Hingoli News: बळीराजा अजूनही प्रतिक्षेतच! मान्सून लांबल्यामुळे पेरणीला देखील उशीर, खरेदी केलेले बियाणे घरातच पडून
Hingoli News: राज्यात अजूनही पेरणी करण्यायोग्य मान्सून बरसला नसल्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत आहेत. तसेच पेरणीसाठी हजारो रुपयांचे बियाणे देखील तसेच पडून राहिले आहे.
Hingoli News: दरवर्षी मृग नक्षत्रामध्ये पेरणीला सुरुवात होत असते, परंतु यावर्षी अजूनही पेरणी योग्य पाऊस पडला नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्याचं चित्र सध्या हिंगोलीमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत सापडले आहेत. राज्यात बऱ्याच ठिकाणी मान्सूनने (Monsoon) हजेरी लावली असली तरीही अजून शेतीसाठी पुरक असा पाऊस राज्यात बरसला नाही. हवामान खात्याने देखील जोपर्यंत 50 ते 60 टक्के पाऊस पडत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना पेरणी न करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे बळीराजा अजूनही पावसाच्या प्रतिक्षेत असल्याचं चित्र सध्या राज्यात पाहायला मिळत आहे.
बळीराजाचे पावसासाठी साकडे
मराठवाडा आणि विदर्भामध्ये दरवर्षी मृग नक्षत्रांमध्ये पेरणी करण्यात येते. परंतु या वर्षी बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सून लांबणीवर पडला आहे. यामुळे बळीराजाच्या चिंतेत मात्र भर पडली आहे. राज्यात पावसाच्या विश्वासावर शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतीच्या मशागतीची कामे पूर्ण केली होती. तसेच हळदी आणि सोयाबिन पिकांसाठी शेतकऱ्यांनी मशागतीची तयारी पूर्ण केली होती. पंरतु मान्सूनने अजूनही योग्य प्रमाणात हजेरी न लावल्यामुळे आता पेरणी कशी करायची असा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.एक ते दिड महिन्यांपासून शेतीच्या मशागतीची कामे पूर्ण करुन शेतकरी आता मान्सूनच्या प्रतिक्षेत आहेत. मशागत करुन लवकर पाऊस न पडल्यामुळे दुबार मशागत करावी लागणार असल्याची चिंता आता शेतकऱ्यांना लागून राहिली आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीचा देखील सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना लागून राहिलेली मान्सूनची प्रतिक्षा कधी संपणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
हवामान खात्याने यंदा लवकर आणि वेळेत मान्सून दाखल होईल असा अंदाज वर्तवला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी देखील हजारो रुपये खर्च करुन पेरणासाठी लागणाऱ्या बियाणांची खरेदी केली होती. परंतु अद्यापही योग्य प्रमाणात पाऊस पडला नसल्यामुळे पेरणी वेळेवर होणार की नाही असा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर उभा आहे. दरवर्षी लवकर होणाऱ्या मूग आणि उडदाच्या पिकांची पेरणी देखील यावेळी उशिरा होणार असल्याचं म्हटलं जात आहे.
यंदाच्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे आधीच खूप नुकसान झाले आहे. अनेक पिकं मान्सूनमुळे वाहून गेली आहेत. त्यामुळे आता जर मान्सूने योग्य वेळेत हजेरी लावली नाही तर पुन्हा एकदा शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे मान्सूनच्या प्रतिक्षेत असणाऱ्या बळीराजावर आता तरी मान्सूनची कृपा होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Oil Import Duty: सोयाबीन आणि सूर्यफुलावरील आयात शुल्कात कपातीचा निर्णय; दर पडण्याची शेतकऱ्यांनी भीती