(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कोरोना लसीत डुक्कराची चरबी असेल तर 'हराम', सरकारनं आधीच माहिती द्यावी- ऑल इंडिया सुन्नी जमीयत उलेमा
डुक्कराचं मांस इस्लाममध्ये निषिध्द असल्यानं जर कोरोना लसीमध्ये त्याचा वापर करण्यात येत असेल तर सरकारनं त्याची आधीच कल्पना द्यावी, असं ऑल इंडिया सुन्नी जमीयत उलेमा या संघटनेनं म्हटलं आहे.
मुंबई: एकीकडे UAE ने डुक्कराच्या मांसाच्या अशांचा वापर करण्यात आलेल्या कोरोना लसीच्या वापराला मंजुरी दिली असताना भारतातील मुस्लिम संघटनांनी मात्र त्याला विरोध करण्याचं ठरवलंय. मुंबईत बुधवारी झालेल्या ऑल इंडिया सुन्नी जमीयत उलेमा या संघटनेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. जर कोरोना लसीत डुक्कराच्या मांसाच्या अंशाचा वापर करण्यात आला असेल तर त्याची कल्पना सरकारनं आधीच द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
मुस्लिमांमध्ये डुक्कराच्या मांसाला 'हराम' मानलं जातं, त्यामुळे कोरोनाच्या लसीमध्ये जर त्याचा वापर करण्यात आला असेल तर अशा लसीच्या वापराला इस्लाम मान्यता देत नाही. कोरोनाच्या लसीमध्ये वापरण्यात येणाऱ्या घटकांची माहिती सरकारने आधीच द्यावी असा ठराव या बैठकीत पारित करण्यात आला आहे.
कोरोना रुग्णांची संख्या भारतात एक कोटीच्या वर गेली असून त्यात लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. अशा वेळी भारतासह सर्व जग कोरोनाच्या लसीची आतुरतेनं वाट पाहत असताना हा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कोरोनाची लस अंतिम टप्प्यात असताना यामध्ये डुक्कराच्या चरबीचा वापर करण्यात येत आहे असा संदेश सोशल मीडियावर फिरत आहे. यावरुन सध्या अनेक मुस्लिम देशांत वाद सुरु आहे.
त्याचे परिणाम भारतातही उमटत आहे. याच विषयावर मंगळवारी मुंबईत ऑल इंडिया सुन्नी जमीयत उलेमा या संघटनेची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत अशा प्रकारची लस मुस्लिमांनी वापरणे निषिध्द असल्याचं सांगण्यात आलंय. त्यामुळे समाजाच्या मौलवींशी सरकारने आधी चर्चा करावी आणि मगच ही लस वापरायची की नाही याचा निर्णय घेण्यात येईल असंही सांगण्यात आलंय.
UAE या देशात पोर्क-जिलेटिनच्या वापराला मान्यता या प्रश्नावरुन जगभरात वाद-विवाद सुरु असताना UAE या देशानं मात्र डुक्कराच्या मांसाचा अंश (पोर्क-जिलेटिन) असणाऱ्या कोरोनाच्या लसीच्या वापराला मंजुरी दिली आहे. UAE ची फतवा परिषद या सर्वोच्च इस्लामिक संघटनेनं याच्या वापराला मान्यता देताना स्पष्ट केलंय की डुक्कराच्या उत्पादनाच्या वापराचा इस्लाममध्ये जरी निषिध्द असला तरी मनुष्याचा जीव वाचवण्यास प्राधान्य देण्यात येईल. त्यामुळे कोरोना लसीच्या बाबतीत इस्लामची तत्वे बाजूला ठेवून या लसीच्या वापराला मंजुरी देण्यात येत असल्याचं UAE च्या फतवा परिषदेनं म्हंटलं आहे.
महत्वाच्या बातम्या: