'जरांगे म्हणाले सभेला टाकून येऊ नका रे...'; प्रशासनाने थेट सभेच्या दिवशी कोरडा दिवस घोषित करून टाकलं
Manoj Jarange Sabha : उद्या होणाऱ्या मनोज जरांगेंच्या सभेच्या पार्श्वभूमीवर हिंगोली प्रशासनाने हिंगोली आणि औंढा नागनाथ तालुक्यात दारू विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
हिंगोली: मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचा चौथ्या टप्प्यात महाराष्ट्र दौरा सुरू आहे. दरम्यान, त्यांच्या अनेक रात्रीच्या सभेत काही लोक दारू पिऊन येत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे, सभेला येताना दारू पिऊन येऊ नका असे अनेकदा मनोज जरांगे आपल्या भाषणातून सांगत आहे. जरांगे यांचे हेच आवाहन लक्षात घेता, उद्या होणाऱ्या त्यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर हिंगोली प्रशासनाने हिंगोली आणि औंढा नागनाथ तालुक्यात दारू विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. असा आदेशच हिंगोलीचे जिल्हाधिकारी (Hingoli Collector) यांनी काढला आहे.
मनोज जरांगे यांचा महाराष्ट्र दौऱ्याचा चौथा टप्पा सुरू आहे. उद्या हिंगोली जिल्ह्यातील डिग्रस फाटा येथे जरांगे यांची सभा होणार आहे. तर, 110 एकरवर होणाऱ्या या सभेत मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असल्याचा आयोजकांचा अंदाज आहे. याच पार्श्वभूमीवर हिंगोली आणि औंढा नागनाथ तालुक्यातील सर्व प्रकारच्या मद्यविक्री उद्या निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे घाऊक आणि किरकोळमध्ये विक्रीची सर्व दुकाने उद्या बंद ठेवावे असे आदेश हिंगोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी निर्गमित केले आहेत.
काय म्हटले आहे आदेशात?
हिंगोली जिल्ह्यातील डिग्रस फाटा येथे गुरुवारी (7 डिसेंबर) रोजी सकल मराठा समाजाचे वतीने मनोज पाटील जरांगे यांची जाहीर सभा आहे. त्यामुळे, हिंगोली जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहावी याकरीता महाराष्ट्र दारुबंदी कायदा, 1949 चे कलम 142 (1) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन जिल्हाधिकारी जितेंद्र पांपळकर (भा.प्र.से.) आदेश देत आहे की, 7 डिसेंबर 2023 रोजी औंढा नागनाथ व हिंगोली तालुक्यातील सर्व प्रकारच्या ठोक व किरकोळ देशी, विदेशी मद्य विक्री व ताडी अनुज्ञप्त्यांचे व्यवहार बंद ठेवण्याचे (कोरडा दिवस ) आदेश देत आहे. सदर आदेशाचा भंग केल्यास अनुज्ञप्तीधारकांविरुध्द मुंबई दारुबंदी कायदा 1949 कलम 54 व 56 अंतर्गत कडक कारवाई करण्यांत येईल यांची संबंधीत अनुज्ञप्तीधारकांनी नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.
सभेची अशी तयारी झाली...
मनोज जरांगे यांच्या महाराष्ट्र दौऱ्याचा चौथा टप्पा सुरू आहे. उद्या जरांगे यांची हिंगोली जिल्ह्यातील डिग्रस फाटा येथे 110 एकरवर ही सभा होणार आहे. हिंगोली-परभणी रोडवरील डिग्रस फाट्यावर ही सभा होणार असून, याची जोरदार तयारी करण्यात येत आहे. तर, सभेच्या ठिकाणी 40 बाय 20 आणि उंची 12 फुटाच व्यासपीठ तयार करण्यात आला आहे. स्टेजसमोर 200 किलो रांगोळीचे रंग वापरून 35 बाय 40 फूट एवढी मनोज जरांगे यांची रांगोळी काढण्यात आली आहे. सभास्थळी आता सर्व भगवेमय वातावरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता उद्याच्या सभेत जरांगे नेमकं काय बोलणार हे पाहणं महत्वाचे असणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
दोन क्विंटल फुलांचा हार, 76 तोफांची सलामी; हिंगोलीत जरांगेंची 110 एकरवर विराट सभा