आंदोलनातील शेतकरी घरी परतले, आमच्या जेवणाचं काय? शेकडोंच्या समोर पुन्हा पोटाचा प्रश्न!
स्थानिक झोपडपट्टीवासीय नाश्ता, दुपारचे जेवण आणि संध्याकाळचे जेवण लंगरमध्ये करायचे. आज सकाळी या सर्वांनी लंगरमध्ये आपला शेवटचा नाश्ता केला.
![आंदोलनातील शेतकरी घरी परतले, आमच्या जेवणाचं काय? शेकडोंच्या समोर पुन्हा पोटाचा प्रश्न! As farmers return home the poor worry about food lodging आंदोलनातील शेतकरी घरी परतले, आमच्या जेवणाचं काय? शेकडोंच्या समोर पुन्हा पोटाचा प्रश्न!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/11/6b72bda5256cdd84ee42dcc3387d956e_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : कृषी कायद्यांविरोधात 378 दिवसांपासून सिंघू बॉर्डवर सुरू असलेले शेतकरी आंदोलन अखेर शेतकऱ्यांनी मागे घेतले आहे. सरकारने मागण्या मान्य केल्यानंतर आज शेतकरी आंदोनस्थळावरून सरकारने कायदे मागे घेतल्याचा आनंदोत्सव साजरा करत आपापल्या घरी परतत आहेत. परंतु, आता खरी चिंता लागलीय तेथील स्थानिकांना. कारण आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून आंदोलकांनी जेवणासाठी सिंघू सिमेवर लंगर सुरू केला होता. आंदोलनस्थळाजवळील अनेक लोक या लंगरमध्ये येवून जेवण करत होते. परंतु, आंदोलन संपवून शेतकरी घरी चालल्यामुळे 378 दिवसांपासून जेवणाची सोय होत असलेल्या स्थानिकांना आता जेवणाची चिंता सतावत आहे. सिंघू बॉर्डवरील 13 वर्षाचा आर्यन सांगतो, "आता आम्हाला जेवणाची काळजी वाटत आहे."
आर्यन सांगतो, "माझ्याप्रमाणे अनेक लोक शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या लंगरमध्ये मोफत जेवण करायचे आणि आंदोलनस्थळी उभारण्यात आलेल्या तंबूत झोपायचे."
शनिवारी सकाळी झोपडपट्टीवासीयांसह मोठ्या संख्येने मुले आणि स्थानिक गरीबांनी शेतकऱ्यांच्या लंगरमध्ये शेवटचा नाश्ता केला.
स्थानिक झोपडपट्टीवासीय नाश्ता, दुपारचे जेवण आणि संध्याकाळचे जेवण लंगरमध्ये करायचे. आज सकाळी या सर्वांनी लंगरमध्ये आपला शेवटचा नाश्ता केला. "आता आम्हाला स्वत: स्वयंपाक करावा लागेल किंवा जेवणासाठी दुसरा पर्याय शोधावा लागेल," असे कुंडली येथील झोपडपट्टीत राहणाऱ्या आर्यनने पीटीआयसोबत बोलताना सांगितले.
आंदोलनातील शेतकऱ्यांनी सांगितले की, झोपडपट्टीतील मुले आंदोलनस्थळी येत असत. त्यामुळे आम्हालाही आमची मुले आणि नातवांची आठवण येत असे. त्यामुळे या मुलांबद्दल आमच्याही मनात भावनिकता निर्माण झाली आहे.
"ही मुले आमच्या आंदोलनाचा एक भाग बनली होती. कारण ते येथे जेवणासाठी येत असत. त्यांनी मला माझ्या नातवाची आठवण करून दिली. इश्वर आता त्यांची काळजी घेईल," अशा भावना मोहाली येथील सतवंत सिंग यांनी पीटीआयशी बोलताना व्यक्त केल्या.
येथील झोपडपट्ट्यांमधील रहिवासी शक्यतो जवळच्या कारखान्यांमध्ये किंवा गोदामांमध्ये काम करून आपली रोजंदारी चालवितात. अनेक लोक बेघर आहेत. त्यामुळे ते शेतकऱ्यांनी उभारलेल्या तात्पुरत्या तंबूत राहत होते. आंदोलन संपल्यामुळे आता त्यांना राहण्याच्या व्यवस्थेची चिंता सतावत आहे. बिहारमधील सुपौल येथील मोनू कुशवाह सांगतात, "शेतकरी ओंलनाआधी हे लोक फूटपाथवर झोपायचे. परंतु गेल्या वर्षी आंदोलन सुरू झाल्यानंतर आमच्या तंबूत झोपू लागले. परंतु, आम्ही परत चालल्यामळे हे सर्व बंद झाले."
आठ वर्षाचा स्थानिक मोसम पीटीआयशी बोलताना सांगतो, "गेल्या एक वर्षापासून आम्ही शेतकरी आंदोलनात सुरू असलेल्या लंगरमध्येच जेवतो. माझे वडील जवळच्याच कारखान्यात काम करतात. परंतु, कुटुंब मोठे असल्यामुळे आम्हाला अनेकवेळा एक वेळचे जेवण मिळाले नाही. परंतु, लंगरमुळे आम्ही दोन्ही वेळेला जेवण करू शकत होतो.
आंदोलनस्थळी प्लास्टिक पत्रे, खांब गोळा करण्यात भंगार विक्रेते व्यस्त
आंदोलन संपवून शेतकरी आपल्या घरी परतत असतानाच स्थानिक भंगार विक्रेते मात्र, आंदोलनस्थळी पडलेले प्लास्टिकचे पत्रे, तंबू उभारण्यासाठी आणलेले बांबू, आंदोलनस्थळी पडलेले इतर साहित्य गोळा करण्यात व्यस्त आहेत.
आंदोलनातून परताना शेतकऱ्यांनी या भंगार विक्रेत्यांना आपले ब्लँकेट, लोकरीचे कपडे, इतर कपडे, पैसे आणि दैनंदिन वापराच्या काही वस्तू दिल्या.
सिंघू बॉर्डवरील कुंडली या गावाजवळ हरियाणाकडील महामार्गावर सुमारे पाच किलोमिटर जागेवर शेतकरी आंदोलनासाठी थाबले होते. या ठिकाणी त्यांनी राहण्यासाठी तंबू उभारले होते. या तंबूत शौचालये आणि स्वयंपाकघरांचीही सोय करण्यात आली होती.
संयुक्त किसान मोर्चासह (SKM)40 हून अधिक शेतकरी संघटना कृषी कायद्यांविरोधात आंदोलनासाठी एकत्र आल्या होत्या. केंद्राने हे कायदे मागे घेतल्यानंतर, गुरुवारी 378 दिवस चाललेले आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आणि आज आंदोलनस्थळावरून आपापल्या घरी परतले.
संबंधित बातम्या
EXCLUSIVE : पंजाबचे साथी सांगत होते, तुस्सी चिंता ना करो, सिंघू बॉर्डरवर तळ ठोकणाऱ्या मराठमोळ्या शेतकरी महिलेचा थरारक अनुभव
Farmers Protest Called Off : अखेर 378 दिवसांनी ऐतिहासिक शेतकरी आंदोलन स्थगित
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)