलात लढाऊ विमाने उडवणे खूप रोमांचक''
आपल्या अनुभवाबद्दल बोलताना अवनी यांनी सांगितले की, ''वीर गार्डियन-2023 हा भारतीय वायुसेना आणि JSDF यांच्यातील पहिला सराव होता, ज्यामध्ये हवाई लढाऊ युद्धकलेच्या सूचना आणि हवाई संरक्षण मोहिमेवर लक्ष केंद्रित करून सराव करण्यात आला. हवाई दलात भरती होऊ इच्छिणाऱ्या सर्व तरुण-तरुणींना मी सांगू इच्छिते की तुमच्यासाठी अवकाश खुलं आहे. भारतीय हवाई दलात लढाऊ विमाने उडवणे खूप रोमांचक आहे आणि तुमच्यासाठी करिअरची उत्तम संधी आहे. आपलं लक्ष ध्येयाकडे लावून ते पूर्ण करण्यासाठी प्रबळ इच्छाशक्तीने सज्ज व्हा.'' अवनी चतुर्वेदी म्हणाल्या की , "या सरावामुळे आम्हाला एकमेकांकडून शिकण्याची उत्तम संधी मिळाली आहे. एकमेकांच्या कामाच्या पद्धती, नियोजन आणि प्रक्रिया समजून घेण्यासाठी हा एक चांगला सराव आहे.''
Fighter Pilot Avani Chaturvedi: जून 2016 मध्ये हवाई दलात रुजू
स्क्वॉड्रन लीडर चतुर्वेदी जून 2016 मध्ये भारतीय हवाई दलात सामील झालेल्या पहिल्या तीन महिला लढाऊ वैमानिकांपैकी एक होत्या. भावना कांत आणि मोहना सिंग या अन्य दोन महिला वैमानिक त्यांच्यासोबत होत्या.
Fighter Pilot Avani Chaturvedi: परदेशी हवाई दलाच्या लष्करी सरावाचा भाग ठरलेल्या पहिल्या महिला पायलट
हवाई दलाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत भारतीय हवाई दलातील महिला लढाऊ वैमानिक देशांतर्गत हवाई सरावात सहभागी झाल्या होत्या. परंतु त्यांच्यापैकी एक परदेशात लष्करी सरावाचा भाग होण्याची ही पहिलीच वेळ आहे. फेब्रुवारी 2018 मध्ये चतुर्वेदी यांनी जेव्हा मिग-21 बायसन उडवले होते, तेव्हा त्या लढाऊ विमान एकट्याने उडवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला पायलट बनल्या. त्यांनी भारतीय हवाई दलाच्या जामनगर तळावरून उड्डाण केले होते.