Mohan Yadav : अबब! नव्या मुख्यमंत्र्यांनी 5 कोटी रूपये फक्त शेअर बाजारात गुंतवले, मध्य प्रदेशचे सीएम मोहन यादव यांची 'इतकी' कोटी संपत्ती
Madhya Pradesh CM Mohan Yadav Property : मध्य प्रदेशमध्ये मिळालेल्या शानदार विजयानंतर उज्जैन दक्षिण मतदारसंघातून आमदार झालेले मोहन यादव यांच्याकडे राज्याची कमान सोपवण्यात आली आहे.
भोपाळ: मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी आता महाकालनगरी उज्जैनचे आमदार मोहन यादव (Mohan Yadav) यांच्या नावाची वर्णी लागली आहे. राज्यात 163 जागांवर अभूतपूर्व विजय मिळवल्यानंतर भाजपने मोठ्या विचारमंथनानंतर मोहन यादव यांच्यावर विश्वास व्यक्त केला. नवीन मुख्यमंत्री मोहन यादव यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती असून त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने शेअर बाजारात 5 कोटी रुपयाहून अधिक रुपयांची गुंतवणूकही केली आहे.
मोहन यादव यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत शेती, व्यवसाय आणि भाड्याचे उत्पन्न आहे. त्यांच्याकडे सुमारे 9 कोटी रुपयांची जंगम आणि 32 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांची एकूण संपत्ती 42.04 कोटी रुपये आहे. 2018 च्या निवडणुकीपूर्वी ती 31.97 कोटी रुपये होती. जमीन आणि इतर स्थावर मालमत्तेच्या रूपाने त्यांची बहुतांश संपत्ती वाढली आहे.
शेअर्समध्ये कोट्यवधींची गुंतवणूक (CM Mohan Yadav Share Market Investment)
मोहन यादव यांच्याकडे फक्त 1.41 लाख रुपये रोख आहेत. तर पत्नी सीमा यादव यांच्याकडे 3.38 लाख रुपये रोख आहेत. त्याचवेळी त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या बँक खात्यांमध्ये 27 लाखांहून अधिक रक्कम जमा आहे. त्यांच्या कोट्यवधींच्या संपत्तीचा मोठा भाग म्हणजे त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या नावावर वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये असणारे शेअर्स होय.
निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार मोहन यादव यांच्या नावावर एकूण 2,70,28,750 रुपयांचे शेअर्स आहेत. तर त्यांची पत्नी सीमा यादव यांच्याकडे 2,91,31,317 रुपयांचे शेअर्स आहेत. याशिवाय हिंदू अविभक्त कुटुंबानुसार त्यांच्या मुलांच्या नावे सुमारे 80 लाख रुपयांचे शेअर्स आहेत. याशिवाय त्यांनी वेगवेगळ्या विमा योजनांमध्येही मोठी गुंतवणूक केली आहे.
यादव हे कोट्यवधी किमतीच्या जमिनीचे मालक
मोहन यादव यांच्याकडे 8.40 लाख रुपयांचे सोने आहे. त्यांच्या पत्नीकडे सोने-चांदीसह सुमारे 15 लाख रुपयांचे दागिने आहेत. तर मोहन यादव यांच्याकडे शेतजमीन, बिगरशेती जमीन, व्यावसायिक इमारती आणि निवासी इमारतींसह कोट्यवधींची मालमत्ता आहे. त्यांची अंदाजे किंमत 32 कोटी रुपये इतकी आहे.
मोहन यादव उज्जैन दक्षिणमधून तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. मोहन यादव हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जवळचे मानले जातात. शिवराज सिंह चौहान यांच्या मंत्रिमंडळात मोहन यादव यांनी शिक्षणमंत्री म्हणून काम केलं आहे. 2013 मध्ये मोहन यादव पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले होते. आमदारकीच्या तिसऱ्या टर्ममध्ये मोहन यादव यांना मुख्यमंत्री होण्याचा मान मिळाला आहे.
ही बातमी वाचा: