Omicron In india: भारतातील ओमायक्रॉनबाधितांची संख्या 358 वर, मुंबईतही मागील दोन महिन्यात सर्वाधिक कोरोना रुग्णांची वाढ
Omicron In india: भारतात ओमिक्रॉन रुग्णांच्या (India Omicron Cases) संख्येत झपाट्यानं वाढ होताना दिसत आहे.
Omicron In india: भारतात ओमिक्रॉन रुग्णांच्या (India Omicron Cases) संख्येत झपाट्यानं वाढ होताना दिसत आहे. ज्यामुळं प्रशासनाचे दाबे दणाणले आहेत. देशात आतापर्यंत ओमायक्रॉनचे 358 रुग्णांची नोंद झालीय. यापैकी 114 रुग्णांनी कोरोनावर मात केलीय. तर, देशभरात सध्या 244 ओमायक्रॉनच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मात्र, दीड ते तीन दिवसात रुग्ण दुप्पट होत असल्यानं आरोग्य विभागाकडून चिंता व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे सर्वाधिक 88 रुग्ण आढळून आले आहेत. त्यानंतर दिल्लीत 67 आणि तेलंगणात 38 रुग्णांची नोंद करण्यात आलीय. त्यामुळं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून कोरोना नियमांचं पालन करण्याचं आवाहन करण्यात आलंय.
आरोग्य मंत्रालयानं शुक्रवारी संध्याकाळी दिलेल्या माहितीनुसार, देशात सध्या 244 ओमायक्रॉनचे सक्रीय आहेत. ज्यात महाराष्ट्र, दिल्ली, तेलंगणा आणि तामिळनाडू अग्रेसर आहेत. या चारही राज्यात ओमायक्रॉनचे 34 रुग्ण सक्रीय आहेत. तर, कर्नाटक (31), गुजरात (30), केरळ (27), आणि राजस्थान (22) आणि हरियाणा, ओडिशा, जम्मू-काश्मीर, आंध्र प्रदेश, चंदीगढ, लडाख आणि उत्तराखंड येथेही ओमायक्रॉन संक्रमित रुग्णाची नोंद करण्यात आलीय.
- आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, मागील 24 तासांत 122 ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून आली. चिंताजनक बाब म्हणजे, भारतात एका दिवसात एक तृतीयांश रुग्णांची वाढ झाल्याचं पाहायला मिळालंय. मागच्या आठवड्यात ओमायक्रॉनच्या 100 रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर मंगळवारीपर्यंत ओमायक्रॉनच्या रुग्णांनी 200 चा आकडा ओलांडला.
- भारतातील ओमायक्रॉनबाधितांपैकी 91 टक्के रुग्णांचे कोरोना प्रतिबंध लशीचे दोन्ही डोस घेतले आहेत. तर, यापैकी 27 टक्के रुग्णांचा परदेशात प्रवास केल्याचा इतिहास नसल्याचं समोर आलंय. यामुळं आरोग्य विभागासमोर मोठं आव्हान उभं राहिलंय. यापार्श्वभूमीवर नागिरकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे.
- ओमायक्रॉनचा संसर्ग रोखण्यासाठी अमेरिका आणि युरोपमधील अनेक देशांनी नागरिकांना बूस्टर लस देण्यास सुरुवात केलीय. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर वैज्ञानिक तज्ञ आणि डब्ल्यूएचओ कडून गंभीर इशारा देण्यात आला असूनही भारतानं बूस्टर डोसला सुरुवात केली नाही.
- ओमायक्रॉन हा डेल्टापेक्षा तीन पट जास्त संसर्गजन्य आहे, असा इशारा केंद्र सरकारनं बुधवारी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना इशारा दिला. तसेच ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यांना अधिक सतर्क आणि काळजी घेण्याचे आवाहन केलं
- ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशनं ताबडतोब राज्यात कडक निर्बंध लागू केले. दोन्ही राज्यांनी रात्री अकरा ते पहाटे पाच वाजेपर्यंत कर्फ्यू लावलाय.
- मुंबईत काल 602 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. ही मुंबईतील 77 दिवसानंतरची सर्वात मोठी वाढ आहे. ज्यामुळं महानगरपालिकेसह प्रशासनाचेही दाबे दणाणले आहेत.
- जगभरातील 108 देशात आतापर्यंत ओमायक्रॉनचे 1 लाख 50 हजार रुग्ण आढळून आले आहेत. ज्यामध्ये यूके 90,000 पेक्षा जास्त आणि डेन्मार्कमध्ये 30,000 पेक्षा जास्त आहे. तर 26 जणांचा मृत्यू झाला आहे. डब्ल्यूएचओने देशांना चेतावणी दिली आहे की ओमिक्रॉनची प्रकरणे दर 1.5 ते तीन दिवसांनी दुप्पट होत आहेत.
दरम्यान, 31 डिसेंबरच्या पार्ट्या आणि नववर्षाचे स्वागत करताना नागरिकांनी कोरोना नियमांचं पालन करावं. तसेच मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन करू नये यासाठी रात्रीचा कर्फ्यू लावण्यात यावा. तसेच बेडची क्षमता वाढविण्याच्या सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं यापूर्वीच राज्यांना दिल्या आहेत.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha