ABP C Voter Survey: सोनिया गांधी मिशन 2024 साठी अॅक्शन मोडमध्ये, कोणाचं वाढणार टेन्शन? सर्वेक्षणातून लोकांचा कल समोर
ABP C Voter Survey: लोकसभा निवडणुकीपूर्वी एनडीए आणि विरोधक हे दोन्ही पक्ष आपापली ताकद वाढवण्याच्या प्रयत्नात आहेत. याबाबत सी-व्होटरनं एबीपी न्यूजसाठी सर्वेक्षण केलं आहे.
ABP C Voter Survey: 2024 च्या लोकसभा निवडणुकांसाठी (Lok Sabha Election 2024) भाजप (BJP) विरोधी पक्षांनी एकजुट केली आहे. 18 जुलै रोजी एनडीएच्या घटक पक्षांची दिल्लीत बैठक झाली, तेव्हा विरोधी पक्षांनीही बंगळुरूमध्ये आपली ताकद दाखवली. विशेष म्हणजे, भाजप असो वा काँग्रेस, दोघांनीही छोट्या पक्षांना एकत्र करण्याची मोहीम सुरू केली आहे. काही दिवसांच्या काँग्रेसच्या वतीनं सोनिया गांधी (Sonia Gandhi) स्वत: यासाठी अॅक्शन मोडमध्ये आहेत. याबाबत सी-व्होटरने एबीपी न्यूजसाठी अखिल भारतीय सर्वेक्षण केले असून, त्यात धक्कादायक उत्तरे मिळाली आहेत.
सर्वेक्षणात लोकांना विचारण्यात आलं की, विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी सोनिया गांधी यांचं पुन्हा राजकारणात सक्रिय होणं विरोधी पक्षांना बळ देईल का? यावर 51 टक्के लोकांनी होय असे उत्तर दिलं आहे. 39 टक्के लोकांचा असा विश्वास आहे की, असं होणार नाही, तर 10 टक्के लोकांनी याबाबत काहीच माहिती नाही, असं म्हटलं आहे.
विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी सोनिया गांधी यांचं सक्रिय होणं विरोधी पक्षांना बळ देईल?
स्रोत : सी व्होटर
हो : 51 टक्के
नाही : 39 टक्के
माहिती नाही : 10 टक्के
छोट्या पक्षांना बैठकीसाठी आमंत्रित करणं सोनिया गांधींचा मास्टर स्ट्रोक?
सर्वेक्षणात सहभागी झालेल्या लोकांना असंही विचारण्यात आलं की, विरोधी पक्षांच्या बैठकीत छोट्या पक्षांना आमंत्रित करणं हा सोनिया गांधींचा मास्टरस्ट्रोक आहे का? यावर उत्तर देताना 55 टक्के लोकांनी हो असं उत्तर दिलं आहे. तर 31 टक्के लोकांनी नाही, असं म्हटलं आहे. तर, 14 टक्के लोकांनी माहित नाही असं म्हटलं आहे.
राहुल गांधी नाहीतर मग दुसरा पर्याय कोण?
सर्वेक्षणात राहुल गांधींनंतर कोण? असा प्रश्नही विचारण्यात आला. यावरही लोकांनी अत्यंत आश्चर्यकारक उत्तरं दिली आहेत. दरम्यान, राहुल गांधींना शिक्षा सुनावल्यानंतर त्यांनी संसदेचं सदस्यत्व गमावलं आहे आणि ते निवडणूकही लढवू शकत नाहीत. याबाबत त्यांनी हायकोर्टात दाद मागितली, पण अद्याप त्यांना दिलासा मिळालेला नाही. त्यावर सर्वेक्षणात सहभागी लोकांना प्रश्न विचारण्यात आला की, राहुल गांधींना दिलासा न मिळाल्यास विरोधकांसमोर कोणता पर्याय असेल?
या प्रश्नावर सर्वेक्षणात सहभागी लोकांनी दिलेली उत्तरं खरंच खूप आश्चर्यकारक होती. राहुल गांधींनंतर प्रियंका गांधी पहिल्या क्रमांकावर आहेत. 33 टक्के लोकांनी प्रियंका गांधी योग्य पर्याय ठरतील असं म्हटलं आहे. नितीशकुमार आणि अरविंद केजरीवाल यांना लोकांनी सारखीच पसंती दर्शवली आहे. 14 टक्के लोकांनी राहुल गांधींऐवजी पर्याय म्हणून सारखीच मत दिली आहेत. ममता बॅनर्जी 10 टक्के मतांसह चौथ्या क्रमांकावर आहेत. 29 टक्के लोकांनी माहिती नाही, अंस म्हटलं आहे.