(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Assam Flood News : आसाममध्ये 2 हजाराहून अधिक गावं पाण्याखाली, 93 हजार हेक्टर शेतजमीनीला फटका
पुरामुळे आसाममधील जनजीवन विस्कळीत झालं आहे. तेथील परिस्थिती गंभीर झाली आहे. 31 जिल्ह्यातील जवळपास 6.80 लाख लोकांना या महापुराचा तडाखा बसला आहे.
Assam Flood News : आसाममध्ये पुराने (Assam Flood) हाहाकार घातला आहे. पुरामुळे आसाममधील जनजीवन विस्कळीत झालं आहे. तेथील परिस्थिती गंभीर झाली आहे. 31 जिल्ह्यातील जवळपास 6.80 लाख लोकांना या महापुराचा तडाखा बसला आहे. 93 हजार 562.40 हेक्टर पीक जमीन आणि 2 हजार 248 गावे अजूनही पाण्याखाली आहेत. मोरीगाव आणि करीमगंज या जिल्ह्यातील परिस्थिती आणखी गंभीर आहे. या जिल्ह्यातील नागाव, होजई, कचार, दारंग, या ठिकाणी अजूनही पूराचे पाणी असल्याने तेथील नागरिक चिंतेत आहेत.
आत्तापर्यंत 18 जणांचा मृत्यू
आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अहवालानुसार, एकट्या नागाव जिल्ह्यात जवळपास 3.40 लाख लोक बाधित झाले आहेत. त्यानंतर कछार जिल्ह्यात 1.78 लाख, होजईमध्ये 70 हजार 233, दारंग जिल्ह्यात 44 हजार 382, मोरीगाव जिल्ह्यात 17 हजार 776 आणि करीमगंज जिल्ह्यात 6 हजार 381 लोक बाधित झाले आहेत. काचर, होजई आणि नागाव जिल्ह्यात पुराच्या पाण्यात बुडून शुक्रवारी चार जणांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत पूर आणि भूस्खलनात 18 जणांचा मृत्यू झाला आहे. अहवालानुसार, 93 हजार 562.40 हेक्टर पीक जमीन आणि 2 हजार 248 गावे अजूनही पाण्याखाली असल्याची माहिती आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं दिली आहे.
4 लाख जनावरे बाधित
दरम्यान, एकूण 74,907 पूरग्रस्तांना सध्या जिल्हा प्रशासनाने उभारलेल्या 282 मदत छावण्यांमध्ये ठेवण्यात आले आहे. राज्यात सध्या आलेल्या पुरामुळे सुमारे 4 लाख जनावरे बाधित झाली आहेत. भारतीय लष्कर, SDRF, NDRF आणि स्वयंसेवकांच्या मदतीने एकूण 24 हजार 749 अडकलेल्या व्यक्तींची सुटका करण्यात आल्याची माहिती आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं दिली आहे. पुरामुळे अनेक रेल्वे स्थानके बंद करण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. पूर आणि भूस्खलनामुळे रस्ते, रेल्वे वाहतूक बंद झाली आहे. त्यामुळे लोकांचा संपर्क तुटला आहे. कचार, दिमा हासाओ, होजाई, चराईदेव, दररंग, धेमाजी, दिब्रुगड, बजाली, बक्सा, बिस्वनाथ आणि लखीमपूर या जिल्ह्यांवर सर्वाधिक परिणाम झाला आहे.
परिक्षा रद्द
या पुरामुळे आसाममध्ये इयत्ता 11वी च्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. परीक्षा आयोजित करणार्या आसाम उच्च माध्यमिक शिक्षण परिषदेने जारी केलेल्या अधिसूचनेत त्यांच्या अंतर्गत असलेल्या सर्व संस्थांच्या प्रमुखांना ही माहिती कळवली आहे. 1 जूनपर्यंतच्या सर्व परीक्षा पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या: