एक्स्प्लोर
Advertisement
ग्रामदेवता: देवरुखवासियांचं श्रद्धास्थान सोळजाई माता
रत्नागिरी: रत्नागिरीच्या देवरुखमधील सोळजाई म्हणजे कोकणातील एक जागृत दैवत. देवरुखकरमधील प्रत्येक ग्रामस्थ आपल्या सुखा-दुःखाच्या प्रसंगी सोळजाईच्या चरणी नतमस्तक होतो. शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या सोळजाई देवस्थानची महती आजही साऱ्या पंचक्रोशीत पसरलेली आहे. या मंदिराला जसे अध्यात्मिक महत्त्व आहे, तसेच ऐतिहासिक महत्त्वही असल्याचे येथील मंडळी सांगतात.
देवरुख शहराच्या मध्यवस्तीत वसलेलं हे सोळजाई मंदिर, पाहताक्षणीच लक्ष वेधून घेत. या मंदिराची भव्यता, नेटकेपण आणि देखणं रुप प्रत्येक भाविकाला मोहित करतं. मंदिरात प्रवेश करताच आपल्याला समोरच श्री देवी रेडजाई, श्री देवी महालक्ष्मी, श्री देव भैरोबा, श्री देव वाडेश्वर अशा साऱ्या देवतांचे गाभारे सर्वप्रथम नजरेस पडतात. या सर्व गाभाऱ्याच्या डाव्या हाताला सोळजाईचा गाभारा आहे.
शिवकालीन अनेक काव्यात आणि अगदी गॅझेटमध्येही देवरुख शहराचा उल्लेख आढळतो. छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे पुत्र संभाजी राजे या शहरात आल्याचे इतिहासकालीन दाखले पाहायला मिळतात. 1937 साली देवरुखातील तत्कालीन सार्दळ, लोध , देवरुखकर आदी मंडळींनी चतु:सीमेची सभा लावून श्रमदान आणि देणग्या गोळ्या करुन या मंदिराची उभारणी केली. त्याकाळातही हे मंदिर लोकांच्या आकर्षणाचे ठिकाण होते.
ऐतिहासिक वारसा असलेल्या या मंदिरात आजही परंपरेने आलेले 18 कुमकर आणि 9 कारखानदारांचे मान जपले जातात. तसेच विश्वस्थ आणि ग्रामस्थांच्या साथीने वर्षभरातील सारे उत्सव आज साजरे केले जातात. यामध्ये चैत्र शुद्ध प्रतिपदा, श्रावण पौर्णिमा, घटस्थापना याचबरोबर देवदिवाळीला होणारी लोटांगण यात्रा, शिमगा असे सगळेच उत्सव देवरुखकर ग्रामस्थ सोळजाईच्या प्रांगणात मोठ्या जल्लोषात साजरे करतात. या उत्सवाच्या काळात सोळजाईच्या मंदिराला जणू जत्रेचे रूप प्राप्त झाले असते .
या मंदिरातील 60-70 वर्षांपूर्वीची परंपरा आजही सांगितली जाते. 60 ते 70 वर्षांपूर्वी या मंदिराच्या समोर रेडजाईची यात्रा होई. यात एका रेड्याला सजवून मग त्याची मान एका घावात तोडली जात असे. त्याच्या रक्तात भिजवलेला भात विशिष्ठ समाजाला दिला जात असे.
देवरुख परिसरातील 44 गावांवर सोळजाई देवीचं अधिपत्य आहे. संकटात असताना सोळजाईचा धावा केला की, आई मदतीला धावून येते, यामुळे देवरुखवासीयासाठी ती संकटविमोचक आहे. मंदिरात देवीच्या चरणाशी येणाऱ्या भाविकांच्या गर्दीतून याची प्रचिती येते. यामुळेच देवरुख आणि आजूबाजूच्या 44 गावातील ग्रामस्थांसाठी हे केवळ ग्रामदेवतेचे मंदिर नाही, तर त्याच्या दैनंदिन जीवनात उत्साह -चैतन्य भरणारा एक दैवी स्रोत आहे. जिच्या केवळ दर्शनानेच प्रत्येक देवरुखवासीयाला नवी सकारात्मक ऊर्जा मिळते, अशी येथील ग्रामस्थांची श्रद्धा आहे.
व्हिडीओ पाहा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
पुणे
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement