Amit Shah : नेहरुंनी फक्त काश्मीरचा प्रश्न हाती घेतला आणि तोही अर्धवट सोडला, अमित शाहांचा राज्यसभेत हल्लाबोल
Amit Shah : काश्मीरमध्ये लष्कर पाठवण्यास खूप उशीर केला, असं म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं.
मुंबई : नेहरुंनी फक्त काश्मीरचा (Kashmir) प्रश्न हाती घेतला होता आणि तोही अर्धवट सोडला असल्याचं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी केलंय. देशाचा एक भाग वेगळा होतोय आणि ते फक्त बघत बसण्याचा अधिकार आपल्या कोणालाही नाही, असं अमित शाह यांनी थेटच म्हटलं. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) केंद्र सरकारचा कलम 370 (Article 370) हटवणं हा निर्णय वैध ठरवल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत याविषयी भाष्य केलं.
या मुद्द्यावरुन राज्यसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं. तेव्हा हे सगळं सरकारने केलं होतं,असं म्हणत काँग्रेसने देखील अमित शाह यांच्या दाव्यांना प्रत्युत्तर दिलं. पण अमित शाह यांनी काँग्रेसच्या या दाव्यांचं देखील खनन केलं. यावर त्यांनी म्हटलं की, काश्मीरच्या रेकॉर्डवर आहे की, काश्मीरमध्ये तेव्हा दोनच लोकं गेली होती. त्या रेकॉर्डवर शेख अब्दुल्ला आणि जवाहरलाल नेहरु यांचंच नाव आहे. त्यामध्ये सरदार पटेलांचं देखील नाव नाही, असं अमित शाह यांनी म्हटलं. सरदार पटेल तर गृहमंत्री होते, त्यांचं नाव का नाही देण्यात आलं असा सवाल देखील अमित शाह यांनी उपस्थित केला आहे.
एकच काम हाती घेतलं आणि तेही अर्धवट सोडलं - अमित शाह
नेहरुंमुळे काश्मीर भारतात आहे, असं म्हटलं जातं. ज्यांना स्वातंत्र्यानंतरच्या भारताची रचना माहित असेल तर तेव्हाच्या अडचणी देखील माहित असतील. हैदराबादमध्ये यापेक्षा मोठी अडचण निर्माण झाली होती. तिथे काय जवाहरलाल नेहरु गेले होते का? असा सवाल अमित शाह यांनी केला. जयपूर, लक्षद्वीप, जुनागड, हैदराबाद या शहरांमध्ये जवाहरलाल नेहरु गेले होते का. जवाहरलाल नेहरु हे फक्त एकच काम बघत होते ते म्हणजे जम्मू आणि काश्मीरचं ते देखील ते अर्धवट सोडून आले, असा घणाघात अमित शाह यांनी केलाय.
'उशीर होण्याचं दुसरं कारण म्हणजे...'
सगळ्यांना माहित आहे, काश्मीर भारतात विलिन होण्यासाठी वेळ का लागला. काश्मीरच्या राजाच्या जागी कोणत्या दुसऱ्या व्यक्तीला विशेष स्थान देण्याचा आग्रह होता. ते स्थान सरकारला शेख अब्दुला यांना द्यायचं होतं, त्यामुळे काश्मीर भारतात विलिन होण्यासाठी वेळ गेला. त्यातच पाकिस्तानला भारतावर हल्ला करण्यासाठी वेळ मिळाला आणि तो त्यांनी केला. एवढ्या कठिण राज्यांचं विलिनीकरण झालं तिथे 370 का लागू केलं नाही, असा सवाल देखील अमित शाह यांनी उपस्थित केलाय.
सैन्य पाठवण्यास उशीरा का झाला, अमित शाह यांचा सवाल
सॅम माणिक शॉ हे तेव्हा लष्काराचे प्रमुख होते, त्या बैठकीत सरदार वल्लभ पटेलांनी जवाहरलाल नेहरु यांना विचारलं की सैन्य पाठवायला उशीर का होतोय, तुम्हाला काश्मीर हवंय की नको. त्यानंतर काश्मीरमध्ये सैन्य पाठवण्यात आले, असं अमित शाह यांनी म्हटलं.