Hingoli News: गणपतीसाठी कारने गावी निघालेलं अख्ख कुटुंब बेपत्ता; 40 तासांपासून मोबाईल बंद, नातेवाईकांकडून शोध सुरु
Hingoli News: गणपतीनिमित्त गावी निघालेल्या शिक्षकाचं अख्ख कुटुंब बेपत्ता असल्याचा प्रकार समोर आला आहे.

Hingoli News: गणपतीनिमित्त गावी निघालेल्या शिक्षकाचं अख्ख कुटुंब बेपत्ता असल्याचा प्रकार समोर आला आहे. हिंगोलीमधील शिक्षक ज्ञानेश्वर चव्हाण त्यांच्या पत्नी आणि दोन मुलांसह कारने प्रवास करत गावी निघाले होते. मात्र या सगळ्यांचा मोबाईल गेल्या 40 तासांपासून बंद असून नातेवाईकांकडून शोध सुरु आहे.
नेमकं काय घडलं?
हिंगोली जिल्ह्यातील रहिवाशी असलेले ज्ञानेश्वर चव्हाण शिक्षक असून नोकरीनिमित्त रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर येथे राहतात. सोबत त्यांची पत्नी आणि दोन मुलंसुद्धा राहतात. गणपती सणाच्या निमित्ताने कारने प्रवास करत ज्ञानेश्वर चव्हाण यांची पत्नी आणि दोन मुले असे चौघेजण गावाकडे निघाले होते. परंतु घरी पोहचले नाही. नातेवाईकांनी सातत्याने त्यांना संपर्क करायचा प्रयत्न केला परंतु कोणताही संपर्क झालेला नाही. मागील 40 तासांपासून त्यांचे मोबाईल बंद असून त्यांच्यासोबत कोणताही संपर्क होत नाही. त्यामुळे चिंतेत असलेल्या नातेवाईकांनी कालपासून त्यांची शोधा शोध सुरू केला तरी मात्र कोणताही शोध लागलेला नाही.





















