Assam-Mizoram Conflict : मिझोरममध्ये जाऊ नका; आसामच्या सरकारचा नागरिकांना सल्ला
Assam-Mizoram Conflict : आसाम-मिझोरम सीमावादाच्या पार्श्वभूमीवर आसाम सरकारने आपल्या नागरिकांना मिझोरममध्ये न जाण्याचा सल्ला दिला आहे.
नवी दिल्ली : आसामच्या नागरिकांनी मिझोरममध्ये जाऊ नये, तिथं आधीपासून असलेल्या आसामी नागरिकांनी काळजी घ्यावी, सावधान रहावं असा सल्ला आसाम राज्य सरकारने आपल्या नागरिकांना दिला आहे. आसाम-मिझोरम वादाच्या पार्श्वभूमीवर आसाम राज्य सरकारने आपल्या नागरिकांसाठी निर्देश जाहीर केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून आसाम आणि मिझोरममधील नागरिकांमध्ये वाद सुरु असून या प्रकरणी दोन राज्यांचे सत्ताधारी आणि पोलीस आमने-सामने आले आहेत.
आसाम सरकारच्या या सल्ल्यावर काँग्रेस पक्षाने चिंता व्यक्त करत केंद्र सरकारवर टीका केली आहे. एका राज्याने आपल्या नागरिकांना दुसऱ्या राज्यात जाऊ नये असा सल्ला देणे हा देशाच्या इतिहासातील काळा दिवस आहे असं काँग्रेसने म्हटलं आहे. अशा वेळी या राज्यांच्या मुख्यमंत्र्यानी आणि गृहमंत्र्यांनी त्यांच्या पदावर राहणे योग्य आहे का असा सवाल विचारत काँग्रेसने 'मोदी है तो मुमकिन है' असं म्हटलं आहे.
आसाममध्ये भाजपचे सरकार असून मिझोरममध्ये भाजपप्रणित आघाडीचे सरकार आहे.
आसाम-मिझोरम सीमावादावरुन 26 जुलैला दोन राज्यांचे नागरिक एकमेकांसमोर आले होते त्यामध्ये गोळीबाराची घटना घडली असून आसामच्या सहा पोलिसांना आपला जीव गमवावा लागला होता तर 50 हून अधिक कर्मचारी जखमी झाले होते. त्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन सीमेवर शांतता प्रस्थापित करण्याचा सल्ला दिला होता.
काय आहे आसाम-मिझोरमचा सीमावाद?
आसाम आणि मिझोरमध्ये हे पूर्वी एकाच राज्याचा भाग होते. तेव्हा मिझोरम हा आसामचा लुशाई हिल्स नावाचा एक जिल्हा होता. 1972 मध्ये मिझोरम आधी केंद्रशासित प्रदेश आणि 1987 मध्ये राज्य म्हणून घोषित झालं. आसामच्या बराक घाटीतील कछार, करीमगंज आणि हैलाकांडी या तीन जिल्ह्यांच्या आणि मिझोरमच्या आयझॉल, कोलसिब आणि मामित या जिल्ह्यांची 164 किमीची सीमा लागून आहे. गेल्या वर्षी, ऑगस्ट 2020 मध्ये या दोन राज्यातील नागरिकांमध्ये सीमेवरुन वाद झाला होता.
आसाम आणि मिझोरम ही दोन्ही राज्ये पर्वतीय भागाची असून या राज्यांतील नागरिकांमध्ये जमिनीच्या लहान-लहान तुकड्यांवरुन नेहमी वाद होतो. नुकतंच आसामच्या पोलिसांनी मिझोरमच्या नागरिकांना या सीमेवर शेती करण्यासाठी बंदी आणली आणि त्यांना तिथून हाकलवून लावलं होतं. त्यामुळे या दोन्ही राज्यांत सीमावादावरुन नव्याने वाद निर्माण झाला आहे.
एटलांग नदीच्या परिसरातील आठ झोपड्यांना आसाम पोलिसांनी आग लावल्याचा आरोप मिझोरमच्या पोलिसांनी केला आहे. त्यामुळे मिझोरमच्या नागरिकांमध्ये असंतोष पसरल्याचं सांगण्यात येतंय. तर मिझोरमच्या नागरिकांनी आसामच्या पोलिसांवर गोळीबार केल्याचा आरोप आसाम पोलिसांकडून करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Petrol Diesel Prices : सलग तेराव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर, मुंबईत 107.83 प्रति लिटरनं विकलं जातंय पेट्रोल
- Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ वाढ, जाणून घ्या आजचे दर
- CBSE Results 2021 : मुलाचा बारावीचा निकाल कधी येणार? बोर्डाने 'चेल्लम सरां'चं मिम शेअर करुन दिलं भन्नाट उत्तर