ओमायक्रॉनचा संसर्ग वाढतोय, रात्रीची संचारबंदी लावा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे राज्यांना आदेश
Omicron Cases in India : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओमायक्रॉनच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर राज्यांना महत्वाच्या सूचना दिल्या आहेत.
Omicron Cases in India : दक्षिण आफ्रिकेत उदयास आलेल्या ओमायक्रॉन व्हेरियंटने देशाची चिंता वाढवली आहे. देशातील ओमायक्रॉनबाधित रुग्णाची संख्या 300 च्या वरती गेली आहे. दररोज ओमायक्रॉन रुग्णाच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. ओमायक्रॉन व्हेरियंटचा धोका पाहून केंद्राकडून राज्यांना काही आदेश देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य सचिवानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांशी सवांद साधला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांना महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. तसेच या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोग्य तज्ज्ञांकडून कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटची ताजी परिस्थिती जाणून घेतली. तसेच पुढील तयारी कशी असेल याचा आढावाही घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठकीत म्हटले की, 'कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा धोका पाहता आपल्याला सतर्क आणि सावधान राहायला हवं.'
दरम्यान पंतप्रधान मोदींनी बोलावलेल्या बैठकीत राज्यांना कुठले आदेश दिलेत पाहुयात....
रात्रीची संचारबंदी लावा.
गर्दीच्या कार्यक्रमांना, ठिकाणांवर निर्बंध आणावेत.
उत्सव लक्षात घेऊन रुग्ण वाढले असतील तर कंटेन्मेंट झोन, बफर झोन तयार करा.
टेस्टिंग आणि संपर्कात आलेल्यांवर लक्ष ठेवा. केंद्राच्या मार्गदर्शक सूचनेनुसार डोअर टु डोअर जाऊन रुग्णांचा शोध घ्यावा.
हॉस्पिटलमध्ये बेड, आरोग्य उपकरणं, अँम्बुलन्स वाढवा, ऑक्सिजनचा बपऱ स्टॉक वनबा, 30 दिवसांचा औषधांचा साठा करावा.
अफवा पसरु नयेत याची काळजी घ्यावी, 100 टक्के लसीकरणावर लक्ष केंद्रीत करावं.
दारोदारी जाऊन लसीकरण मोहीम राबवावी.
Reviewed the COVID-19 situation across India, particularly in the wake of Omicron. Our focus is on further ramping up health infra, testing, tracing and ensuring full vaccination coverage. https://t.co/mbx44TLKcU
— Narendra Modi (@narendramodi) December 23, 2021
'ओमायक्रॉन'चा सामना करण्यासाठी केंद्राकडून देण्यात आलेली पंचसुत्री...
1: सध्याच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रतिबंधित क्षेत्राच्या बाबतीत कठोर नियंत्रण सुनिश्चित करा. रात्री संचारबंदी लावा आणि विशेषत: आगामी उत्सवांच्या आधी, मोठ्या मेळाव्याचे कडक नियमन सुनिश्चित करा.
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या नवीन ठिकाणांबाबतीत कंटेमेंटन झोन (Containment Zones - प्रतिबंधित क्षेत्र), बफर झोन (Buffer Zone-सुरक्षीत क्षेत्र) याची यादी तयार करा. तसेच वेळ न घालवता करता जीनोम सिक्वेन्सिंगसाठी सर्व क्लस्टर नमुने आयएनएसएसीओजी प्रयोगशाळेत पाठवा.
2. चाचणी आणि लक्ष ठेवण्याबाबत, राज्यांना सर्व जिल्ह्यांमध्ये डेल्टा आणि ओमायक्रॉन रुग्णसंख्येवर बारीक आणि कडक नजर ठेवण्यास सांगितले होते; यानुसार दररोज आणि प्रत्येक आठवड्याला रुग्ण पॉझिटीव्हीटी; दुपटीचा दर; आणि नव्याने जास्त रुग्ण वाढणारी ठिकाणे या भागात प्रतिबंध सुरू करा असे सांगण्यात आले. आरटी-पीसीआरचे योग्य प्रमाण सुनिश्चित करा: दररोज घेतल्या जाणाऱ्या एकूण चाचण्यांमध्ये आरएटी (किमान 60:40) असावे. हे 70:30 गुणोत्तरापर्यंत वाढवले जाऊ शकते.
3. खाटांची संख्या वाढवावी, रुग्णवाहिकांसारख्या खात्रीशीर प्रवासी सुविधावर लक्ष पुरवावे, गरज पडल्यास रुग्णाला हलवण्यासाठीची व्यवस्थांची अंमलबजावणी करावी. ऑक्सिजन पुरवठा यंत्रणा सुरळीत आणि गरज भासल्यास वापरात असण्याची खात्री करून घेत रहा. किमान 30 दिवसांचा औषधांचा साठा राखीव राहू द्या. सध्याच्या नियमावलीनुसार गृहविलगीकरण/अलगीकरण यांचे सक्तीने पालन करावे.
4. लोकांना भयभीत कऱणारी माहिती देऊ नका. नागरिकांना वारंवार सूचना आणि माहिती पुरवण्यासाठी तत्पर राहा, जेणेकरून भिती वा चुकीची माहिती पसरण्यास आळा बसेल. माध्यमांना नियमितपणे परिस्थितीबद्दल माहिती देणे.
5. लसीकरण न झालेल्यांना तात्काळ पहिला डोस देण्याला प्राधान्य द्या. तसेच ज्याचा दुसरा डोस बाकी आहे, त्यांचेही लसीकरण तात्काळ करा. 100 टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करा. ज्या जिल्ह्यांमध्ये पहिला डोस घेतलेल्या तसेच दोन्ही डोस घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या राष्ट्रीय स्तरावरील लसीकरणाच्या सरासरीपेक्षा कमी असेल त्या जिल्ह्यांमध्ये लसीकरणावर विशेष लक्ष देणे. ज्या ठिकाणाचं लसीकरण राष्ट्रीय स्तरावरील सरासरीपेक्षा कमी असेल तेथे घरोघरी जाऊन लसीकरण मोहिम तीव्र करणे. येत्या काळात ज्या राज्यात निवडणूका होणार आहेत त्या राज्यांनी तातडीने लसीकरणाला वेग देणे.