रामनवमीला होस्टेल मेसमधल्या मांसाहारी जेवणावरुन JNU मध्ये वादावादी आणि हिंसक झडप
कुणी काय खावं, काय प्यावं हा खरंतर वैयक्तिक प्रश्न..पण सध्या देशात यावरुन सामूहिक हिंसेचे प्रकार वाढत चाललेत. ताजं प्रकरण आहे दिल्लीच्या जेएनयूमधलं.
नवी दिल्ली : विद्यार्थ्यांचे रक्तबंबाळ चेहरे..दोन गटांमधे हिंसक झडप..हे चित्र आहे देशातल्या प्रतिष्ठित जेएनयू विद्यापीठातलं. जेएनयूमधल्या नव्या वादाला निमित्त ठरलं आहे रामनवमीच्या दिवशी होस्टेल मेसमधलं नॉनव्हेज जेवण. अभाविप आणि डाव्या संघटनाच्या विद्यार्थ्यांमध्ये यावरुन जोरदार बाचाबाची आणि नंतर हिंसक झडपही झाली. आता दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.
आम्हाला काल चार-पाचच्या सुमारास माहिती मिळाली की अभाविपच्या काही विद्यार्थ्यांनी मेस मॅनेजरला नॉनवेज जेवण बनवणं थांबवण्यासाठी धमकी दिली, चिकन विक्रेत्याला हाकलून दिलं आणि मेस समितीच्या सदस्यांवर हल्ला केला. विद्यार्थ्यांनी मांसाहारावर बंदी घालण्याच्या प्रयत्नांना विरोध केल्याने अभाविपने जेएनयूमध्ये हल्लाबोल केला. यामध्ये 50 ते 60 जण जखमी झाले आहेत, असा आरोप डाव्या संघटनांच्या विद्यार्थ्यांनी केला. आम्हाला कोणाच्याही प्रार्थनेची कोणतीही अडचण नाही, असंही त्यांनी म्हटलं.
तर दुसरीकडे अभाविपचा आरोप आहे की रामनवमीच्या दिवशी जी पूजा आयोजित केली होती, त्याला डाव्या संघटनांच्या विद्यार्थ्यांनी विरोध केला. "रामनवमीच्या निमित्ताने विद्यापीठात पूजेदरम्यान डावे आणि NSUI कार्यकर्ते गोंधळ घालतात. मांसाहाराचा कोणताही मुद्दा नाही. त्यांना रामनवमीच्या निमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमांची अडचण आहे," असा आरोप अभाविपच्या जेएनयू विंगचे अध्यक्ष रोहित कुमार यांनी म्हटलं.
विद्यापीठातील वातावरण काल (10 एप्रिल) दुपारपासूनच तापत चाललं होतं. त्यानंतर विद्यापीठातल्या कावेरी होस्टेलच्या मेसवर या वादाचं पर्यावसान हाणामारीत झाल्याचं समजतं. रात्री साडेसात आठच्या सुमारास या होस्टेल मेससमोरचे हे दोन्ही गट समोरासमोर आल्याचं दिसतं.
रामनवमीच्या दिवशी होस्टेलमध्ये नॉनव्हेज नको, असं म्हणत हा वाद सुरु झाला. अभाविपच्या विद्यार्थ्यांनी मेसच्या सेक्रेटरीला आणि स्टाफला यावरुन हाणामारी केल्याचंही जेएनयूएसयूच्या पत्रकात म्हटलं आहे. विशेष म्हणजे या घटनेवळी दिल्ली पोलिसांचे कॉन्टेबलही तिथे हजर होते. पण त्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतल्याचाही आरोप डाव्या संघटनांनी केला आहे.
जेएनयू आणि वाद हे समीकरण काही नवीन नाही. त्यात आता या मालिकेत एक नव्या प्रकरणाची भर पडली आहे. काल रामनवमीच्या दिवशी देशात अनेक ठिकाणी हिंसेचे प्रकार घडले. गुजरात, मध्यप्रदेश, झारखंड, बंगालपासून अनेक ठिकाणी हिंसेच्या घटना घडल्या. त्यात आता विद्यापीठ पण या हिंसक राजकारणाचं क्षेत्र बनल्याचं यानिमित्तानं दिसत आहे.
रामनवमी म्हणजे चैत्र नवरात्रीचा समारोपाचा दिवस. या नवरात्रात मांस, मटणाची दुकानं बंद ठेवावीत असेही आदेश काही ठिकाणे काढले गेल्यानं वाद झाला होता. त्यात आता विद्यापीठांमध्येही या खाण्यापिण्याच्या निर्बंधांचं लोण पोहचल्याचं दिसतं आहे. जेएनयूमध्ये याच्या आधी झालेल्या प्रकरणांनी देशात वादळ उमटवलं होतं. आता या ताज्या प्रकरणात पोलिसांचा तपास कुठल्या दिशेनं जातो हे पाहणं महत्वाचं असेल.