Assam : हेमंत बिस्वा सरमा आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार, दुपारी 12 वाजता शपथविधी
आसामचे भाजप विधीमंडळाचे नेते हेमंत बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma ) हे आज दुपारी 12 वाजता मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.
गुवाहाटी : आसामचे भाजप पक्षाचे विधीमंडळ नेते हेमंत बिस्वा सरमा हे आज दुपारी 12 वाजता मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. श्रीमंत शंकरदेव कलाक्षेत्र या ठिकाणी नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडणार आहे. काल झालेल्या एनडीए विधीमंडळ सदस्यांच्या बैठकीत त्यांची नेतेपदी निवड करण्यात आली होती. हेमंत बिस्वा सरमा यांनी रविवारी संध्याकाळी चार वाजता राज्यपाल जगदीश मुखी यांची भेट घेतली होती आणि सत्ता स्थापनेचा दावा केला होता.
आसाममध्ये सलग दुसऱ्यांदा सत्ता टिकवल्यानंतर भाजपकडून मुख्यमंत्री पदासाठी कोणाचे नाव पुढे येणार याची जोरदार चर्चा सुरु होती. रविवारी गुवाहाटी येथे एनडीएची बैठक पार पडली होती. या बैठकीसाठी केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि पक्षाचे महासचिव अरुण सिंह हे निरीक्षक म्हणून उपस्थित होते. या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितलं की, नवनिर्वाचित सदस्यांनी हेमंत बिस्वा सरमा यांची सर्व संमतीने नेतेपदी निवड करण्यात आली आहे. ही बैठक सुरु होण्यापूर्वी सर्वानंद सोनोवाल यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता आणि त्यांनीच हेमंत बिस्वा सरमा यांच्या नावाचा प्रस्ताव समोर ठेवला होता.
आसामचे माजी मुख्यमंत्री सर्बानंद सोनावल आणि हेमंत बिस्वा सरमा यांना शनिवारी दिल्लीमध्ये बोलवलं होतं. यावेळी या दोन नेत्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यानंतर हेमंत बिस्वा सरमा हेच आसामचे नवे मुख्यमंत्री असतील अशी चर्चा सुरु होती.
आसाममध्ये सलग दुसऱ्यांदा भाजपने आपली सत्ता राखली आहे. भाजपने 126 विधानसभा जागांपैकी 60 जागांवर विजय मिळवला असून भाजपचे सहयोगी पक्ष आसाम गण परिषदने नऊ तर पिपल्स पार्टी लिबरलने सहा जागांवर विजय मिळवला आहे. या निवडणुकीच्या आधी भाजपने आपला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित केला नव्हता.
हेमंत बिस्वा सरमा यांनी काँग्रेसच्या रोमेन चंद्र बोरठाकुर यांचा 1,01,911 मतांनी पराभव केला आणि जालुकबारी या मतदारसंघात विजय मिळवला.
महत्वाच्या बातम्या :