बंगालनंतर पंजाबमध्ये काँग्रेसला धक्का;आप स्वबळावर लढणार, CM भगवंत मान यांची घोषणा
Lok Sabha Election 2024 : ममता बॅनर्जी यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर आता पंजाबमध्ये ही आम आदमी पक्ष कोणतीही आघाडी करणार नसल्याचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी म्हटले.
I.N.D.I.A Seat Sharing : लोकसभा निवडणुकीआधी विरोधकांची मोट (I.N.D.I.A. Alliance) बांधण्याच्या प्रयत्नात असलेल्या काँग्रेसला (Congress) धक्का बसला आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या (TMC) ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर आता पंजाबमध्ये ही आम आदमी पक्ष कोणतीही आघाडी करणार नसल्याचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी म्हटले.
पंजाबचे मुख्यमंत्री आणि आप नेते भगवंत मान म्हणाले की, पंजाबमध्ये आमचा काँग्रेसशी काहीही संबंध नाही. आम आदमी पार्टीने पंजाबमधील 13 लोकसभेच्या जागांसाठी सुमारे 40 उमेदवार निवडले आहेत. लोकसभेच्या 13 जागांसाठी पक्षाकडून उमेदवारांचे सर्वेक्षण सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
चंदीगड महापालिका निवडणुकीत काँग्रेससोबत युती करण्याबाबत भगवंत मान म्हणाले की, आम आदमी पार्टी लोकसभेच्या जागा 14 पर्यंत वाढवू शकते, एक जागा चंदिगडचीही आहे. चंदिगड लोकसभेच्या जागेवर काँग्रेसचा दावा आहे. याआधी काँग्रेसने या मतदारसंघातून विजय मिळवला आहे.
दिल्लीत काँग्रेस-आप मध्ये आघाडी होणार?
दिल्लीत काँग्रेससोबत आघाडी करण्यास आपने तयारी दर्शवली आहे. दिल्लीत लोकसभेच्या सात जागा आहेत. सध्या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये जागा वाटपाच्या चर्चा सुरू आहेत. दोन्ही पक्षांनी भाजपविरोधात एकजूट दाखवण्याची तयारी दर्शवली आहे.
ममता बॅनर्जींनी दिला धक्का
तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये भाजपचा पराभव करण्यासाठी आपण एकट्याच पुरेशा आहोत, असे म्हणत लोकसभा निवडणुकीसाठी स्वबळावर उमेदवार लढवणार असल्याची घोषणा केली. काँग्रेसला जागा वाटपाबाबत एक प्रस्ताव दिला होता. मात्र, त्यांनी त्याला नकार दिला. आता बंगालमध्ये आम्ही स्वतंत्रपणे लढणार असल्याचे त्यांनी म्हटले.
अपेक्षित निर्णय?
बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस, काँग्रेस आणि डावी आघाडी आणि भाजप अशी लढत होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत होता. स्थानिक पातळीवरील परिस्थितीनुसार, तृणमूल काँग्रेस स्वतंत्र लढणार असल्याचे म्हटले जात होते. तर, पंजाबमध्ये काँग्रेस आणि आप स्वतंत्र लढणार असल्याचा कयास बांधला जात होता. पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दल आणि भाजप स्वतंत्र लढणार आहेत. आप आणि काँग्रेसची युती झाल्यास त्याचा फायदा भाजप-शिरोमणी अकाली दलाला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दोन राज्यात अपेक्षित निर्णय झाल्याची चर्चा आहे. काँग्रेससाठी उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र या राज्यातील जागावाटप आणि आघाडी महत्त्वाची आहे.