(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Taliban : काश्मिरातील मुस्लिमांसाठी आम्हाला आवाज उठवण्याचा हक्क; तालिबानच्या प्रवक्त्याचं मोठं वक्तव्य
Afghanistan Crisis : अफगाणिस्तानमधील तालिबानी (Taliban ) दहशतवाद्यांच्या मदतीने पाकिस्तान काश्मिरातील दहशतवादी कारवायांत वाढ करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
काबुल : काहीच दिवसांपूर्वी आम्हाला भारतासोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवायचं असल्याचं तालिबानने स्पष्ट केलं होतं. आता काश्मिरातील मुस्लिमांसाठी आपल्याला आवाज उठवण्याचा हक्क असल्याचं तालिबानच्या प्रवक्त्याने सांगितलं आहे. त्यामुळे तालिबान्यांच्या आडाने पाकिस्तान काश्मिरातील फुटीरतावादी गटाला उसकवणार आणि भारतातील दहशतवादी कारवायांत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तालिबानचा प्रवक्ता सुहैल शाहीन याने झुम कॉलच्या माध्यमातून बीबीसीला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तो म्हणाला की, भारतातील जम्मू-काश्मीरमधील मुस्लिम असतील वा इतर देशांतील मुस्लिम असतील, धर्माच्या आधारे त्यांच्यासाठी आवाज उठवण्याचा तालिबानला पूर्ण हक्क आहे. आम्ही काश्मिरातील मुस्लिमांच्या हक्कांसाठी आवाज उठवू आणि भारताला सांगू की मुस्लिम हे तुमचेच नागरिक आहेत, त्यांना समान अधिकार मिळाला पाहिजे.
केंद्र सरकारने 2019 साली कलम 370 रद्द करुन जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतला होता. तेव्हापासून त्या राज्यातील सरकार बरखास्त करुन तिथले प्रशासन केंद्राने आपल्या हाती घेतले आहे. या मुद्द्यावरुन काश्मीरमधील लोकांमध्ये अन्यायाची भावना निर्माण झाली असून त्याचा फायदा पाकिस्तान घेण्याच्या तयारीत आहे.
अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा केल्यानंतर आता तालिबानी दहशतवाद्यांच्या मदतीने पाकिस्तान भारतातील दहशतवादी कारवायांत वाढ करण्याचा प्रयत्न करत असल्याचं स्पष्ट झालंय.
काही दिवसांपूर्वी तालिबानचा नेता मौलवी झियाऊल हक्कमल यांने एबीपी न्यूजशी बोलताना सांगितलं होतं की, भारत आमचा शत्रू नाही आणि आम्हाला भारताशी चांगले आणि मैत्रीपूर्ण संबंध हवे आहेत. भारत हा या क्षेत्रातील एक महत्त्वाचा देश आहे आणि आम्हाला भारतासोबत चांगले व्यापार आणि आर्थिक संबंध हवे आहेत अशी तालिबानची भूमिका असल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं. तालिबानच्या एका प्रभावशाली गटाला याची जाणीव आहे की भारताने अफगाणिस्तानात अनेक विकास कामे केली आहेत. भारत हा एकमेव देश आहे जो अफगाणिस्तानमध्ये प्रामाणिकपणे हिताची कामे करत आहे अशीही भावना या गटाची आहे.
संबंधित बातम्या :