Ahmedabad Plane Crash: पिंपरीचा 22 वर्षांचा इरफान, अपघातग्रस्त विमानात केबिन क्रू, ईदसाठी घरी येऊन गेला, परतलाच नाही!
Ahmedabad Plane Crash: अत्यंत मनमिळावू असलेला इरफान नुकताच ईदसाठी घरी ही येऊन गेला होता. त्याच्या जाण्याने त्यांच्या नातेवाईकांना धक्का बसला आहे.

पुणे: गुजरातच्या अहमदाबादमध्ये झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात (Ahmedabad Plane Crash) इरफान शेख या 22 वर्षीय क्रू मेंबरचा ही दुर्दैवी अंत झाला आहे. इरफान हा पिंपरी चिंचवडच्या संत तुकाराम नगर मध्ये राहायला होता. आजी आजोबा आई वडील भाऊ असं कुटुंब असलेला इरफान दोन वर्षापासून एअर इंडियामध्ये (Ahmedabad Plane Crash) कामाला लागला होता. अत्यंत मनमिळावू असलेला इरफान नुकताच ईदसाठी घरी ही येऊन गेला होता. त्याच्या जाण्याने त्यांच्या नातेवाईकांना धक्का बसला आहे. त्याचा मृतदेह लवकरात लवकर मिळावा अशी मागणी त्याचे नातेवाईक करत आहेत.(Ahmedabad Plane Crash)
मिळालेल्या माहितीनुसार, इरफान हा पिंपरी चिंचवड मधील संत तुकाराम नगरचा रहिवाशी आहे. सध्या मुंबईत राहत होता. 2 वर्षांपासून एअर इंडियाशी जोडला गेला. आधी डोमेस्टिक क्रू आणि नंतर इंटरनॅशनल क्रू मध्ये कार्यरत होता. कुटुंबात आई-वडील, मोठा भाऊ, आज्जी-आजोबा असतात. शेख कुटुंबीय मूळचे साताऱ्यातील मेढा येथील आहेत, मात्र गेल्या पन्नास वर्षांपासून पिंपरीत स्थायिक झाले आहेत.
विमानात क्रू मेंबर्ससह 242 लोक
गुरुवारी दुपारी अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान टेकऑफ झाल्यानंतर काही मिनिटांतच कोसळले. विमानाचा काही भाग डीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेल इमारतीवरही पडला, ज्यामुळे इमारतीचे बरेच नुकसान झाले.विमानात दोन पायलट आणि 10 क्रू मेंबर्ससह 242 लोक होते. या अपघातात क्रू मेंबर्ससह 241 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, अहमदाबाद पोलिस आयुक्तांनी माहिती दिली आहे की, एक व्यक्ती जिवंत आहे. विमान अपघातातून वाचलेल्या व्यक्तीवर उपचार सुरू आहेत.
पुन्हा एकदा विमान सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
या दुर्घटनेनंतर विमान कंपन्यांच्या सुरक्षाव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला आहे. लोअर रेंज टेक्निकल बिघाड, इंजिन फेल्युअर किंवा वैमानिकाची चूक, या दुर्घटनेमागे नेमकं काय कारण होतं, याचा तपास सुरू आहे. या अपघातात लहान मुलं, महिला आणि वृद्ध देखील होते, त्यामुळे ही घटना अधिकच वेदनादायक ठरली आहे.
दुर्घटनेची चार संभाव्य कारणं?
1) विमानाच्या दोन्ही इंजिनात एकाच वेळी बिघाड झाला असावा...
2) लँडिंग गियर टाकता आला नसावा, लँडिंग गियर वेग कमी करतो...
3) पक्ष्याची विमानाला धडक बसली असावी...
4) टेक ऑफला मदत करणारे विमानाच्या पंखांचे फ्लॅप खाली केलेल्या स्थितीतच राहिले असावेत...
या घटनेमध्ये 265 जणांचा दुर्दैवी मृत्यू
अहमदाबाद विमान अपघातात 265 जणांचा मृत्यू झाला आहे. यात विमानातील 241 प्रवासी तर विमान ज्या भागात कोसळलं तिथल्या 24 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये राज्यातील 9 जणांचा समावेश आहे. अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून लंडनकडे उड्डाण केल्यावर अवघ्या 12 ते 15 सेकंदात हा भीषण अपघात झाला. विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचं निधन झालं आहे. दरम्यान, विमान दुर्घटनेतल्या मृतांच्या वारसांना टाटा समूहाकडून 1 कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे. जखमींचा उपचाराचा खर्चही टाटा समूहच करणार आहे. डॉक्टरांचं हॉस्टेलही नव्यानं बांधून देणार असल्याचं टाटा समुहाने जाहीर केलं आहे. टाटा समूह हॉस्टेलही बांधून देणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
























