बेळगावातील BSF जवानाच्या अंधाधुंद गोळीबारात पाच सहकारी जवान मृत्युमुखी
BSF जवान सत्यप्पा याचे मानसिक संतुलन काही दिवसांपासून बिघडले होते त्यामुळे तो नेहमी तणावाखाली होता. ड्युटीवरुन झालेल्या वादातून त्याने अंधाधुंद गोळीबार केला, ज्याच पाच जणांचा मृत्यू झाला.
अमृतसर : बीएसएफमध्ये सेवा बजावत असलेल्या बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील जुन्या वंटमुरी गावच्या जवानाने स्वतःच्या बंदुकीने अंधाधुंद गोळीबार करुन पाच सहकाऱ्यांचा जीव घेतला आणि स्वतःही आत्महत्या केली. सत्यप्पा सिद्धाप्पा किलारगी असे त्या जवानाचे नाव असून पंजाबमधील अमृतसर जिल्ह्यातील बीएसएफच्या खासा इथल्या युनिटमध्ये सेवा बजावत होता. ड्युटीचे तास जास्त असल्याच्या तणावात त्याने हे कृत्य केल्याचं म्हटलं जातं.
सेवा बजावत असताना रविवारी (6 मार्च) बटालियन 144 च्या सत्यप्पा किलारगीने आपल्या बंदुकीतून अंधाधुंद गोळीबार करुन पाच सहकाऱ्यांचा जीव घेतला. यानंतर त्याने स्वतःही गोळी झाडून आत्महत्या केली. त्याच्या गोळीबारात पाच जणांना जीव गमावावा लागला असून दहा जण जखमी झाले आहेत. जखमींना तेथील स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
सत्यप्पा याचे मानसिक संतुलन काही दिवसांपासून बिघडले होते त्यामुळे तो नेहमी तणावाखाली होता. ड्युटीवरुन झालेला वाद हे गोळीबाराचं कारण सांगितलं जात आहे. ड्युटीचे तास जास्त असल्या कारणाने तो तणावाखाली होता. यावरुन त्याने एका अधिकाऱ्यासोबत वादही घातला होता.
खासामधील बीएसएफ हेडक्वॉर्टरच्या मेसमध्ये बटालियन 144 चे जवान नाश्ता करत होते. यादरम्यान कॉन्स्टेबल सत्यप्पा किलारगी रागाच्या भरात आपल्या रायफलमधून अंधाधुंद गोळीबार केला. सत्यप्पा ड्युटीवरुन नाराज होता. त्यावरुन झालेल्या वादातून त्याने सहकाऱ्यांवर गोळीबार केला, ज्याच पाच जणांचा मृत्यू झाला. सत्यप्पा एवढ्यावरच थांबला नाही. आपली सर्व्हिस कम्बाईन घेऊन ते मेसबाहेर आला आणि गोळ्या झाडू लागला. पकडले जाऊ या भीतीने त्याने स्वत:वर गोळी झाडली. या घटनेनंतर मुख्यालयात एकच गोंधळ उडाला होता.
घटनेची माहिती मिळताच बीएसएफचे अधिकारी घटनास्थळी झाले. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. तर जखमींच्या कुटुंबीयांना संबंधित प्रकाराची माहिती देण्यात आली.
दरम्यान आयजी बॉर्डर आसिफ जलाल यांनी गुरुनानक देव रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. हा प्रकार कोणत्याही वैयक्तिक वादाचा किंवा गटबाजीचा नाही, असं आसिफ जलाल यांनी सांगितलं. प्रकरणाचा तपास सुरु असल्याचं ते म्हणाले.